Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजि आम्ही वाघ पाहिला

- ऋचा देशपांडे

अजि आम्ही वाघ पाहिला
WD
बोलण्याची आवड आणि मनसोक्त भटकंतीचा छंद यामुळे 'रॉकींग ऋचा' नंतर मी वळाले 'ऋचा हॉलीडेज' कडे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स - एक नविन क्षेत्र मी निवडलं. स्वप्नातली ठिकाणे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आणि दाखवण्यासाठी त्यामुळे 'ऋचा हॉलीडेज' ची पहिलीच ट्रीप ठरवली मध्यप्रदेश येथिल 'कान्हा नॅशनल पार्क' येथे.

'कान्हा' म्हणजे जंगलबुक मधल्या मोगलीच ठिकाण. म्हणजेच भरपूर प्राण्यांनी नटलेल असं जंगल. हे जंगल मुख्यत्वे करून वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि बारशिंग्यांसाठी पण. सांबर, हरीण, अस्वल, हत्ती, कोल्हे, चिते, लंगूरही इकडे आहेत. म्हणून जंगल-सफारीचा चित्तथरारक आणि भन्नाट अनुभव देण्यासाठी 15 मुलामुलींचा ग्रुप घेऊन मी निघाले 'कान्हा जंगल सफारी' करायला....

ह्या ट्रीपचं मुख्य आकर्षण होतं ते वाघाचं दर्शन तेही पिंजर्‍यातल्या नव्हे तर जंगलात, स्वत:च्या राज्यात, मनमौजी फिरणारा वाघाचं. त्यामुळे ग्रुपमधला प्रत्येकजण आपापल्यापरीने वाघ कसा असेल? तो दिसला तर कसे फोटो काढायचे? असे स्वप्न रंगवत होते.

नासिक ते जबलपूर 12 तासाचा आणि जबलपूर ते खटीया (कान्हा) 3 तासांचा मोठ्ठा प्रवास केल्यामुळे पहिल्या दिवशी सगळे थकले होते अर्थात वाघ पाहण्यासाठी त्याही दिवशी सगळे रेडी होते पण आम्ही आरामच केला. दुसर्‍या दिवशी मात्र पहाटे 5 ला उठून चहा घेऊन खर्‍याखुर्‍या वाघाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी जिप्सीत उडी मारली. उघड्या जिपमधून जंगलसफारी करणे म्हणजे आहाहा! एकदम झकास...

खटीया या गावात आपण असतो आणि तिकडनं रितसर परवानगी, गाईड सोबत घेऊन आपण सुरू करतो कान्हाच्या दिशेने प्रवास. सुरूवातीलाच एका मोठ्या प्रवेशद्वारावर लिहले होते - 'बाघो की धरती पर आपका स्वागत'. हे वाक्य नुसतं वाचूनच हृदयाचे ठोके वाढले. जणू ते सांगत होते की आता 'सावधान ! एक अभूतपूर्व अनुभवासाठी तयार व्हा!!'

आमच्या 2 जिप्सी धूळ उडवत पुढे निघाल्या. आम्हाला सगळ्यांना स्ट्रीक्टली दोन गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. 1. गाडीतून पाय खाली ठेवायचा नाही आणि 2. शांत बसायचे. कारण प्राण्यांना आपला आवाज गेला ती ते लपून बसतात. त्यामुळे न बोलण्यासारखी अशक्य वाटणारी गोष्ट पाळण्यासाठी सगळेजण एकमेकांना बोलू नका यासाठी शू..शू करत होते.

webdunia
WD
सर्वांत प्रथम दर्शन झाले ते रांगड्या गव्याचे (बायसन) बापरे ! काळाशार आणि प्रचंड मोठ्या म्हशीसारखा दिसणारा हा प्राणी. आधी एकटाच दिसला पण नंतर कडपच्या कडप दिसला. लगेचच सगळ्यांचे कॅमेरे त्यांचे फोटे घेण्यासाठी सरसावले. त्यानंतर सुरू झालेला 'क्लिक्लिकाट' बर्‍याच वेळाने संपला आणि गाडी पुढे निघाली. वाटेत आपल्या 'पूर्वजां'चे दर्शनही झाले आणि नंतर दिसले ते हरीण आणि सांबर यांचे घोळके. तिथेही प्रचंड फोटोसेशन केले. गाईड बरोबर असल्याने प्राण्यांमधले फरक, त्यांची माहिती कळत होती. पुढे गेल्यावर आमच्या विरूद्ध दिशेने येणार्‍या जिप्सीच्या ड्रायव्हरने सॉसरपाशी वाघ पाणी पित आहे त्यामुळे लवकर तिकडे जा असा संदेश दिला. आम्ही वेगाच्या गतीने त्या दिशेकडे निघालो. 25-30 जिप्सी आधीपासूनच तिथे थांबलेल्या होत्या. पण आमचं 'बॅड लक'च खराब. आम्ही तिकडे पोचेस्तोवर वाघ पळालेला होता. आमच्या ग्रुपच्या ‍पहिल्या जिप्सीने वाघाची शेपूट पाहिली जाता जाता. पण चेहर्‍यावर आनंद मात्र होता दोन वाघ एकदम पाहिल्या सारखाचा. 15 मिनिटे आम्ही तिथेच तळ ठोकून होतो जणू तो वाघ परत पाणी प्यायला येईल आणि आम्हाला दिसेल म्हणून. परंतु निरर्थकच ठरले ते. शेवटी जिप्सी पुढे निघाली दोन्ही बाजूंनी उंचच्या उंच झाडे, मधून निमुळता रस्ता, पूर्ण शांतता फक्त प्राणीपक्ष्यांचे आणि जिप्सीचे आवाज, फूल टू भन्नाट वातावरण होतं. नजर जाते तिथपर्यंत संपूर्ण जंगलच जंगल त्यामुळे कुठून कुठला प्राणी पक्षी येईल न सांगण्यासारखे त्यामुळे प्रत्येकजण डोके आणि कान उघडे ठेवून जंगल न्याहळत होते.

webdunia
WD
गाडी पुढे जात असताना अचानकच थांबली. पाहतो तर गाडीसमोरून एक सुंदरसा मोर रस्ता ओलांडत होता. शांतपणे रस्ता ओलांडून तो जंगलात नाहीसा सुद्धा झाला. पण पुढे मात्र पिसारा फुलवून सुंदर नाचणारे अनेक मोर दिसले आणि मन हरखून गेलं. पुढे मग आमच्या गाड्या 'कॅन्टीनकडे वळाल्या. तिकडे पदार्थ समोर पाहून मग मात्र भुकेची जाणीव झाली. नाश्ता करताना प्रत्येकजणं आपण पाहीलेल्या प्राण्यापक्ष्यांचे अनुभव सांगत फोटो शेअर करत होते. नाश्ता करून म्युझियम पाहून पुन्हा ताजेतवाने झालो आणि पुन्हा एकदा मिशन वाघ पाहण्यासाठी जिप्सीत स्थिरावलो. जंगलाच्या वाटा कापत बारशिंगे, हत्ती, कोल्हे, हरीण, मोर असे भरपूर प्राणीपक्षी पाहिले. श्रावण बाळाचा जिथे वध झाला ते श्रवण ताल ठिकाण पाहिले पण वाघ मात्र दिसलाच नाही. रिसॉर्टकडे येईस्तोवर मनात आशा होती वाघ दिसायची परंतु, रिसॉर्ट आल्यावर मात्र जाणीव झाली की सहा तास दणकून फिरूनही वाघाने मात्र दर्शन‍ दिलेले नाही. बाकी प्राणी पक्षी दिसल्याने आनंद तर झाला होता. सगळे एकत्र भेटल्यावर वाघ दिसला का नसावा यावर चर्चा झाली. आणि ज्यांनी वाघाचे शेपूट पाहिले त्यांनी तो क्षण किती थ्रीलिंग होता आणि ते कसे लकी ठरले हे पटवून दिले. दुसर्‍या दिवशी जरा लवकरच उठून मिशन वाघ पाहण्याचे ठरले आणि सगळे झोपी गेले.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.......


webdunia
WD
आज पहाटे सगळेजण लवकर तयार होऊन बसले. कालपेक्षाही लवकर आम्ही कान्हाकडे निघालो. आजपण 'बाघो की धरती पर स्वागत' हे वाक्य प‍ाहिले पण मनात शंका आली की कालतर अख्य जंगल पालथं घातलं पण एकही वाघ दिसला नाही आणि म्हणे वाघो की धरती.!!!

आजसुद्धा भरपूर प्राणी दिसले पण मनात फक्त वाघाचे दर्शन एवढाच विचार. नंतर नंतर तर मोर, हरणे पाहूनही आनंद होत नव्हता. रोज गप्पा मारून निसर्गाचा आनंद लूटणारे आम्ही गाडीत शांत बसून होतो. वाघाला पाहण्याच्या उत्सुकतेची जागा आता संतापाने घेतली. कारण एवढं मोठ्ठ जंगल, त्यात एवढे वाघ आणि आपल्याला एकही दिसू नये म्हणजे कमालच झाली. तरं वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज येत होता पण तो दिसत नव्हता त्यामुळे अजूनच पारा चढत होता.

मनात विचार आला की एक वाघ पाहण्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करतोय, उन्हातान्हात तहानभूक विसरून फिरतोय. पण वाघ स्वत:ला कोण समजतो काय माहीत दिसायलाच तयार नाही. एवढी उत्सुकता कधी रिझल्टची पण नसायची जेवढी वाघ पाहण्याची होती. असं वाटत होतं की तो वाघ आम्हाला खिजवतोय की फिरा, आख्ख जंगल पालथं घाला, पण मला शोधूनच दाखवा. एरवी मला पिंजर्‍यात कोंडून तुम्ही मजा घेतात आता मी मजा घेतो तेही माझ्याच राज्यात !!

webdunia
WD
आज आमचा जंगलसफारीचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे आता वाघ दिसला नाही तर पूर्ण ट्रीप पाण्यातच. सगळेजण खूप टेन्शनमध्ये होते. देवाचं नाव घेणे, भरद्वाज पक्षी, मुंगूस दिसला की नमस्कार करणे असले प्रकारही एव्हाना ‍आमच्या ड्रायव्हरला काहीतरी संदेश मिळाला आणि आमच्या जिप्सी जोरात धावू लागल्या. थोडं अंतर कापल्यावर एका दाट जंगलाच्या दिशेने आम्ही जाऊन थांबलो. तिकडे बरेचसे लोकं एलीफंट राईड करत होते. तेवढ्यात कानावर पडले की टायगर शो इस ऑन. टायगर नाव ऐकताच सगळ्यांचे कान एकदम टवकारले आणि गाईडने सांगितले की समोर दिसणार्‍या झाडीत वाघ आहे जो तुम्ही आता हत्तीवरून पाहणार आहात. हे ऐकताच सगळे झटक्यात फ्रेश झाले, मनातली मरगळ दूर होऊन परत वाघ दिसण्याची आशा पल्लवीत झाली. एका हत्तीवर दोन दोन जणं बसून वाघ पहायला निघाले. मी टूर मॅनेज करत असल्याने शेवटी जाणार होते. आमच्या ग्रुपमधली चार जणं सर्वात पहिले हत्तीवर स्वार होऊन व्याघ्र दर्शनासाठी निघाले. तोपर्यंत अजून काही हत्ती आले आणि उरलेल्या मुलामुलींना घेऊन निघाले.

शेवटी आम्ही चारच जण उरलो. थोड्याच वेळात आमच्या ग्रुपमधली मुले परत येताना दिसली. चेहर्‍यावर विलक्षण आनंद दिसत होता त्यामुळे वाघ दिसला असेल हे नक्की होतं! हत्तीवरून उतरताच सगळेजण माझ्याकडे धावत येऊन म्हणाले - 'ऋचादीदी काय वाघ आहे सॉलीड ! एक नंबर !! तेव्हा मात्र माझा जीव भांड्यात पडला की चला मला दिसो वा ना दिसो या मुलांना तर वाघ दिसला.

फायनली आमचा 4 चणांचा नंबर लागला. हत्तीवर बसण्याच्या कुतूहलापेक्षा हत्तीवरून आता आपण वाघ पाहणार ही कल्पनाच खूप ढँगचिक वाटली. हत्ती थोडासाच आत शिरला आणि माहुताने खुण करून वाघ पाहण्यास सांगितला. आमच्या नजरा तिकडे वळाल्या आणि काय साक्षात वनराज!! उंचपूरा, पिवळाधम्म, रेखीव काळ्या रेषा, भितीदायक जबडा - फायनली वाघ आमच्या समोर होता. 10 सेकंद मी वाघाकडे नुसते पाहतच राहीले. फोटे काढण्याचे भानही मला नव्हते. थोड्यावेळाने त्याने गुरगुर केल्यावर मात्र मी भानावर आले. विश्वासच बसत नव्हता की कुठल्याही संरक्षणाबिना फक्त हत्तीवरून, उघड्यावर समोर असलेला वाघ आम्ही पाहत होतो!! मग मी शक्य तेवढ्या त्याच्या छबी टिपण्याचे प्रयत्न केले. त्याचवेळी वाघ पळाला. तिथे असलेल्या माहुतांनी एकमेकांना खुणेने त्यावर लक्ष ठेवण्याचे संकेत दिले. आणि परत एकदा वाघ आमच्या समोर उभा ठाकला. अडीच किलोमिटरपर्यंत आम्ही वाघाचा पाठलाग केला. आम्हाला मनसोक्त दर्शन देऊन मात्र वाघ लांब जंगलात पळून गेला.

दोन दिवस वाघासाठी केलेली वणवण आज सार्थ ठरली. त्यामुळे हत्तीवरच आम्ही धिंगाणा सुरू केला. ज्या वाघाला तो दिसत नाही म्हणून आम्ही दूषणं देत होतो त्याचच कौतुक करताना आज शब्द अपुरे पडत होते. वाघाने आमची ट्रीप तिही माझी पहिलीच ट्रीप यशस्वी केल्यामुळे मी भलतीच फॉर्मात होते. प्रत्येकजण फोनवरूनच आपापल्या घरच्यांना वाघ पाहिलच्याचा चित्रथरारक अनुभव सांगत होते आणि नासिकला परत येण्याचीही तयारी करत होते.

नासिकला पोहचल्यावर ग्रुपमध्यला सगळ्यांनी मला मनापासून थॅक्स ‍िदले कारण ट्रीप खूप छान झाली. पण मी मात्र अजूनही मनापासून थँक्स देत होते ते त्या 'वाघाला...'.

Share this Story:

Follow Webdunia marathi