Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्लेटोने का म्हटलं होतं, 'लोकशाहीतूनच हुकुमशाहीचा जन्म होतो'

प्लेटोने का म्हटलं होतं, 'लोकशाहीतूनच हुकुमशाहीचा जन्म होतो'
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (17:01 IST)
तुम्ही भर समुद्रात एका बोटीवर असताना काय कराल?
 
1. होडी कशा पद्धतीने चालवायची हे ठरवण्यासाठी निवडणूक घ्याल?
 
2. की बोटीवर उपस्थित असणाऱ्या कोणाला नाव चालवता येते का, याचा शोध घ्याल?
तुम्ही जर दुसरा पर्याय निवडलात तर याचा अर्थ की यासारख्या परिस्थितीमध्ये एखाद्या विषयाची जाण असणं वा कौशल्यं असणं महत्त्वाचं ठरतं.
 
जीवन-मरणाचा प्रसंग आलेला असताना आता पुढे काय करायचं, असा विचार करत बसणाऱ्या नवशिक्याला अशा वेळी प्राधान्य दिलं जाणार नाही.
मग एक अशीच मोठी नाव, ज्याला राज्य म्हणतात, ती चालवणाऱ्यांविषयी तुमचं काय मत आहे?
 
निवडणुकीच्या माध्यमातून नेता निवडण्याऐवजी मग राज्याचं नेतृत्व करण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा शोध घेणं हा चांगला पर्याय नाही का?
 
लोकशाहीचं जन्मस्थान म्हटल्या जाणाऱ्या अथेन्समधले तत्त्वज्ञ प्लेटो यांनी आजपासून 2400 वर्षांपूर्वी त्यांच्या ' द रिपब्लिक' या पुस्तकाच्या सहाव्या प्रकरणात हा सवाल केलाय. न्याय, मानवी स्वभाव, शिक्षण आणि सद्वर्तनासारख्या विषयांवरचं हे सगळ्या पहिलं आणि अत्यंत प्रभावी पुस्तक आहे.
 
सरकार आणि राजकारणाविषयीही या पुस्तकात सांगण्यात आलंय. गप्पांच्या स्वरूपात लिहीण्यात आलेल्या या पुस्तकामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो आणि त्यांच्या मित्रमंडळींमधली राजकारणाविषयीची चर्चा आहे. एक सरकार दुसऱ्या सरकारपेक्षा चांगलं का असतं याविषयीची माहिती गुरू-शिष्याच्या चर्चेतून मिळते.
 
लोकशाहीविषयीचे प्लेटो यांचे विचार या पुस्तकातून स्पष्ट होतात. ग्रीक भाषेत लिहीलेल्या या पुस्तकात ते म्हणतात, "लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे निर्णय लोकोपयोगी नाहीत."
 
एखादा उमेदवार कसा दिसतो यासारख्या गोष्टींमुळे मतदार प्रभावित होऊ शकतात, आणि एखाद्या नेत्याला मत देणं आपल्याला कसं कठीण गेलं याविषयीही त्यांनी लिहीलंय. इतर गोष्टींमुळे मतदार प्रभावित झाले तर शासन चालवण्यासाठी कोणती पात्रता एखाद्या व्यक्तीत असणं गरजेचं आहे याची जाणीव मतदारांना होणार नाही, असंही ते लिहीतात.
 
विचारवंत नायजेल वॉरबर्टन बीबीसीच्या हिस्ट्री ऑफ आयडियाज या सीरिजमध्ये सांगतात, "जे तज्ज्ञ सत्तेच्या प्रमुख पदांवर असावेत, असं प्लेटोला वाटत होतं ते लोक विशेष प्रशिक्षण असणारे विचारवंत असावेत, असं त्यांना वाटत होतं. त्यांची इमानदारी, परिस्थितीची पूर्ण समज (सामान्यांपेक्षा कित्येक पटींनी जास्त) या आधारावर या लोकांची निवड व्हावी."
 
सत्तेचं स्वरूप
अॅरिस्टोक्रसी या शब्दाचा अर्थ - 'चांगल्या लोकांचं सरकार.' या प्रकारच्या सरकारमध्ये काही लोक आयुष्यभर चांगला नेता होण्यासाठीची तयारी करतात. प्रजासत्ताक चालवण्याची आणि बुद्धिमत्ता वापरून समाजासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी या लोकांची असते."
 
बीबीसीच्या आयडियाज कार्यक्रमात सहभागी झालेल्या विचारवंत लिंडसे पोर्टर सांगतात, "त्यांचे विचार विशेष होते. हे सगळे अॅरिस्टोक्रॅट्स निःस्वार्थ भावनेने आणि बुद्धिमानपणे शासन करतील असा प्लेटोंचा विचार होता."
 
पण असं असलं तरी आदर्श समाज कायमच पतनाच्या उंबरठ्यावर असेल.
पोर्टर सांगतात, "या सुशिक्षित आणि विचारवंतांची मुलं शेवटी ऐशोआरामामुळे भ्रष्ट होतील अशी शंका त्यांनी वर्तवली होती. असं झाल्याने ते फक्त स्वतःच्या संपत्तीचा विचार करतील आणि परिणामी अॅरिस्टोक्रसी ही एक ओलिगार्की म्हणजे निवडक लोकांपुरतं मर्यादित राहणाऱ्या शासनात रूपांतरित होईल."
 
हे श्रीमंत आणि संकुचित मनोवृत्तीचे शासक अर्थसंकल्पातल्या संतुलनाची काळजी करती. यामध्ये बचत करण्यावर भर असेल आणि त्यामुळे असमानता वाढेल.
 
प्लेटो लिहितो, "जसजसे हे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील, ते अधिक पैसे कमावण्याचा विचार करतील आणि नीतीमूल्यांबाबत फार विचार करणार नाहीत."
 
जसजशी असमानता वाढेल तशी श्रीमंतांपेक्षा अशिक्षित गरीबांची संख्या वाढेल. आणि शेवटी ओलिगार्क सत्ता संपुष्टात येईल आणि या राज्याचं रूपांतर एका प्रजासत्ताकात होईल.
 
लोकशाहीचं कौतुक असण्याची सवय असणाऱ्या आपल्या सगळ्यांना हे ऐकायला विचित्र वाटेल की लोकशाही ही अॅरिस्टोक्रसी आणि ऑलिगार्कीनंतरची तिसऱ्या दर्जाची शासन व्यवस्था आहे.
 
इतकंच नाही तर 'द रिपब्लिक' मध्ये सॉक्रेटिस म्हणतो की "लोकशाही हे अराजकतेचं एक सुखद रूप आहे." आणि हे रूपदेखील त्यातल्या विरोधाभासामुळे इतर शासन व्यवस्थांप्रमाणेच संपुष्टात येतं.
 
ज्याप्रमाणे अॅरिस्टोक्रसीमधून ऑलिगार्कीचा जन्म झाला होता त्याचप्रमाणे लोकशाहीमधून निरंकुशता जन्माला येईल.
 
कारण ज्यावेळी लोक संपत्ती मिळवण्यासाठी एक प्रकारची आंधळी शर्यत सुरू करतात तेव्हा समाजामध्ये समानतेसाठीची मागणी व्हायला लागते आणि समानतेसाठीची भूक जन्माला येते. आणि अशा प्रकारने स्वातंत्र्याची एक अतृप्त ओढ एक प्रकारची निरंकुशता निर्माण करते.
 
बहुसंख्यांना स्वातंत्र्य
हा विचार स्वीकारणं काहीसं कठीण आहे. पण ज्यावेळी लोकांना स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यांना अधिक स्वातंत्र्य हवं असतं.
 
कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य मिळवणं हे उद्दिष्टं असेल तर या स्वातंत्र्यामुळे बहुसंख्यांचा एक गट आणि मतभेदांचा जन्म होतो. यातल्या बहुतेकांच्या संकुचित विचारांमुळे त्यांना स्वतःपुढे इतर काही दिसत नाही.
 
अशामध्ये नेता होण्याची इच्छा असणाऱ्याला या गटांना संतुष्ट करावं लागतं. या लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो आणि ही परिस्थिती एखाद्या हुकूमशहाचा जन्म होण्यासाठी योग्य असते. कारण लोकशाहीवर काबू मिळवण्यासाठी तो जनतेला भ्रमात ठेवतो.
 
इतकंच नाही तर कोणतीही बंधनं नसणारं स्वातंत्र्य उन्माद असणाऱ्या जमावाला जन्म देतं. असं झाल्यास लोकांचा शासकावरचा विश्वास कमी होतो. लोक अडचणीत येतात आणि त्यांच्यातल्या भीतीतल्या खतपाणी घालणाऱ्या आणि स्वत)ला त्यांचा रक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तीला समर्थन देतात.
 
पण अथेन्स वासियांकडे प्रत्यक्ष लोकशाही होती. जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी मतदार मतदान करत आणि हे एखाद्या कधीही न संपणाऱ्या जनमत चाचणीसारखं होतं.
 
विचारवंत लिंडसे पोर्टर सांगतात, "आज अशा अनेक संस्था आहेत ज्या प्लेटोच्या काळात नव्हत्या. यामध्ये प्रतिनिधित्व असणाऱ्यी लोकशाही, सुप्रीम कोर्ट, मानवाधिकार कायदे, सर्वांसाठी शिक्षण या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी अविचारी जमावाला काबूत आणण्यासाठीची ही साधनं आहेत."
 
पण गेल्या काही काळातल्या डोनाल्ड ट्रंप यांच्यासारख्या नेत्यांच्या उदयामुळे 'द रिपब्लिक' मधल्या धोक्याच्या सूचना पुन्हा एकदा महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
 
अँड्य्रू सॅलिवान यांच्यासारख्या अनेक विश्लेषक आणि राजकीय भाष्यकारांनी बीबीसीच्या न्यूजनाईट या कार्यक्रमात प्लेटोंचे हे विचार मांडले होते.
 
ते सांगतात, "याप्रकारचे नेते सहसा उच्च वर्गातले असतात पण सद्यपरिस्थितीची त्यांना माहिती असते. आपलं सर्वकाही ऐकणाऱ्या एका गटावर ते वर्चस्व मिळवतात आणि त्याच गटामधल्या श्रीमंतांना ते भ्रष्टाचारी म्हणायला लागतात."
 
"शेवटी ते एकटे पडतात आणि गोंधळलेल्या - स्वतःमध्ये रमलेल्या जनतेला अनेक पर्यांयांपैकी एक निवडण्याचं आणि लोकशाहीच्या असुरक्षिततांपासून स्वातंत्र्यं देतात. ही व्यक्त स्वतःकडे सर्व प्रश्नांचं उत्तर असल्याचं सांगते. आणि एखाद्या प्रश्नाचा तोडगा या व्यक्तीकडे असल्याचं समजून जनता उत्साहात आली की ती या उत्साहाच्या भरात लोकशाही संपुष्टात आणते."
 
पण लिंडसे पोर्टर याविषयी सांगतात, अॅरिस्टोक्रॅट्सद्वारे शासन चालवण्याचा विचार म्हणजे अशा लोकांनी केलेलं नेतृत्वं जे ऐहिक सुखापासून दूर असतील, असं नेतृत्व भ्रष्ट होणार नाही आणि त्यांच्या शिक्षणामुळे ते चांगले आणि बुद्धिमान निर्णय घेतील.
 
असे लोक जे स्वतःला विचारतील, "सगळ्यात योग्य आणि विवेकाचं पाऊल काय असेल?"
 
अशामध्ये प्लेटोंचा एक विचार महत्त्वाचा आहे - "योग्य, विवेकी आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा, नीतीमूल्यांचं राज्य असावं, भावनांचं नाही."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोनाल्ड ट्रंपविरोधात दुसऱ्या महाभियोगाचा मार्ग मोकळा, आजपासून सुनावणी