शादाब नाझमी
भारतातील अधिकाअधिक जणांना कोरोनाची लस दिली जात असतानाही रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला धीम्या गतीनं झालेल्या लसीकरण मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. जसजसं लसीकरण वाढत जाईल तसतशी रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. पण, सध्या याउलट स्थिती पाहायला मिळत आहे. यामागचं कारण काय आहे ते डेटाच्या साहाय्यानं शोधण्याचा प्रयत्न करुया.
14 मार्चपर्यंत भारतात कोरोना लसीचे 2.9 कोटी डोस देण्यात आले. यापैकी 18 टक्के जणांना कोरोना लसीचा दुसरा डोसही मिळाला. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीसारख्या लहान राज्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक व्यक्तींना लस देण्यात आली. इतर राज्यांमध्ये लसीकरणानं वेग पकडला आहे. केरळ, गोवा आणि राजस्थान सरकारनं दर 10 लाख लोकांमागे 35,000 डोस दिले आहेत.
लस घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत असली तरी दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं चिंतेचं वातावरण तयार केलं आहे. बहुतेक राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात दररोज 13,000 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, जानेवारी महिन्यात दरदिवशी हा आकडा 3,000 इतका होता. पंजाबसारख्या लहान राज्यात जानेवारी महिन्यात दररोज 300 रुग्ण आढळत असत, आता मात्र दररोज 1200 रुग्ण आढळत आहेत. हा आकडा जानेवारीतील रुग्णसंख्येच्या पाचपट आहे.
लसीकरणाचा परिणाम
लसीकरणामुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालीय का, हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, देशातील किती जणांना कोरोनाची लस मिळाली आहे.
जर आपण असं गृहित धरलं की, भारतात 100 लोक राहतात, तर सद्यस्थितीत या 100 पैकी फक्त 2.04 जणांना कोरोनाची लस मिळाली आहे. या 2.04 जणांमध्ये आरोग्य किंवा फ्रंटलाईन वर्कर्स, वयाची पंचेचाळिशी पार केलेले आणि इतर आजार असलेले तसंच 60हून अधिक वयाच्या लोकांचा समावेश आहे.
आता तामिळनाडूचं उदाहरण पाहूया. तामिळनाडू सरकार लिंग आणि वयाच्या आधारे दररोजच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करत आहे.
एक मार्च रोजी सामान्य माणसांसाठी लसीकरण सुरू केल्यानंतर दररोजच्या कोरोना रुग्णसंख्येत 60 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची टक्केवारी कमी झाली आहे. जानेवारीत दररोजच्या एकूण रुग्णसंख्येत ज्येष्ठांची संख्या 24 टक्के इतकी होती, आता 1 मार्चपासून ती 22 ते 23 टक्क्यांवर आली आहे.
असं असलं तरी तामिळनाडूतील ज्येष्ठांची रुग्णसंख्या कमी होण्याचा आकडा त्यामानाने कमीच आहे. त्यामुळे लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे, असं आपण म्हणू शकतो का? तर आताचं होय असं म्हणणं घाईचं ठरेल, कारण सगळ्याच वयोगटांमध्ये कोरोनाचा विषाणू सारख्या पद्धतीनं पसरत आहे.
मग वाढत्या रुग्णसंख्येविरोधात लस परिणामकारक ठरेल असं आपण कधी म्हणू शकतो?
दररोजच्या रुग्णसंख्येतील ज्येष्ठांची टक्केवारी येत्या काही महिन्यांमध्ये सतत कमी झाल्यास आणि रुग्णालयात दैनंदिन दाखल होणाऱ्यांची संख्या तरुणांकडे झुकल्यास नवीन रुग्णांची संख्या कमी करण्यात लस परिणामकारक ठरत आहे, असं आपण म्हणू शकतो.
केरळमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतील आरोग्य कर्मचाऱ्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा पॅटर्न बघितल्यास लसीकरणामुळे नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे
ग्रामीण आणि शहरी दरी
मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत असलं तरी महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी अशी दरी स्पष्टपणे दिसून येते. याचं एक कारण म्हणजे शहरी भागातील लोक लसीकरणाबाबत जागरुक आहेत आणि लस घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये नोंदणी करत आहेत.
12 मार्चला मुंबईत 60पेक्षा अधिक वय असलेल्या 1 लाख 90 हजार जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला. तर पुणे आणि नागपूर जिल्ह्यात अनुक्रमे 90 हजार आणि 49 हजार जणांना पहिला डोस मिळाला. याची बीड आणि धुळे यांसारख्या ग्रामीण जिल्ह्यांशी तुलना केल्यास 9 हजारांहून कमी जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळालाय.
विशेष म्हणजे कोरोनाचा प्रसार आता शहरांपुरता मर्यादित राहिला नसून ग्रामीण जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरला होता. अमरावतीमध्ये लसीकरण कसं सुरू आहे हे तपासलं तेव्हा तिथं स्पष्टपणे गॅप दिसून आला. 12 मार्चपर्यंत अमरावतीतल्या 16 हजार ज्येष्ठ नागरिकांना कोरोना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला होता. अमहदनगर आणि कोल्हापूरपेक्षा ही संख्या खूप कमी आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील लसीकरणामध्ये गॅप जितका कमी राहिल, तितकी ही राज्ये कोरोनाशी अधिक सक्षमपणे लढू शकतील.