कृती : सर्वप्रथम दोन वाट्या बासमती तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. नंतर चार वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. भात तयार झाला की तो परातीत मोकळा करुन ठेवावा. दोन, तीन गाजर व थोडे बीन्स आवडीप्रमाणे बारीक अथवा जरा लांबट चिरुन शिजवून ठेवावे. नंतर एका कढईत दोन मोठे चमचे रिफाईंड तेल घालून त्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, दहा बारा मिरे घालावेत. नंतर एक बारीक चिरलेला कांदा तांबूस परतून घ्यावा. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालावी. त्यात उकडलेल्या भाज्या घालून परताव्या त्यानंतर मोकळा करुन ठेवलेला भात घालून परतावा. अंदाजे मीठ व थोडी मीरपूड घालावी. चार अंड्याचे साधे व मसाला ऑम्लेट बनवून त्याचे तुकडे करुन भातात मिसळावे किंवा उकडलेल्या अंड्याचे तुकडे मिसळावे. काही जण तेलात कांदा, आले, लसूण परतल्यानंतर चार अंडी फोडून घालतात. अंडी तेलात शिजतात. मग भाज्या व भात घालून परतून घ्यावे.