Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाच थांबवला म्हणून डान्सरवर गोळी झाडली

नाच थांबवला म्हणून डान्सरवर गोळी झाडली
, शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (17:42 IST)
उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात एका डान्सर तरुणीवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाचणं थांबवल्यानंतर काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज येतो आणि ही तरुणी चेहऱ्यावर हात ठेवून खाली कोसळते, असं या त्यात स्पष्ट दिसतं.
 
तरुणीची परिस्थिती गंभीर असल्याने तिला कानपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. गोळी झाडणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चित्रकूट जिल्ह्यातील टिकरा गावात सरपंचाच्या मुलीच्या लग्न समारंभात 1 डिसेंबर रोजी ही घटना घडली.
 
चित्रकूटचे पोलीस निरीक्षक अंकित मित्तल यांनी सांगितलं, "गोळी झाडणारा कोण होता, हे कळलेलं आहे. आरोपी सरपंचाचा नातेवाईक असून तो कौशंबी जिल्ह्यातील राणीपूर गावचा रहिवासी आहे. आम्ही दोन पथकं नेमली आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल."

भारतात लग्नसमारंभादरम्यान हिंसक घटना घडणं, सामान्य बाब आहे. अशा प्रसंगी काही ठिकाणी आतषबाजीसाठी गोळीबारसुद्धा करतात. बऱ्याचवेळा दारुच्या नशेत हिंसक घटना घडतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. 2016 साली पंजाबमध्येदेखील अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी लग्नात नाचगाणं सुरु असताना गोळी झाडल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.
 
हरियाणात नोव्हेंबर 2016 मध्ये एका महिलेने गोळी झाडल्याने नवरदेवाच्या काकूसह तिघांचा मृत्यू झाला होता. गोळी झाडणारी ती महिला साध्वी देवा ठाकूर आणि तिच्या 6 सुरक्षारक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांनी नंतर पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.
 
2018 साली पंजाब पोलिसांनी एकाला अटक केली होती. या व्यक्तीने लग्नाच्या आधी होणाऱ्या कार्यक्रमात चुकून गोळी झाडल्याने शेजारची महिला ठार झाली होती. मुलीचं लग्न होणार असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गोळी झाडली. मात्र, ती गोळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेला लागून तिचा मृत्यू झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैदराबाद बलात्कार प्रकरण : जिथं बलात्कार केला तिथंच झालं चौघांचं एन्काउंटर