Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hiroshima Nagasaki: अणुबाँबचातडाखा झेलणाऱ्या इमारती जपानला का पाडायच्या आहेत?

Hiroshima Nagasaki: अणुबाँबचातडाखा झेलणाऱ्या इमारती जपानला का पाडायच्या आहेत?
, बुधवार, 18 डिसेंबर 2019 (16:47 IST)
हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांनी अणुहल्ल्याचा संहार झेलला. हिरोशिमा शहरातल्या इमारती दोन इमारती अणुबाँब हल्ल्यातून शाबूत राहिल्या. इतक्या वर्षांनंतर जपानला आता या दोन इमारती पाडायच्या आहेत. मात्र स्थानिक लोकांना ऐतिहासिक ठेवा म्हणून या इमारतीचं जतन करायचं आहे.
 
1913मध्ये या इमारती उभ्या राहिल्या. सैन्याचे कपडे बनवणाऱ्या विभागाचं कामकाज या इमारतींमधून चालत असे. यानंतर त्याचं वसतिगृहात रुपांतर करण्यात आलं. साहजिकच तिथे विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी राहू लागले.
 
अणुबाँब हल्ल्यानंतर या इमारतींचा वापर तात्पुरतं रुग्णालय म्हणूनही केला गेला.
 
अणुबाँबचा हल्ला अनुभवलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, अणुहल्ल्यात वापरण्यात आलेल्या विस्फोटकांचा नायनाट आणि याच्या प्रसारासाठी या इमारतींचा वापर केला जाऊ शकतो.
 
अणुबाँब हल्ल्यात 80 हजार लोकांचा मृत्यू झाला तर 35 हजार नागरिक जखमी झाले. या हल्ल्यांनी ही दोन्ही शहरं बेचिराख झाली.
 
या दोन इमारती अणुहल्ल्याच्या तडाख्यातही टिकून राहिल्या कारण त्यांच्या बांधकामात स्टीलचा वापर करण्यात आला होता. हल्ल्यात या इमारतीची दारं-खिडक्या उद्धवस्त झालं, हे आजही दिसतं. आता या दोन्ही इमारतींची मालकी जपान सरकारकडे आहे. शक्तिशाली भूकंप घडवून आणत या इमारती जमीनदोस्त करता येऊ शकतात असं दोन वर्षांपूर्वी जपानच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
 
सध्या या इमारतींमध्ये कोणीच राहत नाही किंवा कोणतंही कार्यालयही नाही. 2022 पर्यंत या इमारती भुईसपाट करण्याचा जपान सरकारचा इरादा आहे. या इमारतींच्या नजीकच आणखी एक वास्तू आहे. ही वास्तू जतन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या इमारतीच्या भिंती आणि छताचं जतन केलं जाईल. भूकंपापासून बचाव व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या जातील.
 
ऐतिहासिक महत्त्व
1945मध्ये अमेरिकेने जपानवर अणूहल्ला केला तेव्हा इवाओ नाकानिशी यापैकी एका इमारतीत राहत होते. या इमारतीचं जतन व्हावं ही मागणी करणाऱ्या समूहाचं 89 वर्षीय इवाओ नेतृत्व करत आहेत. या इमारतींचं ऐतिहासिक महत्त्व आहे. आधीच्या पिढ्यांनी काय संहार भोगला हे नव्या पिढीला समजावं यासाठी या इमारतींचं जतन व्हायला हवं. या इमारती पाडून टाकणं आम्ही सहन करू शकत नाही. आम्ही या पाडकामाच्या निर्णयाचा विरोध करतो असं इवाओ यांनी स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं.
 
आण्विक निशस्त्रीकरण उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरता या इमारतींचा उपयोग केला जाऊ शकतो असं इवाओ यांना वाटतं.
 
गेल्या काही वर्षांपासून या इमारतींमध्ये काहीच नाही मात्र स्थानिक नागरिक तिथे जाऊ शकतात.
 
या इमारतींना भेट दिलेल्या 69वर्षीय व्यक्तीने स्थानिक वर्तमानपत्रांना माहिती दिली. अणुहल्ल्याची संहारता या इमारती दर्शवतात. या इमारतींना पाहून मला हाच विचार मनात आला. म्हणून त्यांचं जतन होणं आवश्यक आहे.
 
शहरात उभारण्यात आलेलं शांतता स्मारक अणुहल्ल्याची भयानकता मांडतं. या स्मारकाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघटनेने हेरिटज वास्तूंमध्ये केला आहे. भूकंपरोधक होण्याकरता या इमारतींची डागडुजी करण्यात आली होती.
 
हिरोशिमात काय झालं होतं?
1945मध्ये जर्मनीच्या आत्मसमर्पणानंतर जपानने आशिया खंडात युद्ध सुरूच ठेवलं. शांतता प्रस्थापित करण्यादृष्टीने अमेरिकेने जपानला इशारा दिला होता. जपानने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. अणुहल्ल्यानंतर जपान आत्मसमर्पण करेल याची अमेरिकेला खात्री होती.
 
यासाठी अमेरिकेने पहिला हल्ला हिरोशिमावर केला. या हल्ल्यात 80 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने लोक अक्षरश: जळून गेले. अणुहल्ल्यातील अणूविसर्गामुळे लोकांना विविध गंभीर आजारांनी ग्रासलं. या हल्ल्यांमध्ये एकूण 1.40 लाख नागरिकांचा मृत्यू झाला.
 
कोणत्याही युद्धात अणुबाँबचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
हिरोशमावर झालेल्या हल्ल्यानंतरही जपानने आत्मसमर्पण केलं नाही. त्यामुळे अमेरिकेने नागासाकी शहरावर हल्ला केला. नागासाकीवर हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध औपचारिकरीत्या संपलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निर्भया प्रकरणः दोषी ठरलेल्या अक्षयची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली