मयांक भागवत
बीबीसी मराठी
कोकण दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीला रवाना झाले आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने धक्कातंत्र सुरू केलं.
अमित शाह यांची पाठ फिरताच शिवसेना भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावण्यास यशस्वी ठरली. वाभवे-वैभववाडीच्या सात नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकलाय. हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालंय. यात भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनावासी झालेल्यांची संख्या मोठी आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, शिवसेनेचा भाजपला हा मेसेज असू शकतो.
सिंधुदुर्गातील भाजपचे नगरसेवक जाणार शिवसेनेत
वैभववाडीतील शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना भाजप नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.
"नारायण राणे आणि नितेश राणेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवकांनी राजीनामा दिलाय. हे सात नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील," असं अतुल रावराणे म्हणालेत.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे आहेत.
"वैभववाडीत शिवसेनेकडे उमेदवार नाहीत. बाळासाहेबांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत," अशी प्रतिक्रिया भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.
या घटनेचं विश्लेषण करताना वरिष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "अमित शाहांनी कोकणात जाऊन थेट शिवसेनेला आव्हान दिलं. त्याचं उत्तर सेनेने भाजप नगरसेविकांना फोडून दिलं आहे."
भाजप नगरसेवकांचा राजीनामा हा नारायण राणेंसाठी धक्का मानला जातोय.
"मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजपकडून एकमेकांना शह-काटशह देणं सुरूच राहिल," असं नानिवडेकर यांना वाटतं.
शिवसेनेचा भाजपला मेसेज देण्याचा प्रयत्न?
राजकीय विश्लेषकांच्या मते, हे कुरघोडीचं राजकारण आहे. याला किनार आहे ती शिवसेना-भाजपमधल्या वादाची.
राजकीय पत्रकार संजीव शिवडेकर सांगतात, "भाजप नेत्यांचा प्रवेश म्हणजे, शिवसेनेचा भाजपला एक मेसेज देण्याचा प्रयत्न असू शकतो की ही सुरूवात आहे."
एकेकाळी मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजप 2019 च्या निवडणुकीनंतर कट्टर विरोधक झालेत. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रससोबत सत्ता स्थापन केली. शेतकरी आंदोलन, जीएसटीचा मुद्दा किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्यांवर शिवसेना-भाजप आमने-सामने आहेत.
मुंबईतही शिवसेनेत इनकमिंग
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमिवर सत्ताधारी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झालंय. राजकीय जाणकारांच्या मते सत्ताधारी पक्षात कायमच इनकमिंग जोरात असतं.
मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलीय. 2017 च्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळेच मुंबईवर पकड मजबूत करण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गुजराती समाजाला आपलं करण्याकडे शिवसेनेने लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी गुजराती समाजाचे मेळावे, रासगरबा आणि गुजराती नेत्यांना पक्षात घेणं सुरू केलं आहे.
शिवसेनेच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे संजीव शिवडेकर म्हणतात, शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगला तीन पैलू आहेत.
1) भाजपचे नेते शिवसेनेत आल्याने गुजराती मतं शिवसेनेकडे येतील असं नाही. गुजराती समाजात अजूनही 'M' म्हणजे मोदी फॅक्टर जोरात आहे
2) हे नेते त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत जात आहेत. भाजपत काही मिळणार नाही म्हणून ते संधी शोधत आहेत.
3) शिवसेनेने भाजपला दिलेला हा मेसेजही असू शकतो.
शिवसेनेत प्रवेश केलेले मुंबई भाजप नेते
1) कृष्णा हेगडे
कृष्णा हेगडे हे माजी आमदार आहेत. पक्षात फारसं महत्त्व न मिळाल्यामुळे हेगडे यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. हेगडे विलेपार्ले भागात कार्यरत आहेत. 2017 पासून कृष्णा हेगडे भाजपमध्ये होते. कॉंग्रेसला रामराम ठोकून हेगडे भाजपवासी झाले होते.
2) हेमेंद्र मेहता
भाजपचे तीन वेळा आमदार राहिलेल्या हेमेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वीच हाताला शिवबंधन बांधलं. मेहता यांनी गुजराती बहुल बोरीवली भागाचं नेतृत्व केलं होतं. शिवसेनेला मुंबईत गुजराती मतं हवी आहेत. त्यामुळे मेहता शिवसेनेत येणं उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी नक्कीच जमेची बाजू आहे.
3) समीर देसाई
मुंबई भाजपचे सचिव आणि माजी नगरसेवक समीर देसाई यांना शिवसेनेने पक्षात घेतलं. देसाई पश्चिम उपनगरातील गोरेगावमधून दोन वेळा नगरसेवक राहिले आहेत. कॉँग्रेसचे दिवंगत नेते गुरूदास कामत यांचे ते भाचे आहेत. 2014 मध्ये देसाई यांनी काँग्रेससोडून भाजपत प्रवेश केला होता.
4) अनिल कदम- प्रेसिला कदम
मध्य मुंबईतील भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अटॉप हिल परिसरातील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहीलेल्या प्रेसिला कदम यांनीही शिवसेनेत प्रेवश केला आहे.
भाजपला शह देण्याची सुरूवात
मृणालिनी नानिवडेकर शिवसेनेच्या या इनकमिंगकडे 'रेनबो कोलिजन' म्हणून पहातात.
त्या म्हणतात, "ही सुरूवात आहे शिवसेनेने भाजपला शह देण्याची. येणाऱ्या दिवसात भाजपकडूनही असा प्रयत्न नक्की होईल."
हेमेंद्र मेहता, कृष्णा हेगडे यांच्या येण्याने शिवसेनेला फायदा होईल? यावर बोलताना त्या पुढे सांगतात, "महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला विविध लोक हवे आहेत. शिवसेनेत आलेले नेते त्यांच्या पारंपारिक वोट बॅंकचे नेते नाहीत. पण आम्ही फक्त मराठीच नाही, तर विविध समुदायाच्या नेत्यांना पक्षात घेत आहोत हे दाखवण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे."
काही राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेनेत आलेल्या नेत्यांनी पक्षाला थोडाफार फायदा होईल. जिंकण्यासाठी नाही तर प्रतिस्पर्ध्याला पाडण्यासाठी नक्कीच. याचं कारण महापालिका निवडणुकीत अत्यांत चुरशीच्या लढती होतात आणि इथं अत्यंत थोड्या फरकाने उमेदवार पडू शकतो किंवा जिंकू शकतो.
शिवसेनेवासी झालेले मनसे नेते
मुंबईसह कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकही तोंडावर आली आहे. शिवसेनेने राज ठाकरेंच्या मनसेला इथं धक्का दिलाय. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 पासून कदम राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये होते.