काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका सोसायटीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.महिलांनो असे कपडे घाला की, कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये, असा फलक या सोसायटीत लावला होता.
त्याच फलकाच्या खाली मन असं निखळ ठेवा की, कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये, असा फलक लावण्यात आला.यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली.
वटपौर्णिमेच्या वेळी संभाजी भिडे यांनी पंजाबी ड्रेस घातलेल्या बायकांनी पूजा करू नये अशा आशयाचं विधान केलं होतं.
पुण्यातला फलक असो की, संभाजी भिडेंचं वक्तव्य, मुळात नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात? हे जबाबदारीचं ओझं बाईच्या खांद्यावर टाकताना पुरुषांना मात्र मर्यादेच्या चार गोष्टी सांगायला आपण का विसरतो? खरंतर कोणी काय घालावं हा वैयक्तिक प्रश्न, पण जेव्हा विषय बाईच्या कपड्यांचा येतो, तेव्हा तो लगेचच सामाजिक का बनतो?
या सगळ्याच मुद्द्यांचा उहापोह करणारा लेख डिजिटल क्रिएटर आणि स्त्री-पुरुष समतेवर प्रशिक्षण घेणाऱ्या लक्ष्मी यादव यांनी बीबीसी मराठीसाठी लिहिला आहे.
बाईच्या कपड्यांचे पॉलिटिक्स
महिलांच्या पेहरावाच्या आणि मुख्यत्वे कपड्यांच्या अवतीभोवतीच्या चर्चा जगभर नेहमीच होत असतात. भारतात तर कुणीही उठतं आणि स्त्रियांना कपड्यांच्या बाबतीत उपदेश देत राहतं. घरातला धाकटा भाऊदेखील बहिणीला कसे घालायचे नाहीत हे ठणकावून सांगतो.
जादुई नेतृत्व (Charismatic) असणारे लोक, सत्तेतील किंवा बुद्धिमत्ता, पैसा असलेले लोक म्हणजे ज्यांच्याकडे समाजाच्या विचारांची दिशा ठरवण्याची, संमोहित करण्याची शक्ती असते, ते लोक जी काही वक्तव्ये स्त्रियांच्या बाबतीत करतात त्यावर सर्वसामान्य लोक प्रश्न उपस्थित न करता विश्वास ठेवतात. उदा. इंदुरीकर महाराज, सिंधुताई सपकाळ, मंत्री इ. या लोकांनी जर स्त्रियांनी कमी कपडे घालू नये किंवा काय घालावे हे सांगितले तर त्यांचे अनुयायी, लोक तात्काळ तो विचार स्वीकारतात आणि सगळीकडे पसरवतात.
शिवाय ज्या विचारांचे शासन सत्तेत असते त्याचाही समाजाच्या विचारांवर प्रभाव पडतो. गेल्या काही वर्षात स्त्रियांवर अप्रत्यक्षपणे वचक बसवण्याचा, त्यांना पुन्हा परंपरांच्या जोखडात अडकवून अनेक वर्षे मागे नेण्याचा प्रकार भारतात सुरू आहे.
आजकाल सोशल मीडिया, सिनेमे, मालिका, जाहिरातींमधून स्त्रियांनी कसे कपडे घालावेत, महिलांनी कसे संस्कारी असावे हे सांगणारे सीन, फोटो, विडिओ, मेसेज फिरवले जातात.
एआयद्वारे तयार केलेल्या एका फोटोत भारताच्या पंतप्रधानांच्या हातात एक पोस्टर दिले आहे ज्यावर लिहिले आहे, “ क्या आप चाहते हो की भारत मे लडकीयोंके छोटे कपडे बंद होने चाहिये?” यावरचा प्रतिसाद पाहिला तर सगळे दुजोरा देणारे पुरुष.
त्यांच्या बायका बघा कशा नखही दिसू देत नाहीत, आपल्या बायका मात्र साड्या सोडून जीन्स वापरायला लागल्या, आवरा आपल्या बायकांना, असे बायांची प्रतवारी करून धार्मिक ध्रुवीकरण करणारे मेसेज व्हाट्स अप, फेसबुकवरून शेयर केले जातात. आयटीसेलची कमाल आहे ही! सोशल मीडियाचा जनमत तयार करण्यासाठी पुरेपूर वापर केला जात आहे.
कपड्यांची उत्क्रांती गरजेनुसार, संस्कृती वगैरे थोतांड
कपड्यांचा शोध मुख्यत: त्वचेच्या संरक्षणासाठी लागला. जनावरांच्या कातडीपासून सुरुवात झालेला कपड्यांचा प्रवास सिल्क, जीन्सपर्यंत पोहोचला.
कपड्यांबाबत जे काही सिद्धान्त सांगितले जातात त्यापैकी संरक्षण(protection शारीरिक गरज), शृंगार आणि ओळख( भावनिक गरज: adornment यात लैंगिक आकृष्टी असेलच असे नाही), लैंगिक आकृष्टी (Immodesty), विनय/सभ्यता आणि दर्जा (modesty and status: सामाजिक गरज) हे काही सर्वसामान्य सिद्धान्त आहेत.
यातील संरक्षण आणि दर्जा, शृंगार हे सहसा पुरुषांना लागू केले जातात तर लैंगिक आकृष्टी आणि विनय हे स्त्रियांना लागू केले जाणारे सिद्धांत आहेत.
मानवी उत्क्रांतीत माणसाने भारतीय संस्कृतीत स्त्री पुरुषांनी घालण्याच्या कपड्यांची गरजेनुसार, ऋतुनुसार उत्क्रांती होत गेली आहे. त्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे फक्त साडी सलवार-कमीज म्हणजेच भारतीय संस्कृती हे पूर्ण सत्य नाही.
हळूहळू वैयक्तिक, सामाजिक ओळख आणि स्टेटस म्हणूनही कपड्यांकडे पाहिले जाऊ लागले. साडीचा इतिहास पाहिला तर असं म्हटलं जातं की साडी हे स्त्री आणि पुरुषांनी अंगाभोवती गुंडाळण्याचं एक कापड होतं.
पुढे जाऊन पुरुषांनी आपल्याला सोयीस्कर असे कपडे तयार केले, इतर देशांचे कॉपी केले आणि वापरात आणले, महिलांची मात्र साडी तशीच राहिली.
ज्या भारतीय संस्कृतीचे दाखले वारंवार दिले जातात त्यात संस्कृतीत अजिंठा वेरूळ किंवा आदिवासी संस्कृतीसुद्धा येते. (आदिवासी महिलांनाही सुसंस्कृत शहरी महिलांचे पाहून कपडे घालण्याच्या पद्धतीत बदल करावे लागले आहेत. शिवाय पुढील काळात अजिंठा वेरूळ लेण्यातील उघड्या स्त्रियांच्या अंगावर कपडे घातले जाऊ शकतात हीही शक्यता नाकारता येत नाही.) मात्र संस्कृतीरक्षक त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृतीच वारंवार उगाळत असतात.
धर्माची भीती हे प्यादं
बर्याचदा आपल्या सुनेनं, मुलीनं किंवा समाजातल्या इतर बायांनी कसे कपडे घालावेत याबद्दल महिलाही पुढाकाराने बोलत असतात. याचं कारण बाईनं “चांगली बाई” बनायला हवं तर तिला पुरुष स्वीकारतील असं तिच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं असतं. पुरुषांच्या पिढ्या हे स्त्रियांना सांगतात आणि स्त्रियांच्या अनेक पिढ्या तो वारसा पुढे सुरू ठेवतात.
आपल्या धर्मात असं सांगितलं आहे (म्हणजेच धर्मबुडव्यांना समाजाबाहेर काढलं जाईल) असं एकदा सांगितलं की, बायका गप्प बसतात, हाही कपड्यांच्या पॉलिटिक्सचाच एक भाग आहे. धर्माची भीती हे प्यादं आहे.
भारताच्या इतिहासात काही काळ मातृसत्ताक पद्धती होती, मात्र त्यानंतरच्या पितृसत्ताक पद्धतीत स्त्रियांच्या लैंगिकतेवर प्रचंड नियंत्रणं आली. मुळात स्त्रीच्या शरीराकडे निखळ पाहिलेच न गेल्याने तिची ओळख ती किती अंग झाकते यावरून ठरवली जाते.
पुरुषांनी पुरुषांसाठी लिहिलेल्या धर्मग्रथांनी साजेसे कपडे घालण्याचा उपदेश दिला. केसापासून पायापर्यंत अंग झाकणारे असा साजेशा कपड्यांचा अर्थ पुरुष अनुयायांनी घेतला आणि महिलांसोबत कपड्यांचे राजकारण करायला सुरुवात केली.
जेवढी जात आणि धर्म वरच्या पातळीवरचा समजला जातो, त्या जात धर्मात स्त्रियांच्या कपड्यांवर (एकूण लैंगिकतेवरच आणि जगण्यावर) जास्त बंधने असतात.
उदा. मराठा समाजातील स्त्री पुरुष समता समजून घेण्यासाठी केलेल्या छोट्याशा अभ्यासात एका समूहातील स्त्रीने डोक्यावरुन पदर घेणे हे सभ्यतेचे लक्षण आहे असे 80% पुरुष आणि 72% स्त्रियांनी उत्तर दिले होते. मराठा स्त्रियांनी साडी घालणे ही त्या खानदानी असल्याची निशाणी आहे असं 76% सहभागींनी सांगितलं तर 70% सहभागींनी स्त्रियांनी लग्नानंतर साडीच घालायला हवी असं मत व्यक्त केलं.
एकीकडून जवळच्या किंवा उपलब्ध होऊ न शकणार्या स्त्रियांचं शरीर कपड्यांनी झाकलेलं असावं(फक्त ते नवर्याला दिसावं हे अभिप्रेत) अशी अपेक्षा आणि दुसरीकडून उपलब्ध असणार्या स्त्रीचं जास्तीत जास्त शरीर उघडं असायला हवं म्हणत तिच्या शरीराला वस्तू (commodity) समजून बाजार मांडायचा, ही पितृसत्तेची निशाणी आहे.
देहविक्रय करणार्या स्त्रियांचे लैंगिक अवयव किती उघडे आहेत किंवा तिने किती कमीत कमी कपडे घातलेले आहेत यावरून सभ्य, संस्कारी पुरुष तिची निवड करतात. आणि बायकोचा राग आल्यावर तिला देहविक्रय करणारी म्हणून हिणवतात.
स्वातंत्र्यपूर्व भारतात तथाकथित खालच्या जातीच्या स्त्रियांना कमरेचा वरचा भाग, स्तन झाकण्याची परवानगी नाकारणारे, त्यासाठी ब्रेस्ट टॅक्स घेणारे हेच उच्चजातीय संस्कृतीरक्षक होते ही ऐतिहासिक नोंद घ्यायला हवी अशी बाब.
केवळ ब्लाऊज घालण्यासाठी भारतात नंगेली नावाच्या स्त्रीला त्यासाठी आपले दोन्ही स्तन कापावे लागले आणि या बायांना 50 वर्षे संघर्ष करावा लागला. 21 व्या शतकातही स्त्रियांना आवडीचे कपडे घालण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे.
महिला शिक्षकांना साडी बंधनकारक, कॉलेजमध्ये जीन्स शर्टला बंदी, गुरुजींचे साडी घालणार्या महिलांनीच वटसावित्रीच्या पूजेला जावे, अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये असं म्हणणं ही उदाहरणे म्हणजे महिलांबाबतच्या योनिशुचितेच्या संकल्पनांना बळकटी देणारं आणि महिलांच्या लैंगिकतेवर ताबा मिळवणारं आहे.
असंच वातावरण आणखी काही वर्षं राहिलं तर कदाचित मुली आणि स्त्रियांनी लहान कपडे घालू नये, त्याने लोकांच्या धार्मिक, सांस्कृतिक भावना दुखावल्या जातात या सबबीखाली महिलांनी कोणते सभ्य कपडे घालावेत यासाठी कायदा किंवा मार्गदर्शक तत्वे येऊ शकतात.
ही कल्पना आता हास्यास्पद वाटू शकते, मात्र पुढील काळात अशा विचारांची व्यवस्था सत्तेत राहिली तर कायदा आल्यास आश्चर्य नको. याची सुरुवात निदान महाराष्ट्रात तरी झाली आहे असं म्हणता येईल. भिडे गुरुजींसारख्यांच्या माध्यमातून आधी पाण्यात दगड टाकून पाहिला जातो किती खोल बुडतो ते.
नग्नता सामाजिक, नैसर्गिक नाही
नग्नता ही सामाजिक असते, नैसर्गिक नाही या समजेपर्यंत तर कुणी पोहोचत नाहीच मात्र फक्त स्त्रिच्या शरीरालाच अश्लिलतेचं कोंदण लावून पितृसत्ताक समाज मोकळा होतो.
कमी कपडे घालणारी स्त्री म्हणजे अपवित्र, खालच्या जातीची, चारित्र्यहीन आणि चारित्र्यहीन स्त्री ही सर्व पुरूषांना उपलब्ध असं समजून त्यांच्यावर बलात्कार होतात असं स्त्री शोषणाचं पितृसत्ताक समीकरण आहे(आणि म्हणून घरातल्या बाईने ती पतिव्रता आहे हे दाखवण्यासाठी साडी वा तत्सम अंग झाकणारे कपडे घालावेत.)
स्त्रीयांचे कपडे त्यांच्यावर होणार्या छेडछाडीला किंवा बलात्काराला कारणीभूत असतात असं मत सर्वसामान्य स्त्री पुरुषांपासून ते पोलीस, वकील आणि मंत्र्यांपर्यंत बर्याच जणांचे असते. मात्र लहान मुलगी, वृद्धा किंवा पूर्ण कपड्यात असणार्या स्त्रीवरही बलात्कार होतो यातून कपडे नव्हे तर त्यामागे वर्चस्ववादी पुरुषसत्ताक मानसिकता कारणीभूत असते हेच सिद्ध होतं.
बाईने नखशिखांत कपड्यात गुंडाळून राहावे कारण एक तर तिचे शरीर फक्त तिच्या नवर्याला दिसावे आणि ते इतर पुरुषांना दिसले तर याचा अर्थ ती स्त्री त्या पुरूषांना आकृष्ट करते असा होतो. यातून पुरुषाची मालकी तर दिसतेच पण तिचं स्वातंत्र्य बंदिस्त होतं.
सभ्यतेचे नियम पुरुषांना का लागू नाही?
कपडे सभ्यतेचे (modesty) आणि संस्कृतीचे द्योतक आहेत तर मग सभ्यतेचे नियम पुरूषांना का लागू नाहीत. म्हणजे पुरूषांना सभ्य समजलं जात नाही की त्यांना सभ्य होण्याची गरज नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
नग्नता किंवा अश्लीलतेचे नियम फक्त महिलांनाच का लागू असतात याच उत्तर कुणाकडेही नसतं. उदा. खोल गळा असलेले किंवा छोटे कपडे, जीन्स ती शर्ट घातलेली स्त्री म्हणजे अश्लील, असभ्य आणि तेच सार्वजनिक जीवनातही नग्न फिरणारे साधू किंवा मुनी पूजनीय हे कपड्यांचे पॉलिटिक्स आणि स्त्रियांबाबतीतील सांस्कृतिक दहशतवादसुद्धा आहे.
आपल्याकडे संस्कृती जपण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांच्याच अंगावर टाकत असतात. भारतीय संस्कृतीत पुरुष घोळदार कपडे, स्कर्ट, दागिने घालत होते. पण पुरुषांनी त्यातल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी घालणे सोडून दिले.
आताचे पुरुषांच्या कपडे हे पाश्चिमात्य धर्तीवर आधारित आहेत याचा अर्थ त्यांनी भारतीय संस्कृती, धर्म बुडवला असं नाही तर संस्कृती काळानुसार बदलत असते हे त्यामागील कारण आहे.
एका देशाची संस्कृती ही जगभरातील संस्कृतींची सरमिसळ असते आणि भारतीय पेहरावावर मुघल, ब्रिटिश यांची छाप आहे. सतत स्त्रियांच्याच मागे संस्कृती जपण्यासाठी जबरदस्ती करणारे पुरुषांना घोळदार स्कर्ट, धोतर, पटका, सदरा का घालायला सांगत नाही किंवा पुरुषांनी छोटे कपडे घातले तर त्यांच्यावर बलात्कार होईल, हे समाजात का रुजत नाही?(असं काही रुजायला नकोच.)
यात कपड्यांचं पॉलिटिक्स आहे, ते म्हणजे ही समाजधारणा पुरुषांनी पुरुषांच्या सोयीची केली आहे. विविध ड्रेस कोडमधून सहसा पुरुष सुटून जातात कारण त्यांच्या शर्ट-पँट या नेहमीच्या सोयीस्कर (अभारतीय) पेहरावावर काहीच फरक पडत नाही.
लग्नाआधी सलवार कमिज, जीन्स शर्ट वापरणार्या मुलीला लग्न झालं की साडीच सावी लागते. एका जीन्स घालणार्या, नोकरी करणार्या मुलीला पाहायला आलेल्या मुलाने “तुला साडी नेसून चुलीवर पोळ्यांचा स्वयंपाक येतो का?”असं विचारणं किंवा “स्त्री सगळ्यात जास्त सुंदर साडीतच दिसते” ही मिथक आहेत.
शर्ट काढून हवेत भिरकावून छाती उघडी ठेवणारा पुरुष मर्द म्हणवला जातो तर केवळ आकाराने मोठे आहेत म्हणून स्त्रीचे स्तन अश्लील होतात. अमेरिकेतील सहा राज्यातील स्त्रियांनी कोर्टात एक केस टाकली होती. त्यांनी कोर्टाला राज्यात टॉपलेस फिरायची परवानगी मागितली होती.
त्यांचे म्हणणे होते की पुरुषांचे स्तन sex object नाहीत तर फक्त स्त्रियांचेच का? पुरुषांच्या स्तनापेक्षा आमचे स्तन आकाराने मोठे आहेत म्हणून ते अश्लिलता पसरवतात असे कसे होऊ शकते?
कोर्टाने स्तनांच्या आकारावरुन अश्लीलता ठरवू शकत नाही हा त्यांचा युक्तिवाद मान्य केला आणि त्यांना टॉपलेस फिरायची परवानगी मिळाली.बर्याचदा महिलांना असं ऐकवलं जातं की बाईचे कपडे, शरीर किंवा एकंदरीतच लैंगिकता या विषयांपेक्षा पुढे जाऊन स्त्रियांच्या संबंधित महत्वाच्या विषयांवर बोलायला हवं.
त्या विषयांवरही बोलायलाच हवं, मात्र लैंगिकता स्त्रियांच्या रोजच्या जगण्यावर जेवढ्या जास्त प्रमाणात परिणाम करत असते त्याच्या अगदीच गौण प्रमाणात पुरुषांच्या जगण्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून स्त्रिया या विषयावर बोलतात, बोलत राहतील.
लैंगिक अवयांबद्दल नॉर्मल व्हायला हवं
“अगर कपडे नोचेंगे, तो कपडोंके के साथ हूँ और अगर कपडे थोपेंगे तो कपडोंके के खिलाफ हूँ” हे पुढील काळातील ब्रीद असणार आहे.मुळात आपण शरीराबद्दल, लैंगिक अवयवांबद्दल सामान्य/नॉर्मल व्हायला हवं. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे लैंगिक अवयवांकडे निकोप नजरेने पाहायला हवं.
अगदी पुरातन काळापासून कपडे विरहीत शरीर हा आपल्याच संस्कृतीचा, कलेचा अविभाज्य भाग होते हे हेतूपूरस्सर विसरू नये. इथे मुद्दा स्त्री पुरुष समतेचा आहेच तसा तो एकुणात माणसाच्या शरीराकडे अश्लील म्हणून न पाहता नैसर्गिक म्हणून पाहण्याचा आहे.स्त्रियांना कसा पेहराव वापरावासा किंवा सोयीस्कर वाटतो, त्या कोणत्या प्रकारच्या पेहरावाशी त्या स्वत:ला जोडून घेतात या बाबींचा विचार न करता त्यांच्यावर होणारी कपड्यांची जबरदस्ती थांबली पाहिजे.
आवडीप्रमाणे कपडे घालणे ही चॉईस प्रत्येकाला मिळायला हवी (साडी, दागिने नेसण्याचीही चॉईस पुरुषांना मिळायला हवी! साडी नेसल्यावर पुरुषाचा मर्दपणा लयास जाणार नाही.
बाईचे समजले जाणारे कपडे, दागिने, वस्तु पुरुषाने वापरले की तो कमी पुरुष होतो हे आणखी एक बाईच्या कपड्यांना कमी लेखणारं, न्यूनत्व देणारं पॉलिटिक्स! ) प्रत्येक व्यक्तीचा हवं तसं राहण्याचा अधिकार, विशेषत: पुरुषांनी स्त्रियांचा, मान्य करायला हवा. जर तो अधिकार पुरुषाला आहे तर त्याने स्त्रीला याबाबत अडवू नये.
भारतीय संविधानानुसार स्त्री, पुरुषांना समान वागणूक आहे, तरीही भारतात स्त्रियांवर जुने, पारंपरिक विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जातो.
कुटुंब, देश चालवणार्या बायांना कपडे घालण्याची अक्कल नाही असं समजून त्यांना शिकवणे किंवा त्यांचे मूल्यमापन कपड्यात करणे थांबले पाहिजे. मुळात स्त्रियांनी कसलेही कपडे घातल्याचा प्रॉब्लेम स्वत: स्त्रियांना नसतो, पुरुषांना असतो. त्यामुळे पुरुषांनी स्त्रिच्या पेहरावाकडे पाहण्याची नजर स्वच्छ करण्याची गरज आहे.
मुलींना जसं त्यांच्या हक्कांबाबत जागरूक केलं जातं तसंच मुलग्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्यात येणारी मुलगी किंवा एकुणात स्त्री स्वत:च्या निर्णयांबाबत स्वतंत्र असणार आहे हे पालक, शाळा, शासन यांनी सांगायला हवं.
कोणत्याही व्यक्तीला दाबल्यावर ती व्यक्ती जशी आनंदी राहत नाही तसंच तिच्या सहवासातील व्यक्तीही आनंदी राहू शकत नाही या न्यायाने स्त्रिया आनंदी तर कुटुंब, देश आनंदी. स्त्रियांची ओळख फक्त कपडे नसतात, त्यापलीकडे जाऊन त्यांचं अस्तित्व असतं हे समाजाने मान्य करायला हवं.
स्त्रीचे चारित्र्य कपड्यात मोजणे सोडून द्यावे. मुळात चारित्र्य म्हणजे व्यक्तीचे वर्तन, मग ते स्त्रीचे असो की पुरुषाचे; त्याचा कपड्यांशी संबध नसतो. हीच आपली संस्कृती, हाच आपला धर्म हे पालूपद आता सोडून द्यावे. संस्कृती गरजेनुसार बदलत राहते आणि “हे असंच का” असं कोणत्याही धर्माला कुणालाही विचारता आलं पाहिजे, त्याने धर्म बाटत नाही, वाढत जातो. महाराज सिनेमात म्हटल्याप्रमाणे,
“सवाल ना पुंछ सके वो भक्त अधूरा है
और जवाब ना दे सके वो धर्म अधूरा है”
स्त्रियांनी स्त्रियांना कपड्यांच्या राजकारणातून बाहेर काढायला हवं
स्त्रियांनीही जमेल तसं इतर स्त्रियांना या कपड्यांच्या राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे. बर्याचदा एका स्त्रीबरोबर दुसरी स्त्री उभी राहिली तर समोरून होणारा विरोध कमी होतो.
पुरुषांनीही यात पुढाकार घेतला पाहिजे कारण स्त्रियांच्या कपड्यांचे पॉलिटिक्स ही पुरुषसत्ताक समाजाची निर्मिती असल्याने यात पुरुषांची जबाबदारी जास्त येते.
शासनानेही स्त्रियांच्या कपड्यांबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली तर त्यांचे मनोबल कमी होईल आणि खर्या अर्थाने बेटी बचाव मोहिमेला अर्थ येईल. ज्या स्त्रियांना शक्य आहे त्यांनी केवळ इतरांना खुश करण्यासाठी कपडे वापरणे थांबवावे.
ज्या मुली आपल्या पेहरावावर आता निर्णय घेऊ शकत नसतील त्यांनी सक्षम व्हायची वाट पाहावी, सक्षम झाल्यावर मात्र धाडसाने स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत:ला हवे तसे घ्यावेत.
बंधने तोडून मुक्त जगण्यात खरी मजा असते. भारतात, जगभरात स्त्री आणि पुरुषांनीही कपड्यांच्या राजकारणाला विरोध केला आहे. इराणमध्ये बुरख्याविरोधात महसा अमिनीचा जीव गेला तर पाश्चिमात्य देशात स्त्रियांनी रस्त्यावर येऊन ब्रा जाळल्या आहेत.
ज्या स्त्रियांना वाटत असेल की, कपड्यांच्या या हिणकस पॉलिटिक्सचा विरोध करण्याची ताकद आपल्यात नाहीय, त्यांनी 11व्या शतकात भारतातील कर्नाटक राज्यात अक्का महादेवी नावाची जी संत होऊन गेली तिचं उदाहरण डोळ्यासमोर आणावं.
भारतीय संस्कृती किंवा धर्म पूर्णतः नाकारावे असं नाही, चांगल्या बाबींचा मौल्यवानच आहेत. मात्र ज्या माणसांना, स्त्रियांना कमी लेखणाऱ्या, त्रासदायक रूढी परंपरा आहेत त्यांची उपयोगिता, उपद्रव मूल्य पाहून काळाच्या ओघात त्या सोडल्या जातील, सोडाव्यात; त्यावर किमान पुनर्विचार तरी जरूर व्हावा.
ज्या काळात स्त्री घराबाहेरसुद्धा पडू शकत नव्हती, हिने शिक्षण घेतले. सामाजिक रुढी परंपरांच्या आणि स्त्री पुरुष असमानतेच्या विरोधात बंड म्हणून तिने कपड्यांचा त्याग केला. या संत कवयित्रीने त्याकाळी शिक्षण घेऊन 420 वचने लिहिली.
माणूस म्हणून मिळालेलं जगण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना घेऊ दिलं नाही तर स्त्री अक्का महादेवी बनू शकते हे पुरुषांनी देखील लक्षात ठेवावं आणि ती अक्का होण्याआधी सावध व्हावं.
मी नाही साडी घालत जा!
आजवर तू साडीच्या नावाखाली
बाईला नागवलं
घातली साडी तरी उपभोगली
झाकलेल्या शरीरालाही आरपार लुबाडली
नवरा मेल्यावर जी हिसकावून घेतली
तीही रंगीत साडीच होती रे
तुझे पॉलिटिक्स कळत नाही रे बायांना
कधी तू सौभाग्याच्या नावाखाली साडी घालायला भाग पाडतो
कधी संस्कृतीचे खुळ भरतो बायांच्या डोक्यात
तर कधी बाईपणाच्या बुजगावण्याखाली दाबतोस बायांना
अरे साडी एवढीच भारीये
तर मग गुंडाळ की शरीर स्वत:चच साडीत
इंद्रधनुष्यासारखं रंगीबेरंगी
आणि घराघरातील तुझ्या सगळ्या कपाळकरंट्या अनुयायांचंही
मग एकदमच स्पष्ट होईल जमात
साडी घाल म्हणणारांची
तुझ्या त्या दृश्य अदृश्य पिळदार मिशाही गुंडाळून ठेव अडगळीत
पुरुषत्व विरून मातीत मिसळण्यासाठी
तुझी माजलेली सत्तांध चालही बदल
पायदळी तुडवते अनेक बायांची आयुष्ये
तुझी वाणीही सुधारून घेशीलच
चिंधड्या करते हृदयाच्या आमच्या
तुझे पौरूषी डोळेही झाकूनच घे जे
आरपार लुटतात बायांना
साडीतही!
थांबव त्या भारत देशाला आणि बायांना माता बनविण्याचं षडयंत्र
अन् बाईला देवी म्हणण्याचा ढोंगीपणा
कधीतरी बाईतली माणूस दिसतेय का बघ निखळपणे
एवढं करूनही थोडंही मानव्य उतरलं नाही तुझ्यात
तर वाट बघ पुढच्या जन्मी बाई होण्याची
तशीही तुझी साडी संस्कृती दास्यत्वाचीच निशाणी
मी नाही ठेका घेतला तिला जगवण्याचा
साडी कधी माझी गरज नव्हती
नसणार आहे
मी आदिम आणि अनंत आहे
साडीच्या आधीही आणि नंतरही
माझं असणंच सुंदर आहे
आणि हो,
शेवटचं सांगते ध्यानात ठेव,
माझ्या कपड्यांवर घसरू नकोस
आणि घसरलाच
तर ऐक,
तू संस्कारी नर बन असं मी कधी बोलले नाही
मलाही संस्कारी नारी बनायचं नाही
म्हणून
मी नाही कुंकू लावत जा
मी नाही मंगळसूत्र, जोडवी घालत जा
मी नाही बुरखा घालत जा
मी नाही साडी घालत जा
माझ्या पुढच्या सगळ्या लेकींच्या पिढ्याही घालणार नाहीत जा
ती बायांची ओळख नाही
ती आमची विरासत नाही
आणि अस्तित्वही!
वाटलं तर आम्ही साडी घालून मिरवूसुद्धा मुक्तपणे
नाही तर फिरू तशाच उनाड आनंदाने
तुझ्यासारख्या नराच्या अस्तित्वाला विसरून
हे पुरुषा,
मर्द बनायचं की माणूस ठरव
जमलं तर सोबत चाल
नाही तर तुझा हात सोडून जाण्याइतपत सशक्त आहेच मी!
लक्ष्मी यादव डिजिटल क्रिएटर आणि स्त्री-पुरुष समतेवर प्रशिक्षण घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.
Published By- Priya Dixit