Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऋतुजा लटकेंसमोर भाजपच्या माघारीचे 'हे' आहेत 4 अर्थ

ऋतुजा लटकेंसमोर भाजपच्या माघारीचे 'हे' आहेत 4 अर्थ
, सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (17:59 IST)
मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतलीय. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार अर्ज मागे घेतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय.
 
भाजपच्या या माघारीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय.
 
काल (16 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लटकेंना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही अशीच भूमिका मांडली. त्यानंतर आज (17 ऑक्टोबर) अखेर भाजपनं माघारीची घोषणा केली.
 
भाजपच्या या माघारीचे आणि शिवसेनेच्या संभाव्य विजयाचे नेमके अर्थ काय, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. यासाठी बीबीसी मराठीनं महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांशी बातचित केली आणि त्यांची याबाबत मतं जाणून घेतली.
 
1) 'भाजपला पराभवाची भीती दिसली म्हणून माघार'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल (16 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून ऋतुजा लटकेंना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या की, भाजपला पराभव दिसू लागल्यानं राज ठाकरेंना पुढे करून माघार घेण्याचं कारण शोधलं जातंय.
 
या प्रतिक्रियांशी सहमत होत, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात की, "भाजपला पराभव दिसला म्हणून घेतलेली ही माघार असल्याचं स्पष्ट आहे. गेल्या दोन्ही निवडणुका म्हणजे 2014 आणि 2019 या निवडणुकीत शिवसेनेची मतं स्थिर राहिली आहेत. त्यात काँग्रेसची मतं 30 हजाराच्या आसपास आहेत. ती आता शिवसेनेला मिळणार होती. यातूनच भाजपचा पराभव स्पष्ट होतो. हे भाजपला कळल्यानंच माघारीचा निर्णय घेतला गेला."
 
"सहानुभूतीपूर्ण जर भाजपनं निर्णय घेतल्याचं म्हणायचं, तर मग ऋतुजा लटकेंना निवडणूक लढवताना अडचणी का निर्माण केल्या गेल्या? त्यामुळे सहानुभूती वगैरे यात दिसत नाही. राज ठाकरेंचं पत्र ही भाजपच्या माघारीची स्क्रिप्ट होती," असंही चोरमारे सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर या सुद्धा विजय चोरमारेंशी सहमत होतात. मात्र, भाजपच्या निर्णयाच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित करतात.
 
मृणालिनी नानिवडेकर म्हणतात की, "अंधेरी पोटनिवडणुकीकडे मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकांची नांदी म्हणून पाहिलं जात होतं. पोटनिवडणुकीत सहानुभूती अनेकदा वरचढच ठरते. तिथं राजकीय मुद्दे बऱ्याचदा कमकुवत ठरतात. त्यामुळे माघार घेणं भाजपसमोरची अपरिहार्यताच होती.
 
"प्रश्न इतकाच की, भाजला ही जाग इतक्या उशिरा का आली? उमेदवाराचा फॉर्म वाजत-गाजत भरता, त्याच्या मतदारसंघात 10-10 आमदारांना प्रचारासाठी उतरवता, होमवर्क करता, हे सगळं केल्यानंतर माघारीच्या निर्णयावर पोहोचावं लागतं आणि तेही महापालिका निवडणुका तोंडावर असताना. मात्र, पराभवानंतर जो फटका बसला असता, तो आता फटका भाजपला थोडा कमी बसेल. कारण लोक हे सर्व विसरून जातील."
 
2) भाजपनं सहानुभूतीपूर्ण विचार केला का?
राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रातून लटकेंना पाठिंबा देण्याची विनंती करताना, सहानुभूतीचा मुद्दा मांडला. भाजपनं माघार घेतल्यानंतर राज ठाकरेंनी त्याच धर्तीवर फडणवीसांचे अभार मानलेत.
 
मात्र, याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की, "यापूर्वी पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर अशा तीन पोटनिवडणुका झाल्या. या तिन्ही ठिकाणी भाजपनं उमेदवार दिला होता. तिथं त्यांनी सहानुभूती वगैरे दाखवली नाही. त्यामुळे अंधेरीतून माघार घेणं यात सहानुभूती हा मुद्दाच लागू होत नाही. परिणामी भाजपला पराभव दिसला हे म्हणता येतं."
 
"शिवाय, निवडणूक झाली असती आणि त्यात ऋतुजा लटके जिंकल्या असत्या, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा बूस्ट मिळाला असता, याची जाणीव भाजपला झाली," देशपांडे पुढे सांगतात.
 
3) 'पराभव झाल्यास उद्धव ठाकरेंना बूस्ट मिळण्याची भीती'
भाजपच्या माघारीकडे आणखी एका दृष्टिकोनातून पाहिलं जातंय की, जर ही निवडणूक पार पडली असती आणि त्यातू ऋतुजा लटके जिंकल्या, तर त्यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बूस्ट (प्रोत्साहन) मिळेल.
 
याबाबत विजय चोरमारे म्हणतात की, "अंधेरी पोटनिवडणूक झाली आणि आपण हरलो, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा बूस्ट मिळू शकतो, ही भीती जशी भाजपला होती, तशीच राज ठाकरेंनाही होती. हा बूस्ट उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीत फायद्याचा ठरला असता."
 
ते पुढे सांगतात, "निवडणूक झाल्यानंतर एक राजकीय वारं वाहतं. जिंकलेल्याच्या बाजूनं वातावरण निर्मिती होते. अंधेरीत निवडणूक होऊन ऋतुजा लटके जिंकल्या असत्या, तर मुंबई महापालिकेआधी पक्षांतरं करणाऱ्यांना चाप बसला असता. हे सर्व टाळण्यासाठीच भाजपनं माघार घेतल्याचं दिसून येतं."
 
4) उद्धव ठाकरेंना नेमका काय फायदा होईल?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की, "शिवसेना ही अशी संघटना आहे, ज्यावेळेस त्यांना लढण्याची संधी मिळते, तेव्हा ती वाढते. लढताना शिवसेना वाढते, शांत काळात क्षीण होते.
 
"दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मिळवणं, ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करवून घेणं अशा छोट्या छोट्या लढाया उद्धव ठाकरे जिंकत आलेत. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचा विजय ही घटना छोटी वाटत असली तरी उद्धव ठाकरेंचं मनोबल वाढवणारी आहे."
 
"पक्षाचं नाव, चिन्ह गेल्यानंतर, आमदार-खासदार गेल्यानंतरही उद्धव ठाकरे लढतायेत आणि छोट्या छोट्या लढाया जिंकतायेत, असा संदेश यातून शिवसैनिकांमध्येही जातो," असंही अभय देशपांडे म्हणतात.
 
मृणालिनी नानिवडेकर म्हणतात की, "उद्धव ठाकरेंना समाधान मिळेल. परंपरेचं पालन केलं गेलं, दिवाळीत प्रचार करत बसावं लागलं असतं, खर्च वाचला. पण निवडणूक झाली असती, तर लोकांमध्ये भावना काय आहे, हे दिसून आलं असतं. आता उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, ती स्पष्टपणे या निवडणुकीतून समोर आलं असतं."
 
उद्धव ठाकरेंना काय फायदा होईल, याबाबत विजय चोरमारे म्हणतात, "आता भाजपनं माघार घेतल्यानं उद्धव ठाकरेंना तसा थेट काहीच फायदा होताना दिसत नाहीय. 'खर्च वाचला' हाच काय तो उद्धव ठाकरेंना फायदा आहे."
 
निवडणूक झाली असती आणि ते जिंकले असते, तर फायदा अधिक झाला असता, असंही विजय चोरमारे म्हणाले.

Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yellow alert on Diwali ऐन दिवाळीत येलो अलर्ट