Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पेन हिमवादळ आणि उणे 25 तापमानाने गारठला

स्पेन हिमवादळ आणि उणे 25 तापमानाने गारठला
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (16:37 IST)
स्पेनच्या मध्य भागाला सध्या हिमवर्षावाने वेढलं आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळ तिथे धोकादायक वातावरण निर्माण झालं आहे. अधिकाऱ्यांनी ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे.
 
या हिमवादळमुळे कमीत कमी सात लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
 
मोलिना दे आरगॉन आणि टेऊरेल या डोंगराळ भागात स्पेनमधलं गेल्या 20 वर्षांतलं सगळ्यात थंड तापमान नोंदवलं गेलं आहे. इथलं तापमान उणे 25 अशांपर्यंत घसरलं आहे.
 
फिलोमिना नावाच्या या हिमवादळमुळे सर्वत्र बर्फ पसरलेला आहे, यामुळे स्पेनच्या दळणवळण सुविधेवर मोठा परिणाम झाला आहे. स्पेनला सध्या भुतो न भविष्यती अशा हिवाळ्याला सामोरं जावं लागतंय.
इथल्या स्थानिक महिला योली असेंसिओ बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "अशी थंडी आम्हाला पुढचे काही दिवस सहन करावी लागणार आहे. आम्हाला धीर ठेवावा लागेल. रोजचं आयुष्य अवघड झालंय. सगळीकडे नुसता बर्फच बर्फ आहे. रस्ते बंद झालेत."
 
स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये तापमान उणे 16 अंशापर्यंत घसरलं होतं. हॉस्पिटलवर आधीच कोव्हिडच्या पेशंटचा मोठा भार असताना आता रोज नव्याने बर्फावरून घसरून हाडं मोडलेले लोक दाखल होत आहेत.
 
अनेक ट्रेन्स तसंच फ्लाईट रद्द झाल्या आहेत. स्पेनच्या एल पैस या वर्तमानपत्रानुसार सध्या या भागात 1300 बर्फ हटवणारे ट्रक दिवसरात्र काम करत असून त्यांच्यासमोर 12,100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरचा बर्फ हटवण्याचं उदिष्ट आहे.
बचावकार्य
बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. टोलेडो भागातल्या 64 वर्षांच्या मधुमेही व्यक्तीला तातडीने इन्सुलीनची गरज होती. हेलिकॉप्टरने तिथपर्यंत पोहचलेल्या बचावपथकाला ही व्यक्ती बर्फात कुबड्या घेऊन अडखळत चालताना दिसली. त्यांच्या अंगावर थंडीपासून बचाव करणारे कपडेही नव्हते असं स्पेनच्या इफे या वृत्तसंस्थेने म्हटलंय.
मुर्शियाच्या डोंगराळ भागात 20 डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तीन वर्षांच्या कुत्र्याला वाचवण्यात यश आलं आहे. एका गिर्यारोहकांच्या गटाला हा कुत्रा सापडला. अलास्कन मलमुट या जातीचा हा तगडा कुत्रा तीन आठवडे हिमवर्षावात तग धरून होता. त्याचं वजन मात्र 10 किलोने कमी झालं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, अजूनही टेस्ला महाराष्ट्रात येण्याच्या आशा कायम