उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मंगळवारी (9 मार्च) त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपमधल्या अनेक नावांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू होती.
पण बुधवारी (10 मार्च) सकाळी भाजपच्या नेतृत्वाने तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
56 वर्षांचे रावत हे यापूर्वी भाजपचे उत्तराखंडचे प्रमुख होते. ते पौडी गढवाल लोकसभा मतदार संघातले खासदार आहेत.
डेहराडूनमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भाजपचे 50पेक्षा जास्त आमदार आज सकाळी डेहराडूनमधल्या पक्ष मुख्यालयात दाखल झाले होते. या बैठकीत राज्यातले पक्षाचे सगळे लोकसभा खासदारही सहभागी झाले होते. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, माला राज्यलक्ष्मी, अजय भट्ट आणि नरेश बन्सल या बैठकीला हजर होते.
रावत यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री आणि पक्ष प्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी आभार मानतो. लहान गावातल्या एका पक्ष कार्यकर्त्याला इतकी मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. मला हे स्थान मिळेल याची कधी कल्पनाही मी केली नव्हती. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करीन आणि गेल्या चार वर्षात झालेल्या कामांना गती देईन."
उत्तराखंडची निर्मिती झाल्यानंतर तीरथ सिंह रावत तिथले पहिले शिक्षण मंत्री होते. त्यानंतर 2007मध्ये त्यांना उत्तराखंड राज्याचे सरचिटणीस करण्यात आलं. 2012मध्ये ते आमदार झाले आणि 2013मध्ये त्यांच्याकडे राज्यातली भाजपची जबाबदारी सोपवण्यात आली. तीरथ सिंह रावत यांना एक लो-प्रोफाईल नेता म्हटलं जातं आणि ते गृह मंत्री अमित शाहांच्या जवळचे मानले जातं.
2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तराखंडमध्ये मोठं यश मिळालं. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसभेत भाजपला 57 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला फक्त 11 जागा जिंकता आल्या होत्या.