Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिजिटल गोल्ड काय आहे? तरुणांची त्याला पसंती का आहे?

डिजिटल गोल्ड काय आहे? तरुणांची त्याला पसंती का आहे?
, शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (17:37 IST)
अहमिन खावाजा
तरुणाईचा ओढा डिजिटल गोल्डकडे असल्याचं दिसून येत आहे.
 
दरवर्षी जगभरातील लाखो लोक दिवाळी साजरी करतात. यंदा 24 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. दिवाळी साजरी करण्याची परंपरा 2,500 वर्षांहून अधिक जुनी आहे. दिवाळीचा पाच दिवसांचा हा सण भारतातील सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. या सणादरम्यान लोक लक्ष्मीची पूजा करतात. सोने खरेदी करून ते एकमेकांना भेटवस्तू म्हणूनही देतात.
 
लग्नसोहळ्यांव्यतिरिक्त भारतात दिवाळीत सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. भारत सोन्याच्या जगातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. जागतिक सुवर्ण परिषदेनं (WGC) 2017 मध्ये भारतीय सोन्याची एकूण मागणी 727 टन असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
आज, अनेक भारतीय खरेदीसाठी ज्वेलरी मार्केटमध्ये गर्दी करत असताना तरुण लोकांचा मात्र 'डिजिटल सोनं' खरेदी करण्याकडं अधिक कल असल्याचं दिसून येत आहे.
 
डिजिटल सोनं म्हणजे काय?
डिजिटल सोनं ही प्रत्यक्ष सोनं खरेदी न करता सोनं खरेदी आणि गुंतवणूक करण्याची एक आभासी पद्धत आहे. डिजिटल सोनं हे ऑनलाइन खरेदी केलं जाऊ शकतं आणि खरेदीदाराच्या वतीनं विक्रेत्याकडून ते तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवलं जातं.
 
असं असलं तरी डिजिटल सोने खरेदीवर सामान्यपणे सोने खरेदी करण्याच्या पद्धतीप्रमाणेच 3 % वस्तू आणि सेवा (जीएसटी) कर लागू होतो.
 
डिजिटल गोल्डच्या शुद्धतेची खात्री विक्रेत्यांकडून निश्चित केली जाते. डिजिटल सोन्याचा व्यवहार केवळ 24-कॅरेट स्वरूपात केला जातो.
 
डिजिटल सोन्यात कोण गुंतवणूक करत आहे?
काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत याची ओळख झाल्यापासून डिजिटल सोन्यामध्ये स्वारस्य सातत्यानं वाढत आहे.
 
अलीकडेच नवी दिल्लीस्थित कंझ्युमर डेटा इंटेलिजन्स कंपनीच्या अॅक्सिस माय इंडियानं 5300 हून अधिक लोकांचा सर्वे केला. त्यानुसार, भारतातील 15% तरुण (18-24 वर्षे वयोगटातील) डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
 
'इंडिया इन्व्हेस्टमेंट बिहेवियर' या शीर्षकाच्या अभ्यासात, डिजिटल सोन्यासह विविध गुंतवणूक साधनांवर आधारित ग्राहकांच्या वर्तनाचं मूल्यांकन करण्यात आलंय.
 
हे सर्वेक्षण संगणकाणाचा आधारे फोनवरील मुलाखतींद्वारे केलं जात आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
 
सोन्याचे भौतिक रूप अजूनही लोकप्रिय
अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, डिजिटल सोन्याच्या गुंतवणूकदारांमध्ये सध्या पुरुषांची संख्या मोठी आहे. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 55% पुरुष होते. समारंभाच्या काळात महिलांचा सोन्याच्या दागिन्यांकडे ओढा अधिक असतो, असंही या अभ्यासातून दिसून आलं आहे.
 
पण आता एक डिजिटल गोल्ड कंपनी नवीन ऑफर घेऊन आली आहे. यात ग्राहकांना त्यांचं सोनं गरजू ज्वेलर्सना भाड्यानं देण्याची सोय करण्यात आली आहे.
 
सेफगोल्ड ही एक भारतीय कंपनी आहे जी ग्राहकांना कमी किंमतीत सोने खरेदी आणि विक्री करण्यास अनुमती देते. त्यासाठी एका डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.
 
या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव माथूर सांगतात की, सोनं भाड्यानं देणं हे ग्राहकांना जोखमीचं वाटतं, पण यातून अधिक परतावा मिळतो.
 
गौरव सांगतात, "यात आम्ही काही ज्वेलर्सची यादी करतो जे तुमचे सोने भाड्याने देण्यास इच्छुक आहेत. पण हे पूर्णत: ग्राहकावर अवलंबून आहे. ग्राहक सोन्यावर 5-6% कमवू शकतात. ही एक नवीन नाविन्यपूर्ण गोष्ट आहे त्यामुळे सध्या तरी त्यातून ग्राहकांचा फायदा होत आहे.
 
"आपल्याकडे लोक त्यांचं सोनं तिजोरीत ठेवतात. पण 25-30 कोटी ग्राहक ज्यांच्याकडचे सोनं तिजोरीत निष्क्रिय अवस्थेत पडून आहे, त्यांच्यासाठी ही एक गुंतवणूक आहे."
 
ते पुढे सांगतात, "भारतात दरवर्षी सोन्याची मागणी अंदाजे 800-1000 टन आहे आणि ग्राहकांचा आता कमी मूल्य आणि नियमित खरेदी यांपासून उच्च मूल्याच्या खरेदीकडे रोख आहे. लोक आता त्यांच्याकडे जास्त काळ सोनं ठेवू लागले आहेत आणि नंतर त्याची देवाणघेवाण करू लागले आहेत. दागिन्यांसाठी किंवा उत्पन्नासाठी ते भाडेतत्त्वावर देऊ लागले आहेत. ही बाब महिलांना अधिक आकर्षित करत आहे."
 
डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी गौरव यांना कोणत्या गोष्टीनं प्रेरित केलं? ते सांगतात,
 
"भारतात सोने ही एक मोठी बाजारपेठ आहे. संपूर्ण उद्योगाचा आकार कदाचित 70 ते 80 अब्ज डॉलर्सचा आहे आणि त्यातील 80% असंघटित आहे. मोठ्या संघटित साखळी संपूर्ण मूल्याच्या 20% असतात. भारतातील सोन्याचा उद्योग बर्‍याचदा रोख प्रणालीमध्ये चालतो जिथं कर भरला जात नाही.
 
"तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे मला संपूर्ण प्लॅटफॉर्म तयार करण्याची आणि ते ऑनलाइन आणण्याची संधी मिळाली. मला लोकांना सध्या ऑफलाईन उपलब्ध असलेल्या उत्पादनांपेक्षा थोडे चांगले उत्पादन ऑफर करायचे होते."
 
पण, डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याविषयीच्या काही बऱ्या-वाईट गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
 
जमेच्या बाजू
2019 च्या जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार, भारतीय घरांमध्ये एकूण सोन्याचा साठा जवळपास 25 हजार टन होता. चीननंतर सोन्याची ही जगातील दुसरी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.
 
डिजिटल सोन्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे सुरक्षित स्टोरेज हा होय. कारण विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, तुमचं सोनं कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सुरक्षित बँकांमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे बँक लॉकरच्या भाड्याच्या शुल्कापासूनची तुमची बचत होते.
 
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, सोनं हे वास्तविकरित्या तिजोरीत असण्याची हमी दिलेली असल्याने फसव्या विक्रीचा धोका कमी असतो. पण, ही स्टोरेज सुविधा कायमची विनामूल्य नसते आणि ती काही वेळेच्या मर्यादेच्या अधीन असू शकते.
 
भारतीय ग्राहक लहान प्रमाणात का होईना पण सातत्यानं अधिकची खरेदी करण्याची क्षमता राखून असतात किंवा अधिकच्या खरेदीकडे आकर्षित होतात. भौतिक सोन्याच्या उलट तुम्ही डिजिटल सोन्याच्या बाबतीत कमीतकमी म्हणजे अगदी 0.1 ग्रॅम इतकी कमी गुंतवणूक करू शकता आणि तुमचे होल्डिंग हळूहळू वाढवू शकता. हाताळणी खर्चामुळे भौतिक सोन्याच्या बाबतीत हे शक्य होत नाही.
 
डिजिटल सोनं चालू बाजारभावानं केव्हाही खरेदी किंवा विकलं जाऊ शकतं. तुमची ते विकण्याची इच्छा नसल्यास विक्रेते तुम्हाला तुमच्या डिजिटल सोन्याच्या बदल्यात प्रत्यक्ष नाण्यांसाठी देवाणघेवाण करण्याचा पर्याय देऊ शकतात.
 
डिजिटल सोन्याचे हे फायदे असले तरी त्याच वेळी त्याचे तोटे देखील आहेत.
 
कोणतेही नियमन नाही
डिजिटल सोन्यात गुंतवणुकीची एक प्रमुख समस्या म्हणजे त्याचं नियमन केलं जात नाही. डिजिटल सोन्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किंवा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सारखी अधिकृत सरकारी नियामक संस्था नाही.
 
गौरव सांगतात, "आम्ही यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. आम्ही वित्त मंत्रालयाकडे पाचशे पानांची कागदपत्रं सादर केली आहेत. सोन्याच्या उद्योग खरोखर वाढण्यासाठी नियमन करण्याची गरज आहे.
 
"माझ्या मते, सोन्याविषयीचे नियम काळजीपूर्वक तयार करण्यात आलेले आहेत. देशाच्या दृष्टीनं ती एक आयात होणारी मोठी वस्तू आहे. आणि त्याच्यामुळे सोन्याची विक्री वाढेल अशी गोष्ट सूक्ष्म पातळीवर अर्थव्यवस्थेसाठी चांगली ठरेलच असं नाही. हे क्षेत्र संवदेनशील क्षेत्र म्हणून बघितलं जातं. कारण देशात एक मोठा गट सोन्याचा व्यवहार करतो आणि ते अधिकृतरित्या होत नाही. बिगररोखीचे हे व्यवहार असल्यानं कर भरल्या जात नाहीत."
ते पुढे सांगतात, "जास्तीत जास्त लोकांना डिजिटल सोन्याची खरेदी करण्यास प्रोत्साहन दिल्यानं दोन गोष्टी होतील. एकतर यामुळे सोन्याच्या खरेदी-विक्री क्षेत्रात होणारे गैरप्रकार कमी होतील. आणि दुसरं म्हणजे डिजिटल खरेदी होत असल्यामुळे सोन्याची आयात कमी प्रमाणात करावी लागेल. आपण सध्या आपल्याकडे असलेलं सोनं जास्तीत जास्त व्यवहारात आणायचा प्रयत्न करतोय, तर यामध्ये आयात कमी होणं अपेक्षित आहे. "
 
"सध्या ही खूप लहान बाजारपेठ आहोत, आता 5% पेक्षा कमी आहे. एकदा डिजिटल सोन्याची मागणी 10% पेक्षा जास्त वाढली की, मला वाटते की नियामक याची दखल घेतील," अशी अपेक्षा गौरव व्यक्त करतात.
 
खरेदीदारांना दिलेली डिजिटल सोन्याची प्रमाणपत्रे भौतिक सोन्यासह प्रमाणित आहेत की नाही हे तपासण्यासाठी सध्या कोणतीही अधिकृत पद्धत नाही.
 
हिंदुस्तान टाइम्सनं 2021 मध्ये दिलेल्या बातमीनुसार, भारतीय वित्त मंत्रालय, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) क्रिप्टो मालमत्तेसह डिजिटल सोनं आणण्यासाठी काम करत आहेत, 'काही नियामक निरीक्षणाखाली हे काम केलं जाईल. पण अशा गुंतवणुकीतील अनियंत्रित वाढीबद्दल चिंता आहे. विशेषत: गुंतवणूकदाराच्या संरक्षणाशिवाय केलेले नियमन.' असं यात नमूद केलं आहे.
 
याविषयी अधिक जाणून घेण्याकरता बीबीसीने सेबीशी संपर्क साधला. पण अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.
 
तज्ञांच्या मते, डिजिटल सोन्याच्या व्यापाराला भौतिक वस्तूंचा पाठिंबा असेल ना की कागदी व्यापाराचा. हीच बाब अधिकाऱ्यांना सुनिश्चित करायची आहे. कारण कागदी व्यापारामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचं मोठं नुकसान होऊ शकतं.
 
भारतातील सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन्स) अॅक्ट 1956 मध्ये परिभाषित केल्यानुसार, डिजिटल सोने सिक्युरिटीजच्या व्याख्येत येत नाही. ऑगस्ट 2021 मध्ये, एक्सचेंजेसने स्टॉक ब्रोकर्सना डिजिटल सोन्याची विक्री थांबवण्यास सांगितलं. त्यामुळे स्टॉक ब्रोकर्सनी डिजिटल सोन्याची विक्री थांबवली आहे. पण, मोबाईल वॉलेट्स आणि गुंतवणूक प्लॅटफॉर्मनं ती सुरू ठेवली आहे.
 
दागिन्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो
काही सोने दुकानकार ग्राहकांना त्यांच्या डिजिटल सोन्याच्या होल्डिंगला आवश्यक असल्यास भौतिक दागिन्यांमध्ये बदलू देतात. पण हे दर नेहमी तंतोतंत जुळत नाहीत. डिजिटल सोन्याचे दर नेहमी दागिन्यांच्या दरापेक्षा कमी असतात.
 
तसंच एक्स्चेंज दरम्यान, ग्राहकांना करांच्या दृष्टीने अतिरिक्त पैसे खर्च लागतील. यात जीएसटी दोनदा लावला जाऊ शकतो. पहिलयांदा, डिजिटल सोने ग्राहकाला विकले जाते तेव्हा आणि दुसऱ्यांदा तयार दागिन्यांच्या अंतिम मूल्यावर.
 
ऑनलाईन विकले जाणारे प्रत्येक ग्रॅम डिजिटल सोने सुरक्षित तिजोरीत ठेवण्याचे विक्रेते वचन देत असले तरी, ग्राहकांना जाऊन त्यांचे सोने साठवले आहे की नाही हे तपासण्याचा कोणताही मार्ग नाही.
 
त्यामुळे कोरोनानंतरच्यात जगात जीवन जगण्यासाठीचा खर्च वाढला असताना सोन्याच्या चमकीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना आकर्षित केलं आहे. सोन्याच्या आयातीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तब्बल 677% वाढ झाली आहे.

Published By -Smita Josh

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खुशखबर , खुशखबर ..... राज्य सरकार ७५ हजार रोजगार निर्मिती करणार