Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हार्दिक पंड्या आऊट झाला आणि टीम इंडियाने शस्त्रं म्यान केली

हार्दिक पंड्या आऊट झाला आणि टीम इंडियाने शस्त्रं म्यान केली
- पराग फाटक
टीम इंडियाला इंग्लंडविरुध्द जिंकण्यासाठी ३३८ धावांचा डोंगर गाठायचा होता. शतकवीर रोहित शर्मा आणि सलग पाचव्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा विराट कोहली यांनी मॅरेथॉन भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
 
रनरेट वाढवण्याच्या प्रयत्नात हे दोघे बाद झाले. ऋषभ पंत पहिल्यावहिल्या वर्ल्डकप सामन्यात चमक दाखवू शकला नाही. हार्दिक पंड्याला महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या आधी पाठवण्यात आलं.
 
हार्दिकने नेहमीच्या शैलीत दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली. तो आणि धोनी मिळून हे अवघड लक्ष्य पेलणार अशी स्थिती होती, मात्र मोठा फटका मारायचा हार्दिकचा प्रयत्न फसला.
 
हार्दिक आऊट झाल्यावर फिनिशर धोनी प्रकटणार अशी चाहत्यांना आस होती. रनरेट पंधराच्या आसपास होता.
 
चौकार, षटकारांची आतषबाजी अपेक्षित असताना धोनी-केदार जाधवने 7 बॉल निर्धाव खेळून काढले. 20 सिंगल्स अर्थात एकेरी धावा घेतल्या. रनरेट गगनाला जाऊन भिडलेला असताना या जोडीने 3 चौकार आणि एकमेव षटकार लगावला.
 
धोनी-केदारकडून अपेक्षाभंग
जगातल्या सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणना होणाऱ्या धोनीकडून किमान लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी गिअर बदलणं चाहत्यांना अपेक्षित होतं. केदार आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र बर्मिंगहॅमच्या या मैदानावर केदारच्या फटक्यांनी मौनाची भाषांतरं होणं पसंत केलं.
 
अफगाणिस्तानविरुध्द धोनी-केदार जोडीने संथ खेळ केला असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. धोनी महान खेळाडू आहे, पण त्याने स्ट्राईक रोटेशनकडे लक्ष द्यायला हवं, असं व्हीव्हीएस लक्ष्मणनं म्हटलं होतं. इंग्लंडविरुध्द धोनी-केदार जोडीने पत्करलेल्या भूमिकेवरून सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे.
 
338 धावांचा पाठलाग करताना तुमच्या पाच विकेट्स कशा शिल्लक राहतात, असा सवाल माजी कर्णधार सौरव गांगुलीने केला आहे.
 
उर्वरित दोन मॅचमध्ये धोनी-केदार जोडीवर वेगाने धावा करण्याचं दडपण असणार आहे.
 
टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्यासाठी एका विजयाची आवश्यकता होती. इंग्लंडविरुध्द पराभूत झाल्याने टीम इंडियाला सेमी फायनलसाठी पात्र ठरण्यासाठी पुढच्या मॅचपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
 
59 मीटर बाऊंड्री कशी ठरली निर्णायक?
बर्मिंगहॅमच्या मैदानाच्या एक बाजूचं अंतर फक्त 59 मीटर होतं. मैदानाच्या या बाजूला चौकार षटकारांची लयलूट करता येऊ शकते हे इंग्लंडने जाणलं.
 
मैदानाची दुसरी बाजू 82 मीटर लांब होती. त्यामुळे या दिशेला चौकार षटकार लगावणं कठीण असेल याचा अंदाज इंग्लंडला आला होता.
 
मैदानाची एक बाजू 59 मीटर होती. बॅट्समन तुम्हाला रिव्हर्स स्वीप करून सिक्स मारू शकत असेल तर स्पिनर काय करणार असा सवाल कर्णधार कोहलीने केला.
 
'मैदानाची एक बाजू इतकी छोटी असणं विचित्र आहे. आणि हे आयसीसीच्या नियमात बसतं. सपाट खेळपट्टीवर एक बाजू इतकी लहान असणं गोष्टी अवघड करून टाकतं. त्याचवेळी मैदानाची दुसरी बाजू 82 मीटर एवढी आहे,' असं कोहली मॅचनंतर बोलताना म्हणाला.
 
एका बाजूला लहान असणाऱ्या मैदानावर टीम इंडियाने दोन स्पिनर्स खेळवले तर इंग्लंडने वेगवान गोलंदाज लायम प्लंकेटचा समावेश केला. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या बॉलिंगवर इंग्लंडने 160 धावा कुटल्या. प्लंकेटने 55 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
 
इंग्लंडने 27 चौकार आणि 13 षटकार लगावले. म्हणजेच इंग्लंडने 40 चेंडूत 186 धावांची लयलूट केली. इंग्लंडने 59 मीटर बाऊंड्रीचा अचूक लाभ उठवत चौकार षटकारांची आतषबाजी केली
 
मात्र टीम इंडियाला छोट्या बाऊंड्रीचा फायदा करून घेता आला नाही. टीम इंडियाने 35 चौकार आणि एकमेव षटकार लगावला. म्हणजेच 36 चेंडूत 146 धावाच केल्या.
 
दोन्ही संघांच्या चौकार षटकारांची गोळीबेरीज आणि इंग्लंडच्या विजयाचं अंतर यातलं साधर्म्य पुरेसं बोलकं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जायरा वसीम: बॉलीवुड सोडण्याच्या निर्णयामुळे 'दंगल गर्ल' झाली ट्रोल