केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्याचबरोबर पंकजा यांनी भाषणातून अनेक संकेतही दिले.
औरंगाबादचे खासदार भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. त्यामुळं प्रीतम मुंडे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली नाही, म्हणून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती.
पण कुटुंबासाठी काही मागण्याचे संस्कार मुंडे साहेबांचे नाहीत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा या चर्चा फेटाळून लावल्या.
दिल्लीहून पंतप्रधानांबरोबरच्या सचिवांच्या बैठकीतून परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी वरळी इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडेंनी भाषणात कार्यकर्त्यांना आपण धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणारे लोक आहोत असं म्हटलं.
त्याचबरोबर या भाषणातून इतरही अनेक वेगवेगळे विषय समोर आले. पण प्रामुख्यानं समोर आलेले त्यांच्या भाषणाचे चार अर्थ काय आहेत ते आपण जाणून घेऊयात.
1. नाव न घेता फडणवीसांच्या विरोधात आघाडी
गोपिनाथ मुंडे यांच्या मृत्यूंनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी राज्यभर दौरा केला होता. त्यावेळी पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणात या मुद्दयावरही नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्रिपदाचा हा मुद्दा मला अपमानित करण्यासाठीच पेरला होता, असं पंकजा म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडेदेखील 'मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री' असल्याचं म्हणायच्या. मात्र त्यांनी कधीही थेट दावा केला नाही. तसं असलं तरी त्यांच्या मनातली सुप्त इच्छा अनेकदा समोर आल्याचं, ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
दुसरीकडं, "भाषणात पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं म्हटलं असलं तरी, मी पंतप्रधान होण्याची इच्छा तर व्यक्त केली नाही ना, असंही म्हटलं. त्यांचा हा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं होता," असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.
"मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं अनेकवेळा समोर येत होतं. पण पंकजांनी मात्र नेहमीच याबाबत थेट बोलण्यापेक्षा 'इशारो इशारो मे' आपलं म्हणणं पक्षापर्यंत पोहोचवलं," असं मेहता म्हणाले.
"वरळीमध्ये झालेल्या भाषणातही पंकजा मुंडेंनी फडणवीस यांचा थेट उल्लेख केला नाही. मात्र हा प्रयत्न त्यांना अनुल्लेखानं मारण्याचा होता," असंही ते म्हणाले.
पंकजा मुंडे या भाषणात 'माझा नेता मोदी आहे, माझा नेता अमित शहा आहे' असं म्हणाल्या. म्हणजेच एकप्रकारे त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.
2. केंद्रातून ताकद मिळत असल्याचं सुतोवाच
पंकजा मुंडे यांनी या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी भेट झाली असून ती भेट अत्यंत सकारात्मक झाल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
प्रीतम मुंडेंना मंत्रिपद मिळालं नाही त्यानंतरच्या घडामोडींमध्ये पंकजा मुंडेंच्या अनेक समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. पण कार्यकर्ते तुमचे ऐकतील असं म्हणत नड्डांनी मलाच तुमची समजूत काढायला सांगितल्याचं पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना, "माझा पराभव झालेला असला तरी, माझ्याकडं दुर्लक्ष करणं पक्षाला परवाडणारं नाही," याचेही संकेत दिले असं विश्लेषण हेमंत देसाई यांनी केलं आहे.
"आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळं पंकजांची ही नाराजी परवडणारी नाही याची जाणीव भाजपलाही आहे," असंही देसाई म्हणाले.
जे.पी. नड्डा यांच्याबरोबर झालेल्या भेटीवरून त्यांच्या मनात काही-तरी चांगलं आहे, असं वाटत असल्याचं पंकजा म्हणाल्या. म्हणजेच केंद्रातूनही आपल्याला ताकद मिळत असल्याचं पंकजांनी दाखवून दिलं.
3.'वंजारी समाजाची सर्वांत मोठी नेता मीच'
प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र भागवत कराड हे आपल्यापेक्षा वयानं मोठे आहे, त्यांचा अपमान करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत असं पंकजा मुंडे त्यांचं नाव न घेता म्हणाल्या.
"माझा लढा हा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी नाही. तर संपूर्ण बहुजन समाजासह वंजारी समाजाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष असल्याचं पंकजा म्हणाल्या. तसंच वंजारी समाजाची सर्वात मोठी नेता मीच असल्याचंही त्यांनी सुचवलं.
"एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपकडंही तशा अर्थानं थेट लोकांवर प्रभाव असलेलं नेतृत्व नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं पंकजांना जनतेचा तसा पाठिंबा असल्याचं," मत हेमंत देसाई यांनी मांडतात.
गोपीनाथ मुंडेनंतर पंकजा मुंडेंनी त्यांचा वारसा पुढं नेला. मात्र त्याचवेळी त्यांच्या मनातली खदखद त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.
"गोपीनाथ गडावरील कार्यक्रम असेल, गोपीनाथ मुंडेंची जयंती असेल किंवा पुण्यतिथी अशा निमित्तानं पंकजा यांनी नेहमी अस्वस्थता मांडली आणि पक्षाला इशारा दिला आहे," असंही अद्वैत मेहता यांनी म्हटलं.
4. कौरव कोण पांडव कोण, पंकजा यांनी काय सूचवलं?
पंकजा मुंडे यांनी या संपूर्ण भाषणामधून भाजपला इशारा दिला आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. त्यामुळं आपण काहीतरी चांगलं घडण्याची वाट पाहू असं पंकजा कार्यकर्त्यांना म्हणाल्या.
"त्यामुळं पंकजा यांच्या या संपूर्ण भाषणातून त्यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला असल्याचं समोर येत असल्याचं मत," अद्वैत मेहता यांनी मांडलं.
हेमंत देसाईंनीही पंकजांनी हा जणू अंतिम इशारा भाजपला दिला असल्याचं म्हटलं.
"कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना तुम्हाला सर्वांना मुंडे साहेबांनी मोठं केलं हे पंकजांनी आवर्जुन सांगितलं. म्हणजेच भाजप आणि मुंडे कुटुंब हे एकच असलं तरी स्वतंत्र अस्तित्व असल्याचे संकेत त्यांनी दिले," असं देसाई म्हणाले.
कार्यकर्त्यांना राजीनामे मागं घ्यायला सांगताना पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या आपण आपलं घरं का सोडायचं? त्याचवेळी त्यांनी सरकारला अप्रत्यक्षपणे निर्वाणीचा इशाराही दिल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
"पंकजा मुंडे यांनी भाषणामध्ये कौरव-पांडवांचा आणि धर्म, नीतिमत्ता याचा उल्लेख करत त्यांच्या संघर्षाचं वर्णन केलं. पण त्या जर पांडव असतील तर कौरव म्हणजे नेमके कोण हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळं थेट काहीही न बोलता त्यांनी त्यांना हवे ते संकेत दिले," असं हेमंत देसाई म्हणाले आहेत.