Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तान की भारत कुणाकडे आहेत जास्त अणुबाँब?

पाकिस्तान की भारत कुणाकडे आहेत जास्त अणुबाँब?
- शकील अख्तर
गेल्या दहा वर्षांत भारत आणि पाकिस्तानची अणुबाँबची संख्या दुप्पट झाली आहे. या दोन-तीन वर्षांचा विचार केला तर असं लक्षात येतं की, भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये अण्वस्त्रांची निर्मिती जास्त झाली आहे.
 
जगात कोणत्या देशाकडे किती शस्त्रास्त्रं आहेत याचा तपशील ठेवणारी संस्था स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूटने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
या संस्थेच्या आण्विक निशस्त्रीकरण, शस्त्र नियंत्रण या विभागाचे प्रमुख शेनन काइल यांनी बीबीसीला सांगितलं की, "जगात अण्वस्त्रांची निर्मिती घटली आहे पण दक्षिण आशिया याला अपवाद आहे."
 
त्यांनी सांगितलं, "2009 या वर्षी भारताकडे 60-70 अणुबाँब होते आणि पाकिस्तानकडे 60 अणुबाँब होते. पण दोन वर्षांत दोन्ही देशांकडे असलेल्या अणुबाँबची संख्या दुप्पट झाली आहे."
 
शेनन काइल सांगतात, "भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अणुबाँब आहेत. विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताकडे 130-140 अणुबाँब आहेत तर पाकिस्तानकडे 150-160 अणुबाँब आहेत."
 
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे त्यामुळे अण्वस्त्रांची संख्या वाढू शकते असा अंदाज आहे. तसं पाहायला गेलं तर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र स्पर्धा नाही. जशी अमेरिका आणि रशियामध्ये पाहायला मिळाली होती.
ते सांगतात की "मी याला स्ट्रॅटेजिक आर्मी काँपिटिशन किंवा रिव्हर्स मोशन न्यूक्लियर आर्मी रेस असं म्हणेल. मला वाटतं नजीकच्या भविष्यात या स्थितीमध्ये काही बदल घडणार नाही."
 
2019 मध्ये कुणाकडे किती आहेत अणुबाँब
रशिया - 6500
अमेरिका - 6185
फ्रान्स - 300
ब्रिटन - 200
चीन - 290
पाकिस्तान - 150-160
भारत - 130-140
इस्रायल - 80-90
उत्तर कोरिया - 20-30
अण्वस्त्रांचा खर्च किती?
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये संरक्षणावर बजेटचा मोठा भाग खर्च केला जातो. पण नेमका कोणता देश अण्वस्त्रांवर किती खर्च करतो हे सांगणं कठीण असल्याचं शेनन सांगतात.
 
दोन्ही देश हाच दावा करतात की आमच्याकडे असलेली अण्वस्त्रं सुरक्षित आहेत. शेनन सांगतात की अण्वस्त्रांची निर्मिती कमी झाली आहे पण त्यांना अद्ययावत करण्याच्या तंत्रज्ञानावर सध्या भर दिला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राच्या सीमेवर बांधलेल्या कालेश्वरम धरणाचा महाराष्ट्राला फायदा होईल का?