Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे सरकार केव्हाही पडू शकतं - कुमार केतकर

उद्धव ठाकरे सरकार केव्हाही पडू शकतं - कुमार केतकर
, गुरूवार, 10 मार्च 2022 (23:05 IST)
महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात केतकरांनी आपली भीती व्यक्त केली.
 
महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भीती वाटते का असा प्रश्न चर्चेवेळी केतकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं.
 
याच कार्यक्रमात भाजपचे नेते प्रकाश जावडेकर देखील होते. त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की भाजप उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहात का?
या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, सध्या महाविकास आघाडीकडे कागदावर बहुमत आहे. त्यांच्यात जर काही असंतोष असेल तर तेच स्वतः पडतील. त्यांचं सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीच केलं नाही.
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य केलं जात आहे असा देखील आरोप आहे, त्यावर काय सांगाल असं विचारले असता जावडेकर म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे आहेत असा आरोप करणं चुकीचं आहे, त्या यंत्रणांना आम्ही सांगितलं नाही किंवा ते कुणाच्या ऐकण्यात नसतात. पण कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नांबद्दल पारदर्शक असाल, आयकर भरत असाल तर तुम्हाला कसलीही भीती असणार नाही.
 
कर्नाटक, मध्यप्रदेशात काय घडलं?
राज्यातले सरकार पडण्याची भीती वाटते का, या प्रश्नाचं उत्तर देताना केतकर म्हणाले, भाजप हा अत्यंत साधनशूचिता असणारा पक्ष आहे. कर्नाटकमध्ये काय झालं, मध्यप्रदेशात काय झालं हे पाहिलं की लक्षात येतं. ज्यावेळी तथाकथित लोटस कॅंपेनमध्ये लोक स्वतःच राजीनामा देतात आणि निवडणुकीत बहुमत मिळालेल्या सरकारला जुमानत नाहीत आणि पुन्हा निवडून येतात. हे सर्व कसं रीतसर, घटनात्मक पद्धतीने होतं.
 
हे अत्यंत साधनशूचितेनं होतं. त्यांना वाटलं म्हणून ते कर्नाटक सरकारमधून बाहेर पडले, त्यांना वाटलं म्हणून ते मध्यप्रदेश सरकारमधून बाहेर पडले. गोव्यातल्या लोकांनाच असं वाटलं की बाहेर पडावं, कारण भाजप हा साने गुरुजींच्या विचारावर चालणारा पक्ष आहे, हे मला माहीत आहे, असं केतकर उपहासाने म्हणाले.
 
सरकार पडण्याची भीती का वाटते?
महाविकास आघाडी सरकार पडणार का असं विचारलं असता केतकर म्हणाले ती भीती पहिल्या दिवसापासूनच आहे कारण हे ऑपरेशन लोटस करणार.
 
"हे तपास यंत्रणांचा वापर करतात की नाही याबाबत वाद असू शकतो पण आपण हे पाहिलं आहे की नारायण राणे भाजपमध्ये आल्यापासून त्यांच्याबद्दलच्या भ्रष्टाचाराच्या चर्चा पूर्णपणे थांबल्या आहेत.
 
नारायण राणे भाजपमध्ये येण्याआधी त्यांच्याविरोधात भाजपचे नेते भाषण करत होते. ही सर्व भाषणं युट्युबवर उपलब्ध आहेत. मग नारायण राणे भाजपमध्ये आले आणि त्यांची भ्रष्टाराची चर्चा अचानक थांबली," याकडे केतकरांनी लक्ष वेधले.
 
भाजप ऑपरेशन लोटस करणार नाही, पण हे सरकार त्यांच्या कर्मानेच जाईल असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना वाटतं.
 
भाजप ऑपरेशन लोटस करणार का?
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न काही नवीन नाहीत. पण चार राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता भाजप ऑपरेशन लोटस करणार का?
 
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये बीबीसीशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आपल्या कर्मानेच पडेल. भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही." भाजप राज्यात 2024 च्या निवडणुकीची तयारी करत आहे.
 
भाजप ऑपरेशन लोटस करण्याची शक्यता आहे का? याबाबात बीबीसीशी बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, "भाजपला सत्तेशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. त्यांनी प्रयत्न कधी थांबवले? त्यांचे सातत्याने सत्तेसाठी प्रयत्न सरू आहेत."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक निकाल: उत्तर प्रदेश, गोव्यात भाजपची घौडदौड उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढवेल का?