Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चला काश्मीरच्या छायेत......

- पूजा तावरे

चला काश्मीरच्या छायेत......
, मंगळवार, 26 एप्रिल 2011 (15:02 IST)
WD
शाळांना सुट्टी लागली असून मे महिना सुरू होण्या अगोदरच उन्हाचा जोरदार चटका जाणवायला लागला आहे. त्यामुळेच कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे नक्कीच तुम्ही ठरवत असाल... मान्य आहे भारतात सर्वत्रच उन्हाळा आहे... परंतु तुम्हालाही कुठे भारताच्या बाहेर जाण्यासाठी सांगणार नाही... आपल्या देशाचा स्वर्ग विसरलात का तुम्ही...

अप्रतिम निसर्गाची मुक्त उधळणं आणि भूलोकीचे नंदनवन म्हणजे काश्मीर. पर्यटकांचे आकर्षणस्थान असणारे हे स्थळ. वैष्णोदेवी, श्रीनगरमधील दल सरोवर, हाऊसबोटी, शिकारा, मुघल गार्डन ही अत्यंत प्रेक्षणीय ठिकाणे येथे आहेत. काश्मिरी गालिचे, लोकरी शाली, कशिदाकारी केलेले ड्रेस, केशर, मध अशा विविध वस्तूंची बाजारपेठ येथे आहे म्हणजे खरेदीसाठी मज्जाच मज्जा. येथे जाताना श्रीनगरला उतरल्यावर दाल तलावाचा जादुई गालिचा तुम्हाला सर्वत्र हिंडवतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणाऱ्या मैत्रीप्रमाणे जागोजागी बहरलेल्या मुघल बागा स्वप्नरूमानी करून टाकतात. पृथ्वीवर स्वर्ग कुठे आहे, तर तो काश्मीर मध्येच आहे याची प्रचिती वेळोवेळी येथे येते.

webdunia
WD
या स्वर्गाची सुरक्षा करण्यासाठी सगळीकडे सुरक्षा दलाचे जवान एके ४७ रायफली घेऊन उभे असतात. काश्मीरच्या सहलीत वैष्णोदेवीचे तितकेच महत्त्व आहे. सुमारे ५२ हजार फिट उंचीवर असणारे गुहेतील वैष्णोदेवीचे मंदिर देशातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. कटरा पासून वैष्णोदेवी १४ ते १५ किमीवर आहे. डोंगर चढणीचे हे अंतर पायी सुमारे १० ते १२ तासात आणि घोड्यावरून २ ते ४ तासात पार करू शकतो. ज्येष्ठांसाठी डोलीची तर लहान मुलांसाठी पिट्टू (खाद्यावरून नेणारी व्यक्ती)ची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. तसेच दर अर्ध्या तासाने हेलीकॉप्टरने जाण्याची देखील येथे सोय आहे. असे हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या देवीचे दर्शन अहोरात्र सुरू असते. तसेच मंदिरामध्ये राहण्या-खाण्याची चांगली सोय आहे. मंदिरात वैष्णव देवीची अशी कोणतीही मूर्ती नाही. एका गुहेत तीन छोट्या पिंडी (महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती) आहेत. मात्र त्यांचे दर्शन घ्यायला काही सेकंदच मळितात. या मंदिरापासून थोड्या उंचीवर भैरोघाटी हे ठिकाणही पाहण्यासारखे आहे. त्यानंतर कटरा, श्रीनगर, पहेलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग हा प्रवास तर करायला हवाच!

जम्मू-श्रीनगर हा १२-१४ तासांचा प्रवास आहे. जाताना, नद्या, पर्वत, नागमोडी रस्ते आणि वाटेत महामार्गावर असणारे पटनीटॉप हे निसर्गसौंदर्याने नटलेले हिलस्टेशन. उंचच उंच पाईन्स व देवदार वृक्षांनी आच्छादितं असणारा हा परिसर आहे. श्रीनगरला जाताना दिसणारी केशरची शेती, पाईन्सची झाडे आणि पावलापावलावर आपली सुरक्षा करण्यासाठी असणारे आपले जवान हे चित्र येथे सर्वत्रच दिसते. या महामार्गावरील आणखी एक आकर्षण म्हणजे जवाहर बोगदा. यातून जाण्याची मजा एकदा तरी अनुभवायला हवी. आता, तुम्ही जर काश्मीरमध्ये आलात तर बर्फातील पर्यटन तर करायलाच हवे.

webdunia
ND
काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. येथील सौंदर्य मनाला अलगद स्पर्शून जाते. दल लेक मधील शिकारा भ्रमण हे इतर कुठल्याही बोटींग पेक्षा कधीही आनंददायक वाटते. दल लेकच्या हाऊसबोटीध्ये राहण्याची व्यवस्था करता येते. संपूर्ण श्रीनगर हे बागा आणि सरोवरांनी बहरलेले आहे. त्याचबरोबर येथील अजून एक आकर्षण म्हणजे शिकारा आणि दल सरोवर. शिकाऱ्यातून दल सरोवर फिरणे, शिकाऱ्यातून येथील नागरिकांचा प्रवास, लहान मुलांचे शाळेत जाणे हे तर या भागातील रोजचेच चित्र. येथे असणारी पाण्यावर तरंगणारी शेती पाहिली की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या शिकाऱ्यातून येथील नागरिक लोकरीचे कपडे, काश्मिरी दागिने, केशर विक्री करतात. येथील तरंगत्या बाजारात शाली, अक्रोड, केशर, दागिने अशा वस्तू विकायला असतात. ते पाहताना खूप गंमत वाटते. या परिसरात असणारे शंकराचार्य मंदिर म्हणजे अप्रतीम वास्तुशिल्पाचा नमुना आहे. इसवी सनपूर्व २५० च्या आसपास हे बांधण्यात आले. सुमारे साडेतीनशे पायऱ्या असलेले टेकडीवरील हे मंदिर शंकराचे आहे. मात्र शंकराचार्यांनी काही काळ येथे वास्तव्य केल्याने यास शंकराचार्य मंदिर म्हणून ओळखले जाते. शंकराचार्य मंदिरावरून श्रीनगर शहराचे दिसणारे विहंगम दृश्य मनाला मोहरून टाकते. याचबरोबर येथे असणारे ट्युलिप, शालीमार, निशात व चश्मेशाही असे मुघल गार्डन पाहण्याचा आनंद काही वेगळाच. जिकडे तिकडे कारंजी, धबधबे, हिरवळ, गुलाब... आणि बहरलेली विविधरंगी फुलांची रेलचेल. श्रीनगरला केशर, सिल्कच्या साड्या, शाली, स्वेटर यांची मोठी बाजारपेठ आहे. श्रीनगरपासून काही अंतरावर पर्यटनाचा वेगळा अनुभव देणारी सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम ही ठिकाणे आहेत. सोनमर्ग हे साहसी खेळ आणि ट्रेकिंग करणाऱ्यांना आकर्षित करणारे असे ठिकाण आहे. तसेच येथे बर्फात खेळण्याचा आनंदही लुटता येतो. उन्हाळ्यात देखील येथील हवामान थंड असते. सोनमर्गची हिमशिखरेही अत्यंत सुंदर आहेत. गुलमर्गला पोहोचल्यावर खरोखरच स्वर्ग पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. गुलमर्गची विशिष्ट रचना असलेली पर्वतराजी व त्याला हिरवीगार किनार लाभलेली पाईनची उंच उंच झाडे पाहायलाच हवीत. गुलमर्ग म्हणजे बर्फाचा अमर्यादित असा गालिचा. येथे गुलमर्ग गंडोला म्हणजे उंच केबल कार आहेत. गुलमर्ग येथील केबल कार ही जगातील सर्वाधिक उंच अशी केबल कार आहे.

webdunia
WD
पहेलगाम म्हणजे काश्मिराला पडलेले एक सुंदर स्वप्नच. लीडर नदीच्या खोऱ्यातील रत्न म्हणून ओळखले जाणारे पहेलगाम लीडर नदीच्या दोन्ही तिरावर वसले आहे. आशियातील सर्वाधिक केशराचे उत्पादन येथे होते. येथील डोंगर उतरणीवर पाईन्सची गर्द झाडी आहे. छोटे छोटे झुलते पूल येथील आकर्षण आहे. या भागात साड्या स्वस्त मिळतात. तर येथील रस्त्याच्या दुतर्फा क्रिकेटच्या बॅट्स तयार करण्याचे कारखाने आहेत. काश्मीर म्हटलं की केशर आणि अक्रोडाची आठवण येतेच. तसाच तिथला कावा म्हणजेच काश्मिरी चहा देखील प्रसिद्ध आहे. कडाक्याच्या थंडीत कावाची मदत होते. आलं आणि वेलची घालून उकळल्यानंतर त्यात केशर आणि तुकडे घातले जातात. कावा तयार करण्यासाठी खास प्रकारच्या किटल्यांचा वापर केला जातो. कावा काही काळ गरम राहण्यासाठी त्यात कोळसा ठेवला जातो. त्याचबरोबर काश्मीरमधील आवडता खाद्यपदार्थ म्हणजे कबाब! आणि खास करून खिम्याचे कबाब. काश्मिरी दम आलू देखील लोकप्रिय आहे. काश्मीरमधील छोटीशी लाकडी घरे, घराबाहेर बांधलेली खेचरे पाहण्यासाठी आणि येथील स्वर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यायला हवी.

Share this Story:

Follow Webdunia marathi