छत्रपती संभाजी नगरमध्ये ( आधीचं औरंगाबाद) मुलीनं केलेलं लग्न पसंत नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडील आणि भावानं तिच्या नवर्याची हत्या केली. या घटनेकडं मुख्यत्त्वे दोन दृष्टिकोनातून पाहिलं गेलं.
पहिला मुद्दा म्हणजे जातीयवादाचा.
मुलगी बौद्ध आणि मुलगा गोंधळी समाजातील असल्यानं मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य झालं नाही म्हणून त्याची हत्या केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, जातिव्यवस्थेची अमानुष उतरंड पाहिली, अनुभवली आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध विविध स्तरावर लढा उभारला. एका टप्प्यावर त्यांना वाटलं की समाज परिवर्तनासाठी धर्म परिवर्तनाची आवश्यकता आहे.
अनेक धर्मांचा अभ्यास केल्यावर त्यांना समता, अहिंसा आणि शांती ही तत्त्वे मूळ असणारी बुद्धाची विचारसरणी जवळची वाटली आणि त्यांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यामुळं जेव्हा अशा पद्धतीनं बौद्ध धर्मीय व्यक्तींकडून खून होतो तेव्हा ते समाजमान्य नसतं.
बुद्धांनी आपल्या नीतिशास्त्रात द्वेष आणि आसक्तीपासून मुक्तीची प्रज्ञा दिली तर, हत्येपासून परावृत्त होण्याचा आपल्या पंचशीलात समावेश केला. ही सगळी तत्त्वे सामान्य माणसांनाही लागू होतात, मात्र ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे, त्यांनी या गोष्टी पाळणं अभिप्रेतच आहे. मात्र काही माणसं अनेक पातळ्यांवर या तत्त्वांना हरताळ फासताना दिसतात.
आपल्या मुलीनं दुसर्या जातीतल्या मुलाशी आपल्या मनाविरुद्ध लग्न करायलाच नको होतं (आसक्ती) म्हणून तिच्या नवर्याचा खून करणं (हत्या) निषेधार्ह आहे.
जातिअंतासाठी ज्या धर्माचा स्वीकार आंबेडकरांनी केला आणि आंतरजातीय विवाहाचा मार्ग हाच एकमेव उपाय असल्याचं सांगितलं त्यांच्या विचारांनाच पायदळी तुडवलं जातं.
मुळात प्रत्येक व्यक्तीचा बोधिसत्व होण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होणं, त्यासाठी बौद्ध धर्मात जन्म घेणं गरजेचं नाही. मात्र जे स्वत:ला बुद्ध आणि आंबेडकरांचे अनुयायी मानतात, 'बुद्धम शरणम गच्छामि' म्हणत जय भीमच्या नार्यात स्वत:चं बौद्ध आणि बुद्ध असणं मिरवतात त्यांना त्यामागील विचारसरणी माहिती असणं, त्यांनी ती त्यांच्या आयुष्यात अवलंबवावी ही रास्त आणि किमान अपेक्षा आहे.
जातिअंतासाठी एकत्रित जमवलेली माणसंचं जातीयवाद करू लागली तर खर्या अर्थाने धम्म आत्मसात करण्यावर विचारमंथन करावंच लागेल. आणि ही प्रक्रिया शिवाजी महाराज ते शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगणार्या सर्वांनी करायला हवा.
हे सर्व परिवर्तनाच्या वाटेवर चालणारे प्रवासी होते, त्यामुळं आत्मपरीक्षण आणि सुधारणेच्या गरजेकडं याला जात धर्मावरील हल्ला न समजता गांभीर्यानं विचार व्हावा.
या घटनेला आणखी एक किनार आहे ती म्हणजे मुलाच्या घरच्यांना या विवाहावर आक्षेप नव्हता; मात्र मुलीच्या आई, वडील, भाऊ यांना हा विवाह मान्य नव्हता.
मुलींनी स्वत:ला अनुरूप वाटणारा मुलगा निवडावा, त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घ्यावा ही बाब भारतीय आणि जगातील अनेक देशातील समाजमनात रुचत नाही.
तिनं असं काही केलं तर एक तर तिला संपवलं जातं, नाही तर तिच्या जोडीदाराला नाही तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं (ऑनर किलिंगला पर्याय म्हणून स्त्रियांना आत्महत्येस जबरदस्ती करणं हा प्रकार अवलंबला जातो आणि त्या सगळ्या “महिला आत्महत्या”म्हणून नोंदवल्या जातात.. उदा. इराणमध्ये असे प्रकार सर्रास आढळतात. 2001 मध्ये 565 महिलांनी सन्मान संबंधित गुन्ह्यात आत्महत्या केल्या.)
घटना संभाजी नगरची असो की सातार्याची (ज्यात जातीबाहेर लग्न करण्याची इच्छा असणार्या मुलीचा वडिलांनी खून केला होता आणि आपल्या कृत्याचा पश्चाताप होत नसल्याचं सांगितलं होतं.) किंवा आणखी कुठली. अशा अनेक घटनांमध्ये कुटुंबीयांनी मुलीनं आपल्या मनानं निर्णय घेतला म्हणून तिच्या आनंदाचा बळी घेतला आहे.
स्त्रियांच्या योनिशुचितेच्या, लैंगिकतेच्या कल्पनांच्या बाबतीत इतर उच्च वर्णीय समजल्या जाणार्या स्त्रियांपेक्षा दलित, आदिवासी किंवा इतर समुदाय लवचिक असल्याचं समजलं जात होतं. काही बाबतीत तसं दिसूनही येत होतं. मात्र संभाजी नगरच्या घटनेनं याला धक्का दिला असून हेही केवळ मिथक असल्याचं सिद्ध केलं.
बर्याचदा असंही दिसतं की जर एखाद्या मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं तर ती कधीच सुखात राहू नये, राहणार नाही अशी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त केली जाते.
यात दोन गोष्टी असतात, एक तर मुलीचा निर्णय कधीच योग्य असणार नाही आणि दुसरं म्हणजे जेव्हा मुलगी आनंदात दिसते तेव्हा अहंकार दुखवला जाऊन “आम्हाला दु:खी करून तू कशी आनंदात राहू शकते?” मग तुझा आनंद नष्ट करण्यासाठी, तुला धडा शिकवण्यासाठी तुलाच संपवू आणि घराण्याची इज्जत वाचवू हे अंगिकारलं जातं.
काही केसमध्ये मुलीवर हल्ला न करता तिच्या जोडीदाराचा जीव घेतला जातो (तेलंगणा घटना). यातून तू ज्याच्यासाठी आम्हाला सोडलं, त्यालाच आम्ही संपवू अशी भूमिका आणि तुला कायमचं दुखी करू अशी त्यामागची भूमिका तर असतेच, शिवाय “आमच्या कुटुंबातील मुलीशी लग्न करण्याची, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचं मूल जन्माला घालण्याची हिम्मत कशी करू शकतो,” असं म्हणून त्याची हत्या केली जाते.
एखाद्या मुलानं आपल्या घरातील मुलीशी लग्न करणं हे त्यांच्या पुरुषत्वाला दिलेलं आव्हान समजलं जातं. मग “आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत काय?” असं म्हणून त्याचा खून करून आपलं पुरुषत्व सिद्ध केलं जातं (नंतर ते पुरुषत्व जेलमध्ये विरून जातं.)
ऑनर (किलिंग) फक्त मुलीचेच?
मानव विकास पाहणीनुसार, भारतातील फक्त 5% लग्ने ही आंतरजातीय लग्ने आहेत. मुळातच लग्नव्यवस्था ही जातव्यवस्थेवर आधारलेली असल्यानं जातीतच लग्न करणं ही बहुतांश ठिकाणी पाळली जाणारी रीत आहे. ग्रामीण भागात तर अजूनही रोटी बेटी व्यवहार फक्त जातीतच ही काळ्या दगडावरची रेघ आहे किंवा हे असंच असतं इतकं ते साहजिक आहे.
दुसरं म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार सगळ्या चालीरीती, परंपरा आणि शुद्धता पवित्रता इज्जत या गोष्टी स्त्रीकडं येतात, त्यामुळे पूर्वापार चालत आलेली लग्नव्यवस्था टिकवण्यासाठी जातीबहर लग्न न करणं ही जबाबदारी पण मुलींकडेच येते.
कोणत्याही मुलग्याला जातीबाहेर लग्न करायचं नाही असे लग्नसंस्कार सहसा दिले जात नाहीत (तरी तो खानदानी पुरुषत्व टिकवण्यासाठी जातीतच लग्न करण्याला प्राथमिकता देतो आणि त्यातल्या त्यात जर तो मुलगा उच्च जातीत जन्मला असेल तर तो त्याच्या जातीत लग्न करून जातीचं आणि पर्यायाने त्याचं श्रेष्ठत्व आणि वारसा जपतो.) मुलींना मात्र जातीतच लग्न हा सांस्कृतिक संस्कार दिलाच जातो.
ऑनर किलिंग हा शब्द खास करून मुलींसाठी वापरला जातो. सन्मान नसलेलं जगणं योग्य नाही अशा विचारातून सन्मान घालवणार्या व्यक्तीला संपवणे म्हणजे ऑनर किलिंग.
कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करणं, परपुरुषाशी शरीरसंबंध, विवाहाला नकार देणं, बलात्कार होणं यातील कोणत्याही कारणासाठी महिलेचा, संबंधित पुरुषाचा जगभरात बळी घेतला जातो (यात अगदी 10 वर्षांच्या मुलीपासून ते वयस्क स्त्रीपर्यंत कुणीही बळी असतात.)
मुलं देखील स्वत:च्या मर्जीनं लग्न करतात, मात्र त्यामुळे त्यांची हत्या होत नाही. मुलाचे चारित्र्य, लैंगिकता यांच्या नियमांपासून मुभा असते.
मेन विल बी मेन अँड वुमेन मस्ट बिहेव लाईक वुमेन ही पितृसत्ताक संरचना सगळे पुरुष एकमेकांसाठी उचलून धरतात आणि स्त्रियांनाही त्यातील भागीदार, वाहक बनवतात.
त्यामुळे जेव्हा मुली आपल्या गोत्राबाहेर, जाती धर्म, वंशाबाहेर लग्न करतात म्हणून त्यांची हत्या करणं याला प्रतिशोध म्हटलं जातं. ही पद्धत फक्त भारतातच नव्हे तर मिडल ईस्ट, फिलीपाइन्स, लॅटिन अमेरिकासारख्या प्रांतात पण आहे.
स्त्रिया या जातीव्यवस्थेचं दार आहेत- बाबासाहेब आंबेडकर
1916 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया नावाचा निबंध लिहिला त्यात ते म्हणतात की जात ही विवाहसंस्थेत स्त्रियांवर बंधने लादते, तर पुरूषांना मोकळीक देते. भारतीय समाजमन धर्म ग्रंथांना फार मान देतं, त्यामुळे त्यात लिहीलेल्या गोष्टी आचरणात आणल्या जातात. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे,
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने,
अस्वतन्त्रा: स्त्रिय: कार्या: पुरुषै: स्वैर्दिवानिशम
म्हणजे मुलगी लग्नाला आल्यानंतर जो पिता मुलीचं लग्न लावून देत नाही तोवर निंदनीय आहे. त्यामुळे आपसूकच मुलीने आपल्या पित्याच्या मर्जीनुसारच लग्न करावं किंवा प्रत्येक वडिलांनीच आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं हे अलिखित ठरले आहे. आणि तिनं ते ऐकलं नाही तर हिंसेचं अस्त्र उगारतात.
सूक्ष्मेभ्योऽपि प्रसङ्गेभ्यः स्त्रियो रक्ष्या विशेषतः ।
द्वयोर्हि कुलयोः शोकं आवहेयुररक्षिताः ।।
म्हणजे आपल्या स्त्रीच्या रक्षणाचा प्रयत्न करणे, हे आपले कुटुंब, आत्मा आणि आपल्या धर्माचे रक्षण करणे होय.
त्यामुळे मुलगी जेव्हा स्वत:च्या लग्नासाठी जोडीदार शोधते तेव्हा तिचं रक्षण (तिच्या इज्जतीचं आणि इज्जत ही शरीरात असते) करणे हे अख्ख्या कुटुंबाचेच आद्य कर्तव्य बनते.
त्यामुळे संभाजी नगरसारख्या घटनेत आई जावयाचे पाय धरते आणि वडील, भाऊ चाकूने वार करून मुलीची अर्थातच कुटुंबाची इज्जत वाचवतात.
भारताचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्त्रीवर कोणत्याही धर्मांनं बंधनं घातली तर त्यावर सर्व जात धर्मियांचं एकमत होतं आणि थोड्या फार फरकानं हे नीती नियम सर्व धर्मातील स्त्रियांना लागू केले जातात.
मग ती बंधने स्त्रियांच्या लैंगिकतेवरील असो की इतर कोणतीही सांस्कृतिक वा धार्मिक, शैक्षणिक. उदा. आंतरजातीय विवाह करू नये (प्रेमात पडू नये) ही जवळजवळ सगळ्याच धर्मात जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठीची पूर्वअट असते आणि ही अट मोडली की मुलीशी संबंध तोडणं, तिला बेदखल करणं, आत्महत्येला प्रवृत्त करणं, जीव घेणं आलं.
असे सन्माना किंवा शिक्षणासंबंधी कोणत्याही अटी, नियम मुलांसाठी केले केले नाहीत. मुलग्यांनी जर इतर जात, धर्म, वंशातील मुलीशी लग्न केलं तर एवढा गहजब केला जात नाही किंवा कुटुंबाची/जात/धर्माची इज्जत गेली असं म्हटलं जात नाही.
अशा घटना ऐकिवातसुद्धा नाहीत ज्यात उच्च जातीय मुलानं आंतरजातीय लग्न केलं म्हणून त्याच्या कुटुंबाने त्याचा खून केला (किंवा त्याच्या बायकोचा). थोडक्यात काय तर, जे पुरुषधर्म पुरुषांसाठी दिले आहेत तेच स्त्रियांसाठी अधर्म आहेत.
दुसरीकडे स्त्रिया आणि शूद्र सारखेच आहेत आणि ते शिक्षेस पात्र आहेत असं म्हटल्यामुळं स्त्रीने स्वत: जर निर्णय घेतले तर तिला शिक्षा करायला हवी हे समाज मनात रुजलेलं आजे. ( नामदेव ढसाळ स्त्रियांना 'दलित' म्हणत असा उल्लेख आढळतो.)
याचा अर्थ आंतरजातीय लग्न मुलीनं केलं आहे की मुलांनं यावर त्याची तीव्रता ठरते. शिवाय मुलीनं उच्च जातीत जन्मलेल्या मुलाशी लग्न केल्यास विरोधाची तीव्रता आणखी वेगळी असते आणि जर तो दलित असेल तर वेगळी. यामागे दोन कारणे असतात, एक तर मुलीला होणारं अपत्य हे आपल्याच जाती-धर्मात राहावे आणि दुसरं म्हणजे आपल्या मुलीचं शुद्ध बीज दुसर्या (तेही खालच्या समजल्या जाणार्या) जातीत जाऊन अपवित्र किंवा कनिष्ठ दर्जाचं होऊ नये. (या उलट जर पुरुष उच्च कुलीन असेल आणि स्त्री कनिष्ट कुलीन तर ती संतती पुरुषाच्याच खानदानात राहते.) म्हणून बाबासाहेब स्त्रीला जातिव्यवस्थेचं प्रवेशद्वार म्हणतात.
याच पार्श्वभूमीवर आधारुन स्त्रियांच्या लैंगिकतेवर प्रचंड बंधने घातली जातात.
ग्रामीण भागात सध्या असं दिसून येतं की मुलीला पाळी आली रे आली की तिचं शिक्षण मध्येच बंद करून लग्न उरकून टाकण्याकडं पालकांचा कल असतो. मुलीचे संबंध आले किंवा मुलगी पळून गेली तर ही त्यामागील भीती असते. (युनिसेफच्या आकडेवारीनुसार 43% मुली माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत.).
धार्मिक ग्रंथ आणि स्त्री स्वातंत्र्य
अनेक जाती धर्म असणार्या भारतात लोकांवर धर्माचा प्रचंड पगडा आहे. इथे जवळजवळ 80% हिंदू समाज राहतो, त्यामुळं हिंदू धर्मातील अनेक चालीरीती, विचारसारणी इतर सर्वच धर्मियांनी थोड्या फार प्रमाणात अवलंबली आहे.
आता बौद्ध असणारे पूर्वी हिंदू असल्यानेही मनुवादी विचारसरणी (मनू ही व्यक्ती नव्हे प्रवृत्ती आहे) त्यांच्यामध्ये काही प्रमाणात राहिली आहे. त्यामुळं कोणत्याही स्त्रीला प्रेम करण्याचा आणि स्वत:साठी इच्छित जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे हे बहुतांश समाजाला मान्यच होत नाही. तुलसीदास यांनी म्हटल्यानुसार स्त्रीला जर स्वातंत्र्य दिलं तर ती बिघडेल.
स्त्रीवरील लैंगिक बंधनांबाबत बोलायचे झाल्यास स्त्रीने उच्च समजल्या जाणार्या जातीतल्या पुरुषाशी संबध केल्यास तिला शिक्षा होणार नाही मात्र तिनं खालच्या समजल्या जाणार्या पुरुषाशी संग केल्यास ती कठोर शिक्षेस पात्र राहिल. भारतीय समाजात विवाहाचा आणि शरीर संबंधांचा जवळचा संबंध आहे.
मनुनेच लिहिलेल्या एका रचनेत तो म्हणतो की शूद्र फक्त शूद्र स्त्री सोबत लग्न करू शकतो, क्षत्रिय पुरुष क्षत्रिय किंवा त्या खालच्या कुळातील स्त्रीशी लग्न करू शकतो तर ब्राह्मण पुरुष मात्र चारही कुळातील स्त्रियांसोबत लग्न करू शकतो.
या सर्वांत महत्वाचं एकच, पुरुष उच्चकुलीन आणि स्त्री कनिष्ट कुळातील असावी. थोडक्यात काय, लग्नात स्त्रीनं उच्च कुलीन नसावं. प्रतिलोम विवाह हिंदू धर्मात किंवा वेदांमध्ये अमान्य आहे.
सर्वच धर्मातील स्त्रीला गौण समजण्याची विचारसारणी या सगळ्या प्रकारात महत्वाची भूमिका बजावते. कन्फुशिअस म्हणतो की “शंभर मुली एका मुलाइतक्याही किंमतीच्या नाहीत.”
“पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत कारण अल्लाने त्याला श्रेष्ठ बनविले आहे,” असं मुस्लिम समाज मानतो. ख्रिश्चन धर्मात अजूनही चर्चच्या प्रमुख पद(प्रिस्टहुड) घेण्याचा अधिकार स्त्रियांना नाही.
हीच विचारसारणी सर्वसामान्य माणसात भिनलेली असल्यानं स्त्रियांच्या एकूणच निर्णय स्वातंत्र्यावर, तिच्या शरीरावर बंधने आणली जातात. मग तिने दिलेला एकतर्फी प्रेमातला नकार न पचवता आल्यानं तिचे तुकडे करणं असो की स्त्री एकटी दिसली म्हणून तिच्यावर सत्तांध पुरुषांकडून मंदिरात बलात्कार करणं असो, असे गुन्हे पुरुष करतात.
यातला आणखी एक मुद्दा म्हणजे सगळीच आंतर जातीय किंवा आंतरधर्मीय लग्नं वर्ज्य नाहीत, काहीच प्रकारची लग्नं अमान्य आहेत. हिंदू मुलाने जर मुस्लिम किंवा इतर धर्मीय मुलीशी लग्न केलं तर तो 'लव्ह जिहाद' नाही, मात्र जर हिंदू किंवा इतर धर्मीय मुलीनं मुस्लीम मुलाशी लग्न केलं तर तो खात्रीपूर्वक 'लव्ह जिहाद'च असणार असा त्याला धार्मिक रंग दिला जातो आहे.
संभाजी नगरसारख्या घटना झाल्या की मुली कशा बिघडायला लागल्या, त्यांनी वडिलांचे ऐकले असते तर सुखात राहिल्या असत्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मुख्यत्वे पुरुषांकडून दिल्या जातात (इंदुरीकर महाराज किंवा हंकारे अशा विचारसरणीचा प्रसार करतात आणि त्यांना ऐकायला गर्दी होते.)
“तुला ज्या आईवडिलांनी एवढी वर्षे सांभाळून तू आईवडिलांची झाली नाहीस. तुला दोन दिवसांचं प्रेम जवळचं झालं. मुलींनो, आईवडिलांची थोडी तरी लाज ठेवा, या पोरीही मोकाट झाल्या आहे. विनाशाची घंटा आहे. आईवडिलांनी लक्ष ठेवावे, मुलींनो, बापाला मान खाली घालायला लावू नका” अशा प्रकारच्या अनेक हीन कमेंट्स या घटनेवरील व्हिडिओवर केल्या जातात आणि या कमेंट्सला सर्वांत जास्त लाईकपण केलं जातं ही पितृसत्ताक जातीयता आहे (अशा कमेंट प्रेम विवाह करणार्या मुलाला केल्या जात नाहीत हेही वास्तव.).
खेदाची गोष्ट म्हणजे आई वडिलांनी लावून दिलेल्या लग्नातील नवरा जर तिला त्रास देत असेल किंवा तिचा त्याने खून केला तरीही ही मंडळी वडिलांनी मुलगा नीट पाहून लग्न लावून दिले नाही किंवा मुलीच्या मर्जीनं वडिलांनी लग्न लावून द्यायला हवं होतं असं म्हणताना आढळत नाहीत. हीच पुरुषी दांभिकता आहे. शिवाय जी मुलगी मतदान करून देशाचा नेता निवडते, नोकरी करते, आई वडिलांचा सांभाळ करते तिला तिचा जोडीदार निवडण्याची परिपक्वता नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे.
व्यवस्था स्त्रियांना संरक्षण देण्यास अपयशी
अॅट्रोसिटी कायदाही आंतरजातीय विवाहांना संरक्षण देण्यास अयशस्वी ठरला आहे. अशा जोडप्यांना सुरक्षा देणार्या यंत्रणा नाहीत. 21व्या शतकात देखील आंतरजातीय विवाहोच्छुक जोडप्यांना सुरक्षित राहण्यासाठी निवारा, मूलभूत आर्थिक आधार मिळत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं नुकतच असं एक सेंटर सातार्यात उभं केलं आहे.
“आम्ही काय सतत तुमच्या मागं बंदूक घेऊन फिरू काय?” असं संरक्षण मागणार्या मुलीला पोलिसांनी म्हणणं केवळ असंवेदनशीलता किंवा कर्तव्यातील कसूर नाहीये तर पोलिसांच्या अंगी असणारी पितृसत्ताक मानसिकता त्यांच्या वाक्यातून कृती करत असते. पोलीस व्यवस्थेतील व्यक्तीही पितृसत्ताक मानसिकतेत वाढल्यानं ते स्त्रियांच्या बाबतीत घडणार्या गुन्ह्यांमध्ये 'स्त्रियांनी असं वागायला नको होतं, ही त्यांचीच चूक आहे,' अशा विचारानं पितृसत्ताक व्यवस्था बळकट करण्याच्या आणि पुरुष निर्दोष असण्याच्या गृहीतकाच्या दिशेनं तपास आणि कारवाई होण्याही शक्यता असते (याला अपवाद आहेत हे मान्यच.). एकुणात सगळ्याच कायदेशीर, न्याय यंत्रणाच्या संवेदनशीलतेवर काम होण्याची चालत आलेली गरज अजूनही आहेच.
कायद्याच्या अंमलबाजवणीतील दिरंगाई, त्यातील राजकीय नेत्यांची लुडबूड अशानं 'आपण खून केला तरी यातून बाहेर पडू,' अशी मानसिकता झाल्यानं कायद्याचा धाक कमी झालेला आहे. अशा पद्धतीनं व्यवस्था पुरस्कृत हिंसा थांबवण्याची गरजेचं आहे.
महिलांना अधिकार मिळावेत यासाठी
जातव्यवस्था आणि पितृसत्ता एकमेकांच्या हातात हात घालून चालतात आणि स्त्री या दोन्ही व्यवस्थेत बळी असते. पितृसत्ता फक्त जात व्यवस्था बळकट करत नाही तर ती प्रत्येक टप्प्यावरील अख्खं स्त्रीजीवन कंट्रोल करते. पितृसत्ता, जात धर्म, वंश द्वेष, असुरक्षितता नियोजनपूर्व पेरली जाते. हा द्वेष केवळ survival/अस्तित्व संघर्षाच्या पुढचा असतो.
गेल्या काही वर्षात तर या संघर्षाला आणखी खतपाणी घातलं जातंय. या व्यवस्था पुरस्कृत हिंसेला समाजानं थारा दिल्यानं त्यात सगळ्यात जास्त स्त्रिया होरपळत आहेत. यावर सर्वच जात धर्म समुदायातील व्यक्ती, नेते कार्यकर्त्यांनी बोलायला हवंय.
जात व्यवस्थेतील महिलांवर महिला म्हणून आणि विशिष्ट जातीतील महिला म्हणून होणार्या दुहेरी अत्याचारावर आणि उपायांवर बोललं गेलं पाहिजे. बर्याचदा विशिष्ट गुन्ह्याला जातीचा मुद्दा म्हणून पाहिलं जाऊन स्त्री म्हणून होणार्या अत्याचाराचा मुद्दा दुर्लक्षिला जाण्याची शक्यता असते.
आंतरजातीय/धर्मीय विवाह करणार्या जोडप्यांसाठी, खास करून मुलींसाठी संरक्षण आणि इतर सुविधा असणार्या यंत्रणा तात्काळ उभारल्या जाव्या.
अशा प्रकारच्या घटनेतील खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत, शिवाय कर्तव्यात कसूर करणार्या पोलिसांवर कडक कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे. पोलिस, न्याय किंवा इतर सरकारी यंत्रणातील कर्मचार्यांचे स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांचे हक्क यावर प्रशिक्षण होणं आवश्यक.
एकूणच महिलांवर केल्या जाणार्या अपमानास्पद वक्तव्यांवर पोलीस, कोर्टाने स्वत:हून दखल घेऊन तात्काळ गुन्हे दाखल कारावेत. अशी वक्तव्ये स्त्रियांबद्दल फेक नरेटिव्ह तयार करून पुरूषांना त्यांच्यावर अत्याचार करण्यास कारणीभूत असतात. शासनाच्या बहिणींना दिल्या जाणार्या 1500 रु. पेक्षा (जे तसेही नवऱ्याच्या खिशात जाणार आहेत.) त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्याची गरज आहे.
सामाजिक किंवा कौटुंबिक पातळीवर पाहायला गेल्यास ध्यानात येतं की सामाजिकिकरणाच्या प्रक्रियेत मुलींना जातीतच आणि घरचे निवडतील त्याच्याशीच लग्न करण्याचे संस्कार मिळतात तर मुलग्यांसाठी त्याला हवा तो जोडीदार निवडू शकतो असं वातावरण मिळतं.
त्यामुळं मुलींच्या योनिशुचितेच्या संकल्पना नव्याने बोलण्यासाठी, पालकांशी संवाद साधण्यासाठी कुटुंबकेंद्री कार्यक्रम आखण्याची गरज आहे.
वडिलांना हे सांगण्याची आवश्यकता आहे की जरी तुम्ही मुलीचे जन्मदाते असाल तरीही तुम्हाला तिचा किंवा तिच्या जोडीदाराचा जीव घेण्याचा अधिकार नाहीच(खरं तर पोरीच्या पाठीचा कणा बनून आयुष्यभर तिला स्वतंत्रपणे उभं राहायला मदत केली पाहिजे.)
अशा केसमध्ये दिसणार्या हत्या या शेवटचं टोक असतं, मात्र मुलींचं आयुष्य बंदिस्त करणार्या घटना त्यांच्या आयुष्यात रोजच घडत असतात. अगदी जन्म होईल की नाही इथपासून ते शिक्षण कोणतं घ्यायचं, लग्न कुणाशी, मुलं किती इथपर्यंत कशातच मुलींचा सहभाग नसतो.
शहरात काही प्रमाणात त्यांना अधिकार मिळत असले तरी अजूनही ग्रामीण भाग मुलींच्या हक्कांच्या बाबतीत दूर आहे. भारतीय संविधानाने दिलेलं स्त्री पुरुष समतेचं तत्त्व प्रत्यक्षात यायला हवं.
महिलांच्या इच्छेनुसार लग्नाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी, त्यांचे सक्तीचे विवाह रोखण्यासाठी, सन्माना संबंधित केसमध्ये कडक कायदेशीर कारवाईची गरज आहे. आवश्यकता असल्यास कायद्यात दुरूस्ती करावी (आपल्याकडे बाल विवाह कायदा अस्तित्वात असला तरी मुलींची बालपणी जबरदस्तीनं लग्नं लावून देण्याचं प्रमाण खूप आहे. मोठ्या मुलींची जबरदस्ती विवाह लावून देणे याबद्दल कुठेही गुन्हे नोंद झाल्याचे दिसत नाही.)
पोरीचा बाप हा अख्खा बाप नसतो, तो अर्धा समाज असतो. बर्याचदा जात पंचायत किंवा समाजातील इतर घटक वडिलांना मुलीनं घेतलेल्या निर्णयामुळं अपमानित करतात. अशावेळी वडिलांनी मुलीच्या पाठीशी खंबीर उभं राहिल्यास समाजाची तोंडं आपोआप बंद होतील. बापानं सबुरीनं घ्यावं. शेवटी त्याचंच लेकरू असतं ते. काहीही करावं, जीव तरी निदान घेऊ नये.
माणसाला आनंदी, समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत करणारी कोणत्याही धर्माची तत्वे पाळली जावी, मात्र पुरातन काळात पुरुषांनी पुरुषांसाठी पुरुषांच्या सोयीच्या लिहीलेल्या धर्मग्रंथातील अनिष्ट, लिंगभेद करणार्या गोष्टी पाळणं आता समाजानं सोडून द्यायला हवं.
धर्मचिकित्सा ही टीका नसते तर त्या धर्माला काळानुरूप समृद्ध करण्यासाठी मांडले गेलेले विचार असतात. त्यामुळं कोणीही अशा घटनांवर काहीही भाष्य केलं किंवा गुन्ह्याचा निषेध जारी केला तरी त्या व्यक्तीवर विशिष्ट जात धर्म समूहातील व्यक्तींनी समुह बनून ट्रोल करणं, धमकावणं हा सांस्कृतिक आणि राजकीय दहशतवाद आहे. याला आवर घातला गेला पाहिजे.
पुरुषांच्या मानसिकता बदलावर काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पुरुषांची संवेदनशीलता वाढवण्यासाठी बजेटमध्ये वेगळी तरतूद हवी.
कारण गेली अनेक दशके स्त्रियांना त्यांचे अधिकार सांगितले जातात, मात्र स्त्रीयांचे कोणते अधिकार आहेत जे पुरुष त्यांच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाहीत, स्त्रिया, त्यांचे शरीर ही पुरुषानं कष्टानं कमावलेली खाजगी मालमत्ता नव्हे, स्त्री आणि पुरुष एकमेकांचे विरोधक नसून पूरक आहेत, स्त्रियांपासून असुरक्षित वाटून तिच्यावर सत्ता मिळवण्याची भावना स्त्री पुरूष दोघांनाही दु:खी करणारी आहे, स्त्रीच्या स्वातंत्र्यात पुरुषाची मुक्तता आहे आणि पुरुषांनी स्त्रियांवर, आपल्या जन्मदात्या मुलीवरदेखील अन्याय करण्याचा अधिकार नाही आणि असं झाल्यास पुरूषांना शिक्षा देण्यात येईल हे पुरूषांना सांगण्याची जास्त गरज आहे.
जोवर स्त्रियांच्या लैंगिकतेवर, त्यांच्या अख्ख्या आयुष्यावर पितृसत्ता आपलं नियंत्रण ठेऊन असेल तोवर अशा ऑनर किलिंगच्या, इज्जत वाचवण्याच्या नावाखाली मुली आणि त्यांचे जोडीदार मारले जातील. त्यामुळं आता पुरुषांसोबत काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
सत्तेचं विकेंद्रीकरण झालं किंवा व्यक्तींच्या हातात सत्ता आली की तिच्यावर होणार्या अत्याचारांची संभाव्यता कमी होते. मुलींनी शिकून आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं तर काही गोष्टी नक्कीच बदलतात.
वर्ल्ड बँकेच्या 2022 च्या आकडेवारीनुसार भारतात फक्त 24% मुली आणि 74% पुरुष कामगार आहेत. महिलांचा श्रमातील 2010 साली 29% सहभाग होता जो 2020 साली 24% म्हणजे कमी झाला. जिथे स्त्रियांच्या एकूणच आयुष्याबद्दल निर्णय घेतले जातात त्या राजकीय सत्तेत त्यांचे प्रमाण वाढण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या लोकसभेत 15%, राज्यसभेत 13% स्त्रिया आहेत (हेच प्रमाण स्वीडन, दक्षिण आफ्रिका या देशात 45%पेक्षा जास्त आहे.)
सध्या सत्तेत असणार्या स्त्री नेत्यांनी, मंत्र्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा. महिला आयोगानं आपल्या अधिकाराच्या कक्षा रुंदावायला हव्यात.
बर्याच प्रगल्भ प्रेमाच्या केसमध्ये घरचे तयार नाहीत म्हणून तरुण तरुणी लग्न करत नाहीत किंवा आत्महत्या करतात. अशावेळी तरुणांनी, संघटनांनी पुढाकार घेऊन अशा जोडप्यांना आधार द्यायला हवा. भारतीय समाजात प्रेम करणं हीच बंडखोरी आणि आंतरजातीय/धर्मीय प्रेम किंवा लग्न हा विद्रोह समजला जातो. मात्र तरुणींना हा यल्गार करावा लागेल तरच ही परिस्थिती बदलायला मदत होईल.
माय बॉडी माय राईट म्हणत बंधने झुगारायला हवी.आयुष्याचे निर्णय घ्यायला हवेत(कधीकधी ते चुकू शकतात.तरीही.).
कधीकधी काहीच मुलींनी चाललेली अनवट, वेदनेची वाट मागे चालणार्या मुलींसाठी कमी खाच खळग्यांची आणि प्रकाशाकडे, स्वातंत्र्याकडे, मुक्ततेकडे, बुद्धाकडे नेणारी ठरते. मुलींनी, माणसांनी बुद्ध, कबीर होण्याकडं आपला प्रवास करायला हवा.
(लक्ष्मी यादव डिजिटल क्रिएटर आणि स्त्री-पुरुष समतेवर प्रशिक्षण घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
Published By- Priya Dixit