Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युरोपीय खासदारांना काश्मीर दौऱ्यावर आणणारी महिला कोण आहे?

युरोपीय खासदारांना काश्मीर दौऱ्यावर आणणारी महिला कोण आहे?
, गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (17:18 IST)
युरोपातील 23 खासदारांच्या काश्मिर दौऱ्यावरून निर्माण झालेल्या वादात एक नाव बरंच चर्चेत होतं, ते म्हणजे माडी शर्मा.
 
माडी शर्मा यांच्या 'वुमेन्स इकॉनॉमिक अँड सोशल थिंक टँक' या स्वयंसेवी संस्थेने हा दौरा आयोजित केला आहे.
 
भारतीय वंशाच्या माडी शर्मा ब्रिटीश नागरिक आहेत. आपण एकेकाळी समोसे विकून उदरनिर्वाह करायचो, असा दावा माडी शर्मा यांनी केला आहे. सध्या त्या एका स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. ही एनजीओ दक्षिण आफ्रिका, युरोपीय देश आणि भारत सरकारसोबत मिळून काम करत असल्याचा त्यांचा दावा आहे.
 
युरोपीय देशाच्या खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर काश्मिरचा दौरा केला.
 
जम्मू-काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर परदेशी शिष्टमंडळाचा हा पहिलाच काश्मीर दौरा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी हा मोदी सरकारतर्फे प्रायोजित असलेला दौरा असल्याचं म्हटलं आहे.
 
माडी यांनी युरोपीय महासंघाच्या खासदारांना काश्मीर दौऱ्यावर आमंत्रित करताना म्हटलं होतं, की यावेळी या खासदारांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विशेष बैठकही आयोजित करण्यात येईल.
 
28 ऑक्टोबर रोजी या शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीचे फोटो प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने प्रसिद्ध केले होते.
 
युरोपीय महासंघाचे एक खासदार क्रिस डेव्हिस यांनादेखील दौऱ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र, काश्मीरमध्ये आपल्याला स्थानिकांशी मोकळेपणाने संवाद साधायचा आहे, अशी अट त्यांनी घातल्यावर त्यांना पाठवलेलं आमंत्रण मागे घेण्यात आलं होतं.
 
क्रिस डेव्हिस यांनी माडी शर्मांचं आमंत्रण पत्र बीबीसीला उपलब्ध करून दिलं. या आमंत्रण पत्रातल्या माहितीवरून कळलं, की या दौऱ्याचा खर्च भारतातल्याच 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉन अलाईड स्टडीज' या स्वयंसेवी संस्थेने केला होता. खासदारांचा हा दौरादेखील खाजगी स्वरुपाचा होता.
 
मात्र, युरोपीय महासंघातल्या खासदारांचा काश्मीर दौरा आयोजित करणाऱ्या आणि या खासदारांची पंतप्रधानांशी भेट घालून देणाऱ्या मधु शर्मा उर्फ माडी शर्मा आहेत तरी कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
 
कोण आहेत माडी शर्मा?
माडी शर्मा यांचं खरं नाव मधु शर्मा आहे. त्या भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिक आहेत. त्या युरोपीय महासंघाच्या आर्थिक आणि सामाजिक समितीच्या (ईईएससी) सदस्यही आहेत.
 
ईईएससी ही युरोपियन महासंघाची सल्लागार समिती आहे. या समितीत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित लोक असतात.
 
या समितीचा सदस्य म्हणून जी माहिती मधु शर्मा यांनी दिली आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःला माडी ग्रुपच्या संस्थापक, उद्योजक, आंतरराष्ट्रीय वक्ता, लेखक, सल्लागार, बिजनेस ब्रोकर, प्रशिक्षक आणि विशेषज्ज्ञ म्हटलं आहे.
 
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार या समितीत त्यांना ब्रिटीश सरकारच्या कॅबिनेट कार्यालयाच्या महिला आघाडीतर्फे नामनिर्देशित करण्यात आलं आहे.
 
आपल्या एका जुन्या भाषणात स्वतःची ओळख करून देताना माडी शर्मांनी म्हटलं, "माझ्याकडे कुठलीच पात्रता नव्हती, दक्षता नव्हती, प्रशिक्षण नव्हतं, पैसा नव्हता. मी सिंगल मदर होते. घरगुती हिंसाचाराची पीडित होते. माझ्यात आत्मविश्वास नव्हता. मी काय करू शकत होते. मी फक्त एकच गोष्ट करू शकत होते. मी उद्योजक होऊ शकत होते. मी स्वतःच्या स्वयंपाकघरातून व्यवसाय सुरू केला. मी घरात समोसे बनवून विकले आणि नफा कमावला. पुढे मी दोन फॅक्ट्री उघडल्या आणि त्या लोकांना रोजगार दिला ज्यांच्याकडे काम नव्हतं."
webdunia
माडी शर्मा यांच्या 'वुमेन्स इकॉनॉमिक अँड सोशल थिक टँक' या एनजीओनेच युरोपीय महासंघातल्या 23 खासदारांचा काश्मीर दौरा आयोजित केला आहे. युरोपियन महासंघातल्या ट्रान्सपरन्सी विभागातल्या कागदपत्रांनुसार सप्टेंबर 2013 साली या एनजीओची स्थापना झाली.
 
माडी शर्मा या एनजीओच्या संस्थापक आणि संचालक आहेत. कागदपत्रांनुसार या एनजीओमध्ये केवळ एकच पूर्णवेळ कर्मचारी आहे. तर दोन अंशकालीक कर्मचारी आहेत. म्हणजे केवळ तीन व्यक्ती ही थिंक टँक चालवत आहेत.
 
ही संस्था जगभरातल्या महिला आणि मुलांसाठी काम करत असल्याचा दावा कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, एनजीओच्या वेबसाईटवर तशी माहिती मिळत नाही. प्रत्यक्ष काय काम केलं, याची कसलीही माहिती वेबसाईटवर नाही.
 
संस्थेशी संबंधित व्यक्तिंची माहितीही वेबसाईटवर दिलेली नाही. 14 देशांमध्ये आपले प्रतिनिधी असल्याचा या संस्थेचा दावा आहे.
 
युरोपीय महासंघाच्या ट्रान्सपरन्सी रजिस्टरच्या कागदपत्रांनुसार गेल्या आर्थिक वर्षात या संस्थेचं वार्षिक बजेट 24 हजार युरो म्हणजेच जवळपास 19 लाख भारतीय रुपये एवढं होतं.
 
माडी शर्मा यांच्या अधिकृत प्रोफाईलनुसार त्या दक्षिण आफ्रिका, युरोपीय देश आणि भारत सरकार यांच्यासोबत मिळून काम करतात.
 
भारताशी संबंध
या दौऱ्याचा खर्च भारतातील 'इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ नॉन अलाईड स्टडीज' ही संस्था उचलणार आहे, अशी माहिती माडी यांनी खासदारांना पाठवलेल्या आमंत्रण पत्रात दिली आहे.
 
ही एक स्वयंसेवी संस्था आहे. 1980 साली या संस्थेची स्थापना झाली होती. मात्र, या संस्थेच्या वेबसाईटवर संस्थेचे संचालक किंवा सदस्यांची माहिती उपलब्ध नाही. पत्रकार गोविंद नारायण श्रीवास्तव या संस्थेचे संस्थापक होते.
 
या ग्रुपतर्फे 'New Delhi Time' हे साप्ताहिक वर्तमानपत्र आणि 'newdelhitimes.com' नावाची वेबसाईट चालवण्यात येते. माडी शर्मा या वर्तमानपत्रात युरोपीय महासंघाच्या वार्ताहर म्हणून लेख लिहितात.
 
या संस्थेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही संस्थेच्या कार्यालयात अनेक कॉल केले. मात्र, उत्तर द्यायला तिथे कुणीही हजर नव्हतं. ज्या व्यक्तीने फोन उचलला तिने ही संस्था त्याच कार्यालयातून काम करत असल्याचं सांगितलं. मात्र, संस्थेत कोण-कोण आणि किती कर्मचारी काम करतात, याची माहिती दिली नाही.
 
या सर्व संस्थांमागे श्रीवास्तव घराण्याचा श्रीवास्तव ग्रुप आहे. मात्र, याबाबतदेखील ठोस माहिती उपलब्ध नाही.
 
मालदीव दौऱ्यावर प्रश्नचिन्ह
गेल्या वर्षी मालदीवमध्ये निवडणुका झाल्या. निवडणुकांदरम्यान युरोपीय महासंघाच्या खासदारांच्या एका छोट्या शिष्टमंडळाने मालदीवचा दौरा केला होता.
 
निवडणूक निरीक्षणाच्या कथित दौऱ्यावर गेलेल्या या शिष्टमंडळात युरोपीय महासंघाचे खासदार टॉमस जेचॉस्की, मारिया गॅब्रिएल जोआना आणि रिज्सार्ड जारने यांच्या व्यतिरिक्त युरोपीयन युनियन सोशल कमिटीचे (ईईएसई) अध्यक्ष हेनरी मालोसी यांच्यासोबत माडी शर्मादेखील होत्या.
 
माडी शर्मा यांनी युरोपीय महासंघाच्या ईपी टुडे या मासिकात दौऱ्याविषयी लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी मालदीव सरकारवर टीका केली होती. लेखात त्या लिहितात,की युरोपीय लोक ज्या देशाला स्वर्ग मानतात त्या देशावर एका हुकूमशहाची सत्ता आहे. मालदीवने अधिकृतपणे या लेखाचा विरोध केला होता. त्यानंतर खासदारांचा हा दौरा खाजगी स्वरूपाचा होता, असं स्पष्टीकरण युरोपीय महासंघाने दिलं होतं.
 
मालदीव दौऱ्यावर गेलेले दोन खासदार काश्मीर दौऱ्यावरही आलेले आहे. खासदारांचा हा दौराही खाजगी स्वरुपाचा असल्याचं युरोपीय महासंघाने सांगितलं आहे.
 
माडी शर्मा आणि त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा बरेचदा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उत्तर दिलं नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुजबळ अचानक रुग्णालयात दाखल, उपचार सुरु