इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी दोन्ही देशांच्या संघाचं राष्ट्रगीत होतं. वेस्ट इंडिज हा तांत्रिकदृष्ट्या देश नाही. अनेक देशांचं मिळून कॉन्फिडरेशन आहे. मग वेस्ट इंडिज संघाची मॅच असताना कोणतं गीत वाजवलं जातं?
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कॅरेबियन बेटांवरील प्रसिद्ध गीतकार डेव्हिड रुडर यांचं 'रॅली राऊंड द वेस्ट इंडिज' हे गीत वाजवलं जातं.
हे गीत रुडर यांनीच लिहिलं आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे. रुडर कॅरेबियन बेटांवरील त्रिनिदादचे रहिवासी आहेत.
या गाण्यात वेस्ट इंडिज क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाचं वर्णन आहे. दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतर वेस्ट इंडिजची क्रिकेटला ओहोटी लागली. या कालखंडाबद्दल या गाण्यात उल्लेख आहे.
मायकेल होल्डिंग हे वेस्ट इंडिज क्रिकेटमधलं आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्याबद्दल या गीतात वर्णन आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेटची अधोगती होत असल्याचं गाण्यात म्हटलं आहे.
वेस्ट इंडिज हा अनेक विविधांगी बेटांचा समूह आहे. प्रत्येक बेटाचं गुणवैशिष्ट्य वेगवेगळं आहे. विभिन्नता असली तरी बेटांची एकत्र येण्याच्या वृत्तीला गीतकाराने सलाम केला आहे. सुरुवातीच्या काळात वेस्ट इंडिजचा कॅप्टन ज्या बेटाचा रहिवासी असेल त्या बेटाचं राष्ट्रगीत वाजवलं जायचं. मात्र कालौघात ही पद्धत बंद झाली आणि वेस्ट इंडिजचं राष्ट्रगीत वाजू लागलं.
एका गीताऐवजी प्रत्येक बेटाचं राष्ट्रगीत वाजवण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र वेळ आणि संसाधनांचा विचार करता ते शक्य नसल्याने तो मुद्दा बारगळला.
वेस्ट इंडिज म्हणजे नेमके कोणते देश?
अँटिगा अँड बारब्युडा, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनेडा, गयाना, जमैका, सेंट लुसिआ, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडियन्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट किट्स अँड नेव्हिस, अँग्युइला, माँटेसेराट, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, सिंट मार्टेन, युएस व्हर्जिन आयलंड्स.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी संलग्न असोसिएशन्स?
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी सहा क्रिकेट असोसिएशन्स संलग्न आहेत. यामध्ये बार्बाडोस, गयाना, जमैका, त्रिनिदाद अँड टोबॅगो, लीवर्ड आयलंड्स आणि विंडवर्ड आयलंड्स यांचा समावेश होतो. लीवर्ड आयलंड्स असोसिएशनमध्ये अँटिगा अँड बारबुडा, सेंट किट्स अँड नेव्हिस यांच्यासह अँग्युइला, माँटेसेराट आणि ब्रिटिश आयलंड्स आणि युएस व्हर्जिन आयलंड्स आणि सिंट मार्टेन यांचा समावेश होतो. विंडवर्ड आयलँड्स क्रिकेट बोर्डात डॉमिनिका, ग्रेनेडा, सेंट लुसिआ, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडियन्सचा अंतर्भाव होतो.
देश नाही मग राष्ट्रध्वज कोणता?
वेस्ट इंडिज हे देशांचं कॉन्फडरेशन असल्याने अर्थातच ध्वज किंवा बोधचिन्ह नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इनसिग्निआ तयार केला. इनसिग्निआ म्हणजे बोधचिन्ह.
मरून रंगाच्या बॅकग्राऊंडवर, निसर्गरम्य बेटावर नारळाचं झाड आणि क्रिकेटचे स्टंप्स असं हे बोधचिन्ह आहे.