Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सौदी अरेबियात अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी

सौदी अरेबियात अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी
, सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (11:20 IST)
सौदी अरेबियाने अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, एकटी स्त्रीदेखील हॉटेलमध्ये रुम बुक करून एकटी राहू शकणार आहे. यापूर्वी सौदीतल्या नियमांनुसार जोडप्यांना ते विवाहित असल्याचं प्रमाण द्यावं लागायचं.
 
सरकारने नुकतीच नवीन व्हिजा नियमांची घोषणा केली. यातल्या या काही महत्त्वाच्या घोषणा आहे. सौदीमध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पूर्वीचे नियम शिथिल करण्यात आल्याचं मानलं जात आहे.
 
दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची परवागी देण्यात आली होती. त्यानंतर एकट्या महिलांना हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 
नवे बदल
यापूर्वी सौदी अरेबियामध्ये बाहेरील देशातून येणाऱ्या जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट दाखवणं बंधनकारक होतं. मात्र, यापुढे अशी कुठलीही अट असणार नाही.
 
सौदीच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटेज मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत, "सौदी अरेबियाच्या नागरिकांना हॉटेल चेकिंगच्यावेळी फॅमिली आयडी किंवा नात्याचं प्रमाण सिद्ध करणारी कागदपत्र दाखवावी लागतील. मात्र, देशाबाहेरच्या जोडप्यांसाठी हे बंधनकारक नसेल. सर्व महिला ओळखपत्र दाखवून हॉटेल रुम बुक करू शकतील. सौदीच्या महिलादेखील असं करू शकतील", असं म्हटलं आहे.
 
मंत्रालयाने म्हटलं आहे, "नवीन व्हिजा नियमांनुसार महिला पर्यटकांनी स्वतःला पूर्ण झाकायची गरज नाही. मात्र, त्यांनी 'मर्यादित' कपडे परिधान करावे, अशी अपेक्षा आहे. असं असलं तरी मद्यावर अजूनही बंदी आहे."
 
बदलांमागची कारणं
सर्वाधिक बंधनं असलेलं राष्ट्र अशी जगभरात सौदी अरेबियाची ओळख आहे. मात्र, खुली बाजारपेठ असलेल्या अर्थव्यवस्थेत सौदी अरेबिया आता स्वतःला इतकं बंदिस्त करू इच्छित नाही. परदेशी पर्यटक यावेत आणि गुंतवणूक वाढावी, अशी आता तिथल्या राज्यकर्त्यांची इच्छा आहे.
 
सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन-सलमान यांनी अत्यंत पुराणमतवादी, परंपरावादी आणि इस्लामच्या कठोर कायद्यांचं काटेकोर पालन करणाऱ्या या राष्ट्रात अनेक बदल केले आहेत. सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्यास बंदी होती. ही बंदी त्यांनी उठवली होती. शिवाय, पूर्वी या देशातल्या स्त्रिया पुरूष पालक असल्याशिवाय परदेशात जाऊ शकत नव्हत्या. ही बंदीदेखील मोहम्मद बिन-सलमान यांनी उठवली आहे.
 
असं असलं तरी इतर अनेक कारणांमुळे सलमान एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. यातला सर्वांत मोठा मुद्दा आहे तो ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा इस्तानबुलमधल्या सौदी दूतावासात झालेला खून. सलमान यांच्या सांगण्यावरूनच सलमान सरकारचे टीकाकार खोशोग्जी यांचा खून करण्यात आला, असा आरोप आहे. त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
 
द इंडिपेंडंटचे ट्रॅव्हल एडिटर सिमोन क्लॅडर यांच्या मते सौदी अरेबियाच्या व्हिजासंबंधीच्या नव्या निर्णयांमुळे पर्यटनाला चालना मिळेल.
 
सिमोन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "व्हिजा नियम शिथील केल्याने सौदीमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या वेगाने वाढेल. अरब जगताचं कुलूहल असणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकण विधानसभा निवडणूक: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात शिवसेना-भाजप गड राखणार का?