Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहित भारतीय कंबोज कोण आहेत?

मोहित भारतीय कंबोज कोण आहेत?
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (10:07 IST)
क्रूझ ड्रग केसमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींची अटक आणि जामिनावर सुटका झाली असली तरी हे प्रकरण इथेच थांबलं नाही. यात दररोज नवे आरोप समोर येत आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता या प्रकरणात भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांनी उडी घेतली आहे.
 
आर्यन खान हे प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणाचा सूत्रधार मोहित कंबोज आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी हे आरोप फेटाळले आहेत
याउलट मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हा या प्रकरणाचा मास्टरमाईंड असून नवाब मलिक याच्याशी त्याचे संबंध आहेत असा आरोप केला आहे.
हे मोहित कंबोज कोण आहेत? ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का? आर्यन खान प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे? याविषयी आपण जाणून घेणार आहोत
 
मोहित कंबोज यांचा क्रूझ ड्रग प्रकरणाशी काय संबंध आहे?
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर 2 ऑक्टोबरला NCB ने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) धाड टाकली. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं.
 
यात भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालाही ताब्यात घेतलं होतं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेतलं आणि 3 जणांना भाजप नेत्याच्या आदेशावरून सोडून दिलं असाही आरोप मलिकांनी केला होता. हे सर्व आरोप मोहित कम्बोज यांनी फेटाळले.
 
मोहित कंबोज यांनी साधारण 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकावर या सर्व प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. क्रूझला परवानगी कशी मिळाली असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
तसंच यासर्व प्रकरणात महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोपही मोहित कंबोज यांनी केला. महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याने पार्टीसाठी कोऑर्डिनेट केले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
 
शनिवारी (6 नोव्हेंबर) कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याप्रकरणाशी संबंधी नवीन आरोप केले.
प्रभाकर साईल, सॅम डिसूजा, केपी गोसावी असे अनेक जण आतापर्यंत पंच म्हणून समोर आले. परंतु या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे असा दावा मोहित कंबोज यांनी केला.
 
ते म्हणाले, "सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे असून गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी सुनील पाटील यांचा संबंध आहे."
 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
 
तर सुनील पाटील यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्टिकरण दिलं. सुनील पाटील याला मी कधीही भेटलो नाही असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
 
कोण आहे मोहित भारतीय कंबोज?
 
मोहित कंबोज यांचा जन्म 30 एप्रिल 1984 रोजी झाला. ते व्यावसायिक असून केबीजे नावाची त्यांची खासगी कंपनी आहे.
सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. तसंच ते भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष होते.
 
2016 ते 2019 पर्यंत ते भाजप मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. 2019 साली त्यांना मुंबई भाजपच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आलं.
 
2014 साली ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला.
 
2012 ते 2019 दरम्यान सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'चे कंबोज माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. तसंच 'प्राऊड भारतीय' संस्थेचे ते संस्थापक आहेत.
 
मोहित भारतीय कंबोज यांच्यावर काय आरोप आहेत?
आर्यन खान प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार मोहित भारतीय कंबोज आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपचा कार्यकर्ता मोहित कंबोज याच्या मेहुण्याच्या माध्यमातून आर्यन खानला क्रूझवर नेलं असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
ते म्हणाले, "मोहित कंबोजच्या मेहुण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. अपहरण करून 25 कोटी रुपये मागण्याचा खेळ सुरू झाला. 18 कोटी रुपयांची डील झाली. 50 लाख रुपये घेण्यात आले. परंतु एका सेल्फीने खेळ उघड झाला हे खरं आहे."
 
मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध असल्याचंही ते म्हणाले. 7 ऑक्टोबरला कंबोज आणि समीर वानखेडे ओशीवारा कब्रस्तान येथे भेटल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. या दोघांच्या बैठकीचा व्हीडिओ आम्ही लवकरच जारी करणार असल्याची घोषणा मलिक यांनी केला.
 
मोहित कंबोज यांचं स्पष्टीकरण
 
नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.
 
याला प्रत्युत्तर देताना कंबोज यांनी समीर वानखेडे यांच्याशी आपला काहीही संबंध नसून माझ्या आयुष्यात मी कधीही त्यांना भेटलो नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
कंबोज म्हणाले, "मी सुनील पाटील यांचा उल्लेख केल्यानंतर आज नवाब मलिक यांनी मान्य केलं की सुनील पाटील याच्याशी संपर्क झाला होता. फोनवर बोलणं झालं होतं हे सुद्धा मलिक यांनी मान्य केलं."
ते पुढे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांची मुलं या पार्टीला येणार होती. या ड्रग पेडलरशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांचे संबंध आहेत. सुनील पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क झाला याची कबुली मलिक यांनी दिली. केवळ त्यांनी वेळ आणि तारीख बदलून सांगितली."
 
नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबतही मोहित कंबोज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा त्यांनी केला. एवढे पैसे आणि मुंबईत एवढे फ्लॅट कुठून आले? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
 
नवाब मलिक यांना आव्हान देत मोहित कंबोज म्हणाले, "मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, कुठलीही केस करा मी तुम्हाला घाबरत नाही."
 
आणि मोहित कंबोज मोहित भारतीय झाले...
जानेवारी 2019 मध्ये मोहित कंबोज यांनी आपण आपलं आडनाव बदलून 'भारतीय' करत आहोत अशी घोषणा केली. तेव्हा ते भाजयुमोचे अध्यक्ष होते.
 
तेव्हा ते म्हणाले, "यापुढे भारतीय ही माझी ओळख असेल."
 
एनडिटिव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार, मोहित कंबोज यांची 'प्राऊड इंडियन'नावाची संस्था आहे. ही संस्था भारतीयांना केवळ भारतीय म्हणून ओळख देण्यासाठी प्रत्साहन देते असंही ते म्हणाले होते.
 
"या मोहिमाचा खरा उद्देश काय आहे हे सांगण्यासाठी याचं पहिलं उदाहरण मला दाखवायचे होते. मी माझं आडनाव बदलून भारतीय केलं आहे आणि यापुढे हीच माझी ओळख असेल," असंही ते म्हणाले होते.
 
अधिकृत कागदपत्रांमध्येही हा बदल करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं.
 
वादग्रस्त प्रकरणं
मोहित हे 1100 कोटी रुपयांच्या एका प्रकरणात आरोपी असल्याचा दावा नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला होता.
 
तसंच मोहित कंबोज यांची मुंबईत अनेक हॉटेल्स असल्याचंही ते म्हणाले होते.
 
कंबोज यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझी साडे तीन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं मी निवडणूक लढवताना जाहीर केलं असं मोहित कंबोज म्हणाले.
 
मलिक यांनी उल्लेख केलेली हॉटेल्स माझी नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
फ्रि प्रेस जनरल या वृत्तपत्राने दिलेल्या एका वृत्तानुसार, 2020 मध्ये सीबीआयकडून कंबोज यांच्यावर 67 कोटी रुपयांच्या कर्जासंबंधी कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
सरकारी बँकेने दावा केला होता की कर्जदारांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि फसवणूक काहीअधिकाऱ्यांच्या संगनमताने केली आहे.
 
सीबीआयने या प्रकरणी पाच ठिकाणी मुंबईत धाडी टाकल्या. मोहित कंबोज यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली, शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप