Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू?

मनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू?
, शुक्रवार, 5 मार्च 2021 (17:42 IST)
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळत आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत प्रश्न उपस्थित करताच काही वेळाने याप्रकरणातील तक्रारदाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
मनसुख हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीतून पोलिसांनी ताब्यात घेतलाय.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी 8 वाजल्याच्या आसपास मनसुख हिरेन दुकानातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. पण ते घरी परतले नाहीत. शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसांमध्ये मनसुख हिरेन यांच्या गायब होण्याबाबत तक्रार केली
 
पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर मुंब्रा खाडीत एक मृतदेह मिळाल्याचं समोर आलं. मृतदेहाचा फोटो मनसुख हिरेन यांच्याशी मिळताजूळता असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात हा मृतदेह मनसुख हिरेन यांचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ठाण्याच्या पोलीस परिमंडळ-1चे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
बीबीसीशी बोलताना पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे म्हणाले, "मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत काहीच माहिती देता येणार नाही. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहात आहोत."
 
मनसुख हिरेन हे कालपासून बेपत्ता होते. त्याबद्दलची तक्रार आज सकाळी दाखल करण्यात आली होती. हिरेन यांचा मृतदेह आज (5 मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास सापडला. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक लवकरच सर्वांना दिलं जाईल, असंही ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
 
एनआयए चौकशी करा - फडणवीस
आज (5 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण मांडलं होतं.
 
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीननी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला नेमका आजच विचारला होता.
 
ते म्हणाले, "26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अंबानींच्या घराजवळ सापडली. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीची ती स्कॉर्पिओ कार होती. 'अगली बार पुरी फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जैश-उल-हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्‍या दिवशी 'जैश-उल-हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं."
 
"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
 
या प्रकरणात गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती.
 
याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पत्रकार परिषदही घेतली. स्फोटकं प्रकरण NIA कडे द्यावं, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
 
या प्रकरणात अनेक योगायोग आहे. कॉल रेकॉर्ड पाहिल्यास जून-जुलै 2020 दरम्यान याच गाडी मालकाशी सचिन वझे यांचा संवाद झाल्याचा पाहायला मिळतो. यात अनेक संशय निर्माण झाले आहेत. यात काहीतरी गौडबंगाल आहे. या केसमधल्या इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा असा मृतदेह मिळणं संशयास्पद आहे. ही केस एनआयएकडे सूपूर्त करण्यात यावी, ही मागणी लावून धरणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता?