Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

JNU हल्ल्याचं रहस्य दडलंय या व्हॉट्सअॅपवर ग्रुप्समध्ये

JNU हल्ल्याचं रहस्य दडलंय या व्हॉट्सअॅपवर ग्रुप्समध्ये
, गुरूवार, 9 जानेवारी 2020 (15:52 IST)
गुरप्रीत सैनी
रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (JNU) हल्ला झाल्यानंतर व्हॉट्सअॅपचे काही स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.
 
विद्यार्थ्यांना मारहाण करण्याची घटना सुनियोजित होती आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरून यासाठीचं प्लानिंग करण्यात आल्याचा दावा केला जातोय.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या स्क्रीन शॉट्समध्ये अनेक मेसेज पहायला मिळतायत. जेएनयूमध्ये शिरकाव कसा करायचा, यानंतर काय करायचं, कुठे जायचं याविषयीची चर्चा यात आहे.
 
यातले काही मेसेज असे आहेत :
 
"कशी झाली आजची मॅच?"
 
"खूप मजा केली आम्ही जेएनयूमध्ये. त्या देशद्रोह्यांना मारून मजा आली."
 
"अजूनतरी छान. गेटवर काहीतरी करायला हवं. सांगा काय करायचं."
 
"काय करायचं आहे?"
 
"जेएनयूच्या समर्थनार्थ लोकं मेन गेटवर येत आहेत. तिथे काही करायचं आहे का?"
 
"करू शकतो."
 
"पोलीस तर आले नाहीत ना."
 
"भाई, या ग्रुपमध्ये लेफ्टिस्ट आले आहेत."
 
"नाही, व्हीसींनी नकार दिलाय. व्हीसी आपले आहेत."
 
अशा अनेक व्हायरल व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स पहायला मिळत आहेत.
 
तर अभाविपनेही एक व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट शेअर केलाय.
 
यामध्ये काही लोक हिंसाचाराविषयी चर्चा करत आहेत. हे लोक एकमेकांना 'कॉम्रेड' म्हणून संबोधत असून त्यांच्या नावासोबत डाव्या विचारसरणीच्या संघटनांचं नाव लिहीलेलं आहे.
webdunia
पण या चॅटमध्ये कोणताही नंबर दिसत नाही. फक्त मेसेज करणाऱ्यांचं नाव दिसतं. म्हणूनच बीबीसीला यांच्याशी संपर्क साधता आला नाही.
 
पण व्हायरल झालेल्या काही व्हॉट्सअॅप चॅट्सच्या स्क्रीन शॉट्समध्ये नंबरही पहायला मिळत आहेत.
 
True Callerच्या मदतीने बीबीसीने स्क्रीन शॉट्समध्ये दिसणारे फोन नंबर तपासून पाहिले. स्कीनशॉट्समध्ये दिसणाऱ्या नावांनीच हे फोन नंबर रजिस्टर्ड आहेत.
 
तपासलेल्यांपैकी 7 जणांची नावं योग्य होती. तर स्क्रीनशॉटवर नावापुढे अभाविप लावलेल्या व्यक्तींपैकी तपासल्यानंतर INC असल्याचं आढळलं. जर कोणी नाव बदलून तुमचा नंबर सेव्ह केला, तर असं होऊ शकतं.
 
स्क्रीनशॉट्समध्ये दिसत असलेल्या या मोबाईल नंबरवर संपर्ककरून हे लोक कोण आहेत हे आणि या घटनेशी असणारा त्यांचा संबंध तपासण्याचा प्रयत्न केला.
 
चॅटमध्ये दोन प्रकारचे नंबर
या चॅटमध्ये दोन प्रकारचे नंबर आहेत. एक प्रकारचे लोक ग्रुपमध्ये मेसेज करत असून हे मेसेजेस वाचल्यानंतर ते सक्रीय असल्याचं आणि योजना आखत असल्याचं वाटतं.
 
दुसरीकडे असे काही नंबर आहेत ज्यांच्यापुढे ते 'इनव्हाईट लिंक द्वारे ग्रुपमध्ये सहभागी' झाल्याचं दिसतंय.
 
व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे नंबर आम्ही एकेक करून फिरवले. पहिल्या प्रकारचे नंबर्स, ज्यांनी मेसेज लिहिले होते, त्यातले बहुतेक बंद होते.
 
त्यातल्या एकाशीच आमचा संवाद होऊ शकला. हा नंबर होता हर्षित शर्माचा, ज्याने आपण जेएनयूचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं. हाणामारी झाली तेव्हा आपण कँपसमध्ये नव्हतो, असं त्याचा दावा आहे.
 
त्याने सांगितलं, "कँपसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये याविषयीची चर्चा सुरू झाली. आरएसएस किंवा एबीव्हीपीचा एक ग्रुप असल्याचा मेसेज त्यावर आला होता. यामध्ये इन्व्हाईट लिंक होती आणि ते लोक या ग्रुपवर आखणी करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्या ग्रुपमध्ये 50-60 विद्यार्थी होते. ते तेव्हा हॉस्टेलमध्ये घुसले होते आणि तिथे लोकांना मारहाण करत होते."
 
"जेएनयूच्या विद्यार्थ्यांपैकी आमच्यातले अनेकजण त्या इनव्हाईट लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये सहभागी झाले म्हणजे त्यांचं पुढचं प्लानिंग काय आहे हे समजू शकलं असतं."
 
"या ग्रुपचं नाव 'युनिटी अगेन्सट लेफ्टिस्ट' होतं. त्यावेळी रात्रीचे साडे नऊ झाले होते. ते लोक एकमेकांना मेसेज करत होते. तेव्हा अचानकच त्यांच्या ग्रुपमध्ये माझ्यासारखे 100 ते 150 अनोळखी लोक सामील झाले. या ग्रुपमध्ये खूप लेफ्टिस्ट आल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं. त्यानंतर त्यांनी या ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवणं थांबवलं."
 
या कालावधीत ग्रुपचं नाव वारंवार बदलल्याचं ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या अनेकांचं म्हणणं आहे. ' युनिटी अगेन्स्ट लेफ्ट, एबीव्हीपी मुर्दाबाद, एबीव्हीपी झिंदाबाद, लेफ्टिस्ट डूब मरो' अशी ही नावं होती.
webdunia
हर्षितनी या ग्रुपमध्ये एक मेसेज पाठवला होता, नंतर तो त्याने डिलीट केला. तो काय होता, हे विचारल्यानंतर त्याने सांगितलं, "गेटवर लोक जमा होत असल्याची चर्चा ग्रुपमध्ये होत होती. माझे अनेक मित्र गेटवर होते म्हणून मी या चॅटचा स्क्रीनशॉट घेतला आणि माझ्या इतर मित्रांना पाठवला. या दरम्यान मी चुकून तो स्क्रीनशॉट त्या ग्रुपमध्येही टाकला. तोच स्क्रीनशॉट मी डिलीट केला होता."
 
या इनव्हाइटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा सोशल मीडियावर मिळाला आणि मग काय प्लानिंग सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सहभागी झाल्याचा दावा, इनव्हाइटच्या मार्फत या ग्रुपमध्ये सामील झालेल्या इतर अनेकांनी केलाय.
webdunia
या वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रुपच्या स्क्रीनशॉटमध्ये असेही काही लोक आहे जे आपण केरळ, कर्नाटत, गुजरातमध्ये असल्याचं सांगत आहेत. आपण कधीही दिल्लीला आलेलो नाही आणि जेएनयूमध्ये कोणाला ओळखतही नाही, असं बिहारमध्ये राहणाऱ्या एका मुलाने सांगितलं.
 
तर आपण चुकून या ग्रुपमध्ये सहभागी झाल्याचं काही जणांचं म्हणणं होतं. तर 'ते लोक पुढे काय करणार आहेत' याचा तपास लावण्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून असं करणं गरजेचं होतं, असं काहींनी सांगितलं.
 
शिवाय यामध्ये जेएनयूमध्ये शिकणाऱ्या अनेकांचे नंबर्स आहेत. ते देखील हर्षित प्रमाणेच नेमकं काय प्लानिंग सुरू आहे हे जाणून घेण्यासाठीच ग्रुपमध्ये सहभागी झाल्याचं सांगत आहेत.
webdunia
आपल्या ग्रुपमध्येही इन्व्हाईट लिंक आली, आपण त्यावर क्लिक केलं, पण चॅट वाचल्यानंतर यात काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आल्याबरोबर आपण ताबडतोब हा ग्रुप सोडल्याचं जेएनयूमध्ये फारसी भाषेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
 
एबीव्हीपी काय प्लानिंग करतंय ते पाहा, अशा मेसेजसोबत आपल्याकडेही अशीच एक लिंक आली, आणि आपण त्यावर क्लिक केल्याचं जेएनयूच्या आणखी एका विद्यार्थ्याने सांगितलं. हा विद्यार्थी त्याच साबरमती हॉस्टेलचा आहे जिथे तोडफोड झाली.
 
अनेक बाहेरचे लोकही या ग्रुपमध्ये होते. आपण जेएनयूचे नाही आणि विद्यार्थीही नाही, असं त्यांच्यापैकी काहींचं म्हणणं आहे.
 
आपण अनेक 'प्रोटेस्ट ग्रुप्स' मध्य सहभागी असून तितेच आपल्याला ही इनव्हाइट लिंक मिळाल्याचं एका महिलेने बीबीसीला सांगितलं. त्या लोकांचं प्लानिंग जाणून घेण्यासाठीच ही महिलादेखील त्या ग्रुपमध्ये सहभागी झाली.
webdunia
तर आपण पत्रकार असून ग्रुप चॅट पाहण्यासाठी लिंकद्वारे सहभागी झाल्याचा दावा भवदीप नावाच्या व्यक्तीने केला. आता देखील या ग्रुपमध्ये साधारण अडीचशे लोक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
तर आपल्याला कोणीतरी या ग्रुपमध्ये अॅड केल्याचं आदित्यने सांगितलं. तो जेएनयूचा विद्यार्थीही नाही किंवा कोणत्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचाही नाही. पण या घटनेमध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांना आपण ओळखत असल्याचं त्याने सांगितलं. उजव्या विचारसरणीचे काही प्राध्यापक यामध्ये सहभागी असल्याचा त्याचा दावा आहे.

 
जेएनयूमध्ये तिसऱ्या वर्षाचा पीएचडीचा विद्यार्थी असणारा आशिषही असंच काहीसं सांगतो. पण तो या वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिनही आहे. या ग्रुपच्या अनेक अॅडमिन्सपैकी एक नाव त्याचं आहे.
 
पण आपल्याला दुसऱ्या कोणीतरी ग्रुपमध्ये अॅड केलं आणि अॅडमिन केलं, त्यावेळी आपण कँपसमध्ये नव्हतो, असं त्याचं म्हणणं आहे.
 
त्याने सांगितलं, "त्या घटनेच्या रात्री मी घरून परतलो. रात्री 10 वाजता मी जेएनयूला पोहोचलो. आणि पाच तास बाहेर उभा होतो. या घटनेशी माझं काही देणं-घेणं नाही."
 
या घटनेच्या रात्रीपासून आपल्याला सतत फोन येत असून त्यातले अनेक लोक आपल्याला धमक्या देत आहेत, ठावठिकाणा विचारत असल्याने आपण घाबरलो असल्याचं या सगळ्यांचंच म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रिन्स हॅरी आणि मेगन 'वरिष्ठ' रॉयल पदाचा करणार त्याग