Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार?

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार?
लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही शिवसेना भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यश मिळाल्याने मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चेहऱ्यांचा समावेश असेल असे दिसून येते.
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआच्या पहिल्या सरकारमध्ये नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, रामदास आठवले यांचा समावेश होता.
 
परंतु शपथविधीनंतर आठवड्याभराच्या अंतरानेच गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर मार्च 2015 मध्ये रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
 
प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, पीयूष गोयल, सुरेश प्रभू हे मंत्री राज्यसभेचे सदस्य आहेत. यामधील सुरेश प्रभू आंध्र प्रदेशातून राज्यसभेत गेले आहेत.
 
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अनंत गीते आणि भाजपाचे हंसराज अहीर पराभूत झाले आहेत. मात्र अहीर यांना पुन्हा संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे.
 
शिवसेनेतर्फे अरविंद सावंत
शिवसेनेचे अनंत गीते पराभूत झाल्यामुळे आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असे दिसते. गेल्या मंत्रिमंडळामध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते.
 
आता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
 
1999-2002 आणि 2004-2010 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. गेल्या लोकसभेत त्यांनी मुंबईतील विविध विषयांवर आपली मते मांडली होती. शिवडी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.
 
अनंत गीते यांच्यासह शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ यांचाही या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे आता मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू होती. आता राऊत यांनी केलेल्या घोषणेमुळे त्याला पूर्णविराम मिळाला आहे.
 
कोणाचे मंत्रिपद कायम राहाणार?
गेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदे कायम राहातील असे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असे मानले जाते. दिल्लीमध्ये आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या अभिनंदनासाठी तयारी सुरू केली आहे.
 
मुंबईच्या पारड्यात काय?
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळात मुंबईतील खासदार मोठ्या संख्येने होते. मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता या कालावधीमध्ये मंत्री झाले. लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांचे निधन झाल्यानंतर मनोहर जोशी यांच्याकडे लोकसभेचे सभापतीपद आले.
 
त्याप्रमाणे प्रमोद महाजन मंत्रिमंडळात महत्त्वाच्या स्थानी होते. (1996-98 या कालावधीत प्रमोद महाजन मुंबई ईशान्य मतदारसंघातून लोकसभेत गेले होते.)
 
नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पीयूष गोयल, सुरेश प्रभू, स्मृती इराणी हे मुंबईत राहाणारे परंतु राज्यसभेत निवडून गेलेले सदस्य होते.
 
आता अरविंद सावंत यांच्या निमित्ताने मुंबईला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असले तरी भाजप आपल्या कोणत्या सदस्याला संधी देतो याची उत्सुकता सर्वांना आहे.
 
गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्ल्ड कप: राऊंड रॉबिन फॉरमॅट टीम इंडियासाठी फायद्याचं?