Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरुण जेटलींना का म्हटलं जायचं 'चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती' ?

अरुण जेटलींना का म्हटलं जायचं 'चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती' ?
, शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (13:34 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी दुपारी बारा वाजता दिल्लीत निधन झालं. ते 66 वर्षांचे होते.
 
पेशाने वकील असणाऱ्या जेटली यांनी भाजप सत्तेत असताना केंद्रीय मंत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा घेतलेला सविस्तर आढावा.
 
25 जून 1975. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अरूण जेटली नारायणामधल्या त्यांच्या घराच्या अंगणात झोपले होते.
 
बाहेरच्या आवाजानं त्यांना जाग आली. पाहिलं तर त्यांचे वडील काही पोलिसांसोबत वाद घालत होते. हे पोलीस त्यांना अटक करायला आले होते.
 
हे पाहून अरूण त्यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याने बाहेर पडले. त्याच गल्लीतल्या मित्राच्या घरी त्यांनी ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठाच्या व्हाईस चॅन्सलरच्या ऑफिसबाहेर गोळा केलं.
 
तिथे अरूण जेटलींनी एक भाषण दिलं आणि त्या सगळ्यांनी मिळून इंदिरा गांधींच्या पुतळ्याचं दहन केलं. थोड्याच वेळात डीआयजी पी. एस. भिंडर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अरूण जेटलींना अटक केली.
 
तिहार जेलमध्ये ज्या सेलमध्ये अरूण जेटलींना ठेवण्यात आलं होतं त्याच सेलमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि के. आर. मलकानी यांच्यासह 11 राजकीय कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. जेटलींना याचा खूप फायदा झाला.
 
जेटलींचे जवळचे मित्र अनिप सचदे सांगतात, "अरूण जेटलींचा राजकीय 'बाप्तिस्मा' युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये न होता तिहार जेलच्या कोठडीत झाला. आपलं करिअर आता राजकारणातच होणार याची जाणीव त्यांना सुटका होतानाच झाली होती.
webdunia
मोठे केस आणि जॉन लेननसारखा चष्मा
दिल्लीमधील सेंट झेव्हियर्स स्कूल आणि प्रसिद्ध श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अरूण जेटलींनी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी जेटलींचे केस लांब असायचे आणि ते बीटल्सच्या जॉन लेनन यांच्यासारखा चष्मा लावायचे.
 
त्यांच्या चष्माचा आकार गोल असल्यानं अनेकजण त्याला 'गांधी गॉगल्स'ही म्हणायचे.
 
'द मेरीगोल्ड स्टोरी' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या कुमकुम चढ्ढांनी जेटलींची आठवण सांगितली आहे. जेटलींची कॉलेजमधली एक मैत्रिण बीना यांनी सांगितलं होतं, की अरूण दिसायला ठीकठाक होते. मुली त्यांच्याकडे पाहायच्या पण अरुण त्यांना प्रतिसाद देत नसत. कारण ते खूपच लाजाळू होते. स्टेजवरून ते तासन् तास बोलू शकत पण खाली उतरल्याबरोबर ते कोषात जात. त्या दिवसांमध्ये ते कधी कोणत्या मुलीला 'डेट'वर घेऊन गेले असतील असं मला वाटत नाही.
 
अरूण जेटलींचे अतिशय जवळचे मित्र असणारे प्रसिद्ध वकील रेयान करंजावाला सांगतात, "अरूण जेटलींना फिल्म्स पाहायला अतिशय आवडायचं. 'पडोसन' त्यांचा आवडता सिनेमा होता. त्यांनी तो अनेकदा पाहिला होता. अरूणना मी अनेकदा फिल्मचे डायलॉग बोलताना पाहिलेलं आहे. 'जॉनी मेरा नाम'मध्ये देवानंदनी कोणत्या रंगाचा शर्ट घातला होता इथपर्यंत सगळं अरूण जेटलींच्या लक्षात असायचं."
 
काय होती वाजपेयींची इच्छा?
लेखिका कुमकुम चढ्ढा सांगतात, की जेव्हा 1977मध्ये जनता पक्ष तयार झाला तेव्हा जेटलींना त्याच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत घेण्यात आलं. वाजपेयींना त्यांना 1977च्या लोकसभा निवडणुकीत उतरवायचं होतं, पण निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक वयोमर्यादेपेक्षा ते एक वर्षाने लहान होते.
 
तुरुंगात असल्यानं त्यांचं अभ्यासाचं एक वर्षंही वाया गेलं होतं. म्हणून मग त्यांनी आपली कायद्याची पदवी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
 
नाचता यायचं नाही, पण डिस्कोमध्ये जायचे
 
विद्यार्थीदशेतल्या राजकारणात येण्याआधी अरूण आणि त्यांचे मित्र 'सेलर' या दिल्लीतल्या एकमेव डिस्कोथेकमध्ये जायचे.
webdunia
कुमकुम चढ्ढा सांगतात, "त्यांची मैत्रिण बीनाने मला सांगितलं, की त्यांचं डिस्कोथेकमध्ये जाणं नावापुरतं असायचं. कारण त्यांना अजिबात नाचता यायचं नाही. त्यांना कधी ड्रायव्हिंगही आलं नाही. ड्रायव्हर ठेवण्याची ऐपत येईपर्यंत त्यांची पत्नी संगीता कार चालवायची."
 
महागड्या गोष्टींची आवड
विशेष बाब म्हणजे अरूण जेटलींच्या पत्नी संगीता या काँग्रेसचे दिग्गज नेते गिरधारी लाल डोगरांची मुलगी. गिरधारी लाल डोगरा जम्मूमधून दोनदा खासदार झाले आणि जम्मू-काश्मीर सरकारमध्येही ते मंत्री होते.
 
त्यांच्या लग्नाला अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी या दोघांनीही हजेरी लावली होती.
 
अरूण जेटली भारतातल्या आघाडीच्या वकीलांपैकी एक होते आणि त्यांची फीसुद्धा प्रचंड होती.
 
महागडी घड्याळं विकत घ्यायला त्यांना आवडायचं. ज्याकाळात भारतीय 'ओमेगा'च्या पुढचा विचारही करू शकत नव्हते, त्याकाळात त्यांनी 'पॅटेक फिलिप' घड्याळ घेतलं होतं.
 
अरूण जेटलींकडे 'माँ ब्लाँ' पेनांचा आणि जामवार शालींचा संग्रहदेखील खास आहे. नवीन एडिशनचं 'माँ ब्लाँ' पेन सगळ्यात आधी घेणाऱ्यांमध्ये अरूण जेटली असायचे.
 
अनेकदा जर हे पेन भारतात मिळालं नाही तर प्रसिद्ध प्रत्रकार कुलदीप नय्यर यांचा मुलगा आणि जेटलींचा मित्र राजीव नैय्यर यांच्याकडून ते परदेशातून पेन मागवून घेत.
 
त्या काळात अरूण जेटली लंडनमध्ये तयार करण्यात आलेले 'बिस्पोक' शर्ट्स आणि हाताने तयार करण्यात आलेले 'जॉन लॉब'चेच बूट घालायचे. ते नेहमी 'जियाफ ट्रम्पर्स'चं शेव्हिंग क्रीम आणि ब्रशचा वापर करायचे.
 
चांगलं खाण्याची आवड
अरूण जेटलींना चांगलं खायची हौस होती. दिल्लीतल्या सर्वात जुन्या क्लब्सपैकी एक असणाऱ्या रोशनारा क्लबचं जेवण त्यांना अतिशय आवडायचं. कॅनॉट प्लेसच्या प्रसिद्ध 'क्वालिटी' रेस्टॉरंटचे चने-भटूरे तर त्यांना नेहमीच आवडायचे.
 
जुन्या दिल्लीमधल्या स्वादिष्ट जिलेब्या, कचोऱ्या आणि रबडी-फालुदा खात जेटली लहानाचे मोठे झाले. पण मधुमेहाचं निदान झाल्यानंतर ही सगळी आवड मागे पडली आणि जेवण फक्त एक चपाती आणि भाजीपुरतंच राहिलं.
 
2014मध्ये बजेटचं भाषण देताना त्यांनी मध्येच बसून भाषण करण्याची परवानगी लोकसभा अध्यक्षांकडे मागितली. नियमांनुसार अर्थमंत्र्यांना नेहमी उभं राहून अर्थसंकल्पीय भाषण वाचावं लागतं. पण सुमित्रा महाजनांनी त्यांना बसून भाषण देण्याची विशेष परवानगी दिली.
 
काहीतरी गडबड असल्याची शंका प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीला आली कारण ते पुन्हा पुन्हा त्यांच्या पाठीला हात लावत होते. कारण त्यांना तिथून वेदनेच्या कळा येत होत्या.
 
बोफोर्स तपासात महत्त्वाची भूमिका
1989 मध्ये व्ही. पी. सिंह सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर फक्त 37 वर्षांच्या जेटलींना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनवण्यात आलं.
 
एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे अधिकारी भुरेलाल आणि सीबीआयचे डीआयजी एम. के. माधवन यांच्यासोबत जानेवारी 1990 पासून जेटली बोफोर्स प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंड आणि स्वीडनला गेले. पण आठ महिन्यांनंतरही त्यांना कोणताही ठोस पुरावा सापडला नाही.
 
जेटली आणि टीम बोफोर्सच्या तपासासाठी अशाच प्रकारे परदेश दौरे करत राहिली तर लवकरच त्यांना 'एनआरआय' दर्जा मिळेल अशी टिप्पणीही एका खासदारानं केली होती.
webdunia
जैन हवाला केसमध्ये अडवाणींचा बचाव
जेटलींनी 1991च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी दिल्ली मतदारसंघातून लढणाऱ्या लालकृष्ण अडवाणींचे निवडणूक एजंट म्हणून काम पाहिलं.
 
त्यांनी भरपूर मेहनत घेतल्यानंतर अडवाणींना फिल्मस्टार राजेश खन्नांवर थोडक्या मताधिक्यानं विजय मिळवता आला.
 
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी त्यांनी आडवाणींच्या बाजूने केस लढवली आणि नंतर प्रसिद्ध जैन हवाला केसमधूनही त्यांना यशस्वीरित्या सोडवलं.
 
90च्या दशकामध्ये टीव्हीवरच्या बातम्यांमुळे भारतीय राजकारणाचं स्वरूपच बदललं. जसजसं टेलिव्हिजनचं महत्त्व वाढलं, तशी भारतीय राजकारणात अरूण जेटलींची पतही वाढली.
 
2000 साली 'एशिया वीक' मासिकाने जेटलींचा समावेश भारतातल्या झपाट्याने पुढे येणाऱ्या तरूण नेत्यांच्या यादीत केला. स्वच्छ प्रतिमेचा, आधुनिक भारताचा नवा चेहरा असं त्यांचं वर्णन करण्यात आलं होतं.
 
नरेंद्र मोदींशी मैत्री
1999मध्ये जेटलींना अशोक रोडच्या पक्ष मुख्यालयाच्या बाजूचा सरकारी बंगला देण्यात आला. त्यांनी त्यांचं घर भाजपच्या नेत्यांना दिलं. म्हणजे पक्षाच्या ज्या नेत्यांना राजधानीत घर मिळू शकणार नव्हतं, त्यांना आसरा मिळाला असता.
 
याच घरामध्ये क्रिकेटर वीरेंद्र सहवागचं लग्न झालं. शिवाय वीरेंद्र कपूर, शेखर गुप्ता आणि चंदन मित्रांच्या मुलांची लग्नंही इथेच झाली.
 
पण या काळात जेटलींनी गुजरातचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या मैत्रीला सर्वाधिक प्राधान्य दिलं. त्याचा त्यांना नंतर खूप फायदा झाला.
 
1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदींना दिल्लीला पाठवण्यात आलं तेव्हाही जेटलींनी त्यांना साथ दिली. मोदी तेव्हापासूनच अनेकदा जेटलींच्या कैलास कॉलनीतल्या घरी दिसायचे असं अनेक पत्रकार सांगतात.
 
भाजपमध्ये मिसफिट
'चंगा खाना ते चंगा पाना' म्हणजे चांगलं खायचं आणि चांगले कपडे परिधान करायचे हा जेटलींच्या आयुष्याचा मंत्र होता. एखादी व्यक्ती कशी बोलते, कोणत्या प्रकारचे कपडे घालते, कुठे राहते आणि कोणती गाडी चालवते याकडे त्यांचं लक्ष असायचं.
 
भारतीय जनता पक्षाच्या एका माजी महासचिवांसह अनेकांचं असं म्हणणं आहे, की जेटलींना 'एलिट' मानलं जात असल्यामुळेच ते कधी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत.
 
यामुळे त्यांचं एकप्रकारे राजकीय नुकसानही झालं. त्यांची आधुनिक आणि संयत प्रतिमा पक्षाच्या पारंपरिक आणि 'हार्डलाईन' प्रतिमेशी कधीच जुळली नाही. पक्षामध्ये नेहमीच त्यांच्याकडे संशयाने पाहण्यात आलं.
 
ते कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'इनसायडर' झाले नाहीत. 2011 साली 'द हिंदू' वर्तमानपत्राने विकिलीक्सची एक केबल छापली होती. यामध्ये हिंदुत्त्वाचा मुद्दा संधीसाधूपणा आहे, असं जेटली म्हणत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
 
पण यानंतर त्यांनी या गोष्टीचं खंडन केलं.
 
पण याची दुसरीही बाजू आहे. जेटलींचे जुने मित्र स्वपन दासगुप्ता सांगतात, की जेटलींनी 'इमेज'च्या अडचणीचा सामना करणाऱ्या भाजपला नव्याने वर येणाऱ्या मध्यमवर्गाची मान्यता मिळवून दिली.
 
'एका चुकीच्या पक्षातली योग्य व्यक्ती' असं जेटलींबद्दल नेहमी म्हटलं जातं. पण जेटलींना ही व्याख्या कधी आवडली नाही.
 
जनाधार नसल्याने नुकसान
अरूण जेटली नेहमीच राज्यसभेमधूनच संसदेत पोहोचले. अतिशय चांगले वक्ते असूनही मोठा जनाधार नसल्याने जेटली अपेक्षित राजकीय उंची गाठू शकले नाहीत.
 
संसदेतली त्यांची कामगिरी इतकी चांगली होती, की भाजपच्या आतल्या गोटामध्ये त्यांना 'भावी पंतप्रधान' म्हटलं जायचं. जुलै 2005 मध्ये अरूण जेटली पहिल्यांदा गंभीर आजारी पडले आणि त्यांच्यावर तिहेरी बायपास शस्त्रक्रिया करावी लागली.
webdunia
लालकृष्ण अडवाणींनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्याला संधी मिळेल, असं जेटलींना वाटलं होतं. त्यांचे समकालीन असणाऱ्या व्यंकैय्या नायडूंनी काही वर्षांपूर्वी हे पद भूषवलं होतं. पण जेटलींना निराश व्हावं लागलं. त्यांच्या ऐवजी भाजपने उत्तर प्रदेशचे ठाकूर नेते राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाचं नेतृत्त्वं सोपवलं.
 
सरकारी गेस्ट हाऊसचं भाडं स्वतःच्या खिशातून
वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाल्यानंतर अरूण जेटली आपल्या काही मित्रांसह नैनीतालला गेले होते. तिथल्या राजभवनाच्या गेस्ट हाऊसमध्ये ते राहिले होते.
 
त्यांचे मित्र सुहेल सेठ यांनी 'ओपन' मासिकामध्ये एक लेख लिहिला होता - 'माय फ्रेंड अरूण जेटली.' यामध्ये ते लिहितात, "चेक आऊट करताना त्यांनी सगळ्या खोल्यांच्या भाड्याचे पैसे स्वतःच्या खिशातून भरले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं, की त्यांच्याआधी कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला अशाप्रकारे स्वतःचं बिल भरताना त्यांनी पाहिलं नव्हतं."
 
त्यांनी असंही सांगितलं, की अनेकदा लंडनला गेल्यानंतर तिथले आघाडीचे उद्योगपती त्यांच्यासाठी विमानतळावर मोठ मोठ्या गाड्या पाठवायचे. पण अरूण जेटली नेहमी हिथ्रो विमानतळाकडून लंडनला येणाऱ्या 'ट्यूब'चा (भूमिगत रेल्वे) वापर करत.
 
बहुतांश लोक असं तेव्हा करतात जेव्हा लोक त्यांच्याकडे पाहत असतात. पण कोणीही पाहत नसतानाही अरूण असं करायचे.
 
सच्चा मित्र
अरूण जेटलींच्या घरी एक खोली असायची जिला 'जेटली डेन' म्हटलं जाई. ते तिथे त्यांच्या खास दोस्तांना भेटायचे. हे मित्र विविध व्यवसाय करणारे आणि विविध पक्षांतले असायचे.
 
सुहेल सेठ, वकील रेयान करंजावाला आणि राजीव नय्यर, हिंदुस्तान टाईम्सच्या मालक शोभना भारतीय आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा या मित्रांमध्ये समावेश होता.
 
2014मध्ये मोदींना साथ
वाजपेयींच्या काळात जेटलींना नेहमी 'अडवाणींचा माणूस' मानलं जाई. पण 2013 पर्यंत ते अडवाणी कॅम्प सोडून पूर्णपणे नरेंद्र मोदींना सामील झाले.
webdunia
2002 मध्ये गुजरात दंगलींनंतर वाजपेयींनी जेव्हा मोदींना 'राज धर्माचा' सल्ला दिला होता तेव्हा जेटलींनी मोदींचं फक्त नैतिक समर्थनच केलं नाही तर ते पदावर टिकून रहावेत म्हणून महत्त्वाची भूमिकाही बजावली. गुजरात दंगल प्रकरणीही ते कोर्टामध्ये मोदींच्या बाजूने लढले होते.
 
2014मध्ये अमृतसरमधून निवडणूक हरल्यानंतरही नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात जागा तर दिलीच पण त्यांच्याकडे अर्थ आणि संरक्षण यासारख्या दोन मह्त्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही दिली. ते मंत्री असतानाच नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले. गेल्या वर्षी जेटलींवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2019 ची निवडणूक ते लढले नाहीत. नरेंद्र मोदींच्या टीममध्ये आपण सामील होणार नसल्याची घोषणा त्यांनी स्वतःच केली होती.
 
अमित शहा सध्या नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळ असल्याचं मानलं जातं पण एक काळ असा होता जेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये मोदींच्या सर्वात जवळ अरूण जेटली होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन