चेन्नई येथील दूरदर्शन वाहिनीच्या उपसंचालकांचे निलंबन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेन्नई कार्यक्रम लाइव्ह करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हे निलंबन असावे असा कयास बांधला जात आहे.
आर. वसुमती हे चेन्नई येथील दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे उपसंचालक आहेत. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्बाडी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार वसुमती यांना शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून सध्या निलंबित करण्यात आले आहे. वसुमती यांच्याविरोधात आदेश काय निघाला आहे हे नमूद करण्यात आलेले नाही, मात्र फेडरल सिव्हिल वर्क्स कायद्याअंतर्गत त्यांना केवळ निलंबित करण्यात आले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथील तीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधानांची भाषणं दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली. दूरदर्शनच्या तमिळ टीव्हीवर दोन कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. परंतु आयआयटी मद्रास येथे झालेल्या 'सिंगापूर - इंडिया हॅकेथॉन 2019' या कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण झाले नाही. यातील मजकूर केवळ वृत्तपत्रात देण्यात आला होता.
पंतप्रधान कार्यालयातर्फे 30 सप्टेंबर रोजी यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. यानंतर कार्यक्रम विभागाच्या प्रभारी उपसंचालकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात करण्याचे आदेश देण्यात आले.
पंतप्रधानांच्या त्या ठरावीक भाषणाचे थेट प्रसारण करण्याचे आदेश देण्यात आले होते किंवा नाही, आले असल्यास त्याचे थेट प्रक्षेपण का झाले नाही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
चेन्नई दूरदर्शन भागातील कुणीही यासंदर्भात बोलण्यास तयार नाही. शिस्तभंगाची कारवाई झालेले वसुमती फोनवर उपलब्ध नाहीत.
बीबीसी तमिळच्या प्रतिनिधींनी प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही.