Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

अजित पवार यांचं पुढे काय होणार? शरद पवार त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत घेतील?

What will happen to Ajit Pawar
श्रीकांत बंगाळे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि रात्री ते सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीलाही गेले.
 
त्यानंतर अजित पवार यांचं पक्षातील स्थान कायम राहील का? मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल का? की आता ते राजकीय संन्यास घेतील? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले.
 
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखात शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
 
विश्वासार्हता गमावली?
 
अजित पवारांनी त्यांच्या राजकीय हालचालींमुळे विश्वासार्हता गमावल्याचं राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "कधी बैठकीतून उठून जाणं तर कधी पदाचा राजीनामा देणं, हे अजित पवारांचं वर्तन पहिल्यापासून राहिलं आहे. त्यामुळे शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात प्रस्थापित करतील, मंत्रिपदही देतील. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचं हे वर्तन आवडतं, त्यांचा असा रोखठोक स्वभाव आवडतो. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी ओढवण्याची शक्यता कमी आहे."
 
"पण यावेळेस अजित पवारांनी विश्वासार्हता गमावली आहे. एकीकडे तीन पक्ष सत्तास्थापनेची चर्चा करत असताना, दुसरीकडे एका रात्रीत भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं इतकं सोप नव्हतं. सिंचन घोटाळ्याशी संबंधित चौकशीचा धाक अजित पवारांना दाखवल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं. त्याचा मोबदल्यात म्हणून या घोटाळ्याशी संबंधित 8 ते 9 फाईल्स लगेच बंद करण्यात आल्या आहेत," भिडे यांनी पुढे सांगितलं.
 
मात्र अजित पवार यांना या सिंचन गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचं वृत्त अजूनही स्पष्ट नाही.
 
अजित पवारांशिवाय पर्याय नाही?
असं असलं तरी, अजित पवारांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही, असं मत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार मांडतात.
 
ते म्हणाले, "अजित पवारांना पक्षात घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही आणि टिकणारही नाही. त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा प्रस्थापित करण्याशिवाय शरद पवारांकडे दुसरा पर्याय नसेल. पण आता अजित पवारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम शरद पवारांना करावं लागणार आहे."
 
पण, "दुसरीकडे राष्ट्रवादीत एक गट असा आहे, ज्याला अजित पवारांना हेतूपूर्वक पक्षातून बाहेर काढायचं होतं. त्यामुळे अजित पवार समर्थकांचा एक गट आणि अजित पवार विरोधकांचा एक गट, असे दोन गट या पक्षात तयार झाले आहेत. त्यामुळे पक्षात दुफळी माजण्याचा प्रकार आहे. पण असं असलं तरी अजित पवार हे शक्तिशाली नेते आहेत. त्यांनी मनात आणलं तर ते दुसरा पक्षही स्थापन करू शकतात, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे."
 
राजकीय संन्यास?
अजित पवारांचा पिंड राजकीय आहे, म्हणून ते राजकीय संन्यास घेणार नाहीत, असं मत ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने व्यक्त करतात.
 
ते म्हणाले, "अजित पवारांचा पिंड राजकीय आहे, तो बघता ते संन्यास घेतील, असं वाटत नाही. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अजित पवारांविषयी शंकेचं वातावरण आहे. त्यामुळे त्यांची आणि धनंजय मुंडेंची लगेच मंत्रिमंडळात वर्णी लागणार नाही."
 
"मात्र अजित पवारांना नेतृत्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे. कारण अजित पवारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी वारंवार असा बालिशपणा केला आहे. त्यांच्या या वर्तनामुळे शरद पवार नेहमी संकटात आले आहेत.
 
पण आता या वयात शरद पवारांना संकटात ढकलणं योग्य नाही, स्वत: शरद पवारांनाही हे पटलेलं नाही. पवारांचा पुतण्या असण्याचा अजित पवार गैरफायदा घेत होते, असंच राष्ट्रवादीतल्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे आता पक्षात नेतृत्ववाढीसाठी अजित पवारांना संघर्ष करावा लागणार आहे."
 
तर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, "अजित पवारांना आता राजकीय संन्यास घेण्यावाचून पर्याय नाही. मागेही त्यांनी EDच्या चौकशीवेळेस घोळ केला, तेव्हाही शरद पवार त्यांच्यावर नाराज होते. आता शेती करण्यासाठी अजित पवार यांनी स्वत:च स्वत:साठी रस्ता तयार केला आहे, त्यामुळे ते त्या रस्त्यानं जातील, अशी शक्यता आहे."
 
राजकीय आत्महत्या?
विजय चोरमारे यांच्या मते, "अजित पवारांनी शरद पवारांना अंधारात ठेवून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मृत्यू जवळ आल्याचं लक्षण होतं. भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणं, हे आत्मघातकी पाऊल होतं," चोरमारे पुढे सांगतात.
 
"अजित पवारांच्या या पावलामुळे त्यांचं राजकारण 10 वर्षं मागे गेलं आहे. महाराष्ट्र राज्य अपयाशाला मान्य करतं, पण गद्दारीला मान्य करत नाही. ज्या भावनेनं सामान्य जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मतं दिली होती, त्या भावनेशी अजित पवारांनी गद्दारी केली. त्यांचं हे पाऊल लोकांना पटणारं नाही. अजित पवारांना आता राष्ट्रवादीनं पुन्हा प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न केला, तर त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल," चोरमारे पुढे सांगतात.
webdunia
चौकशांचं काय?
अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोप आहेत. या प्रकरणांची चौकशीही सुरू आहे. आता या चौकशांचं पुढे काय होणार, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
webdunia
याविषयी राजकीय विश्लेषक प्रकाश पवार म्हणाले, "अजित पवारांवर आरोप असलेल्या प्रकरणांच्या चौकशीचं पुढे काहीही होणार नाही. मी सिंचन घोटाळ्यासंबंधित पूर्ण आरोपपत्र वाचलं आहे, त्यात EDला काहीही सापडणार नाही. केंद्र सरकार EDचा धाक दाखवून त्यांना फक्त भीती दाखवत राहील."
 
तर श्रीमंत माने यांच्या मते, "अजित पवार अडचणीत येतील, असं कोणतंही पाऊल राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्यानंतर उचललणार नाही. पण आता या चौकशा मंदगतीनं होऊ शकतात."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे सत्तास्थापनेचा दावा करतील : नवाब मलिक