Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Tourism Day : पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल

World Tourism Day : पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल
, सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (09:54 IST)
विश्रांतीसाठी म्हणून सहलीला गेल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अनेक लाभ मिळू शकतात.
 
तुम्ही घराबाहेर असाल, नव्या शहरात भटकंती करत असाल, नयनरम्य देखावे बघत असाल किंवा मग शहराबाहेर शुद्ध हवेचा आनंद लुटत असाल.
 
तुम्हाला सफर करण्याचं भाग्य लाभलं असेल तर बॅग भरण्यासाठी ही आहेत सहा कारणं...
 
1. हृदयासाठी आरोग्यदायी
तुम्हाला नवनव्या शहरात किंवा निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल तर तुम्ही दररोज जवळपास 10,000 पावलं प्रवास करता. म्हणजे जवळपास 6.5 किलोमीटर. साधारणपणे दररोज एवढं चालणं उत्तम शारीरिक व्यायाम आहे.
 
चालण्यासोबतच थोडं स्थलदर्शन किंवा इतर काही कृती केली की तुमचा संपूर्ण शारीरिक व्यायाम झालाच म्हणून समजा. विशेषतः हृदयासाठी...
 
1948 साली फ्रामिंघम स्टडी करण्यात आला. यात महिलांच्या हृदयाच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. जवळपास वीस वर्षं हे संशोधन सुरू होतं.
 
या अभ्यासाचे निष्कर्ष फारच धक्कादायक होते. ज्या महिला वर्षातून एकदाच सुट्टी घेतात त्यांच्यात वर्षातून दोनदा सुट्ट्या घेणाऱ्या महिलांच्या तुलनेत हृदयविकार किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार होण्याची शक्यता आठ पट जास्त असते.
 
यात लठ्ठपणा किंवा धुम्रपान करणाऱ्या महिलांचा समावेश करण्यात आलेला नाही.
 
न्यूयॉर्कच्या स्टेट युनिवर्सिटीमधल्या संशोधकांनीही एक अभ्यास केला. यात हृदयरोगाची शक्यता जास्त असणाऱ्या 12,000 पुरुषांवर नऊ वर्षं लक्ष ठेवण्यात आलं. यातले जे वार्षिक सुट्टी घेत नाहीत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता 32 टक्क्यांनी अधिक असल्याचं आढळलं.
 
2. तारुण्य टिकण्यासाठी मदत
ग्लोबल कोअलिएशन ऑफ एजिंग रिपोर्टनुसार ताणामुळे अकाली वृद्धत्व येण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.
 
शरीरात स्त्रवणारं कॉर्टिसॉल संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनमुळे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते. किडनीच्या कामात अडथळा निर्माण होतो. डोकेदुखी, आतड्याची जळजळ होते. मात्र या संस्थेच्या अहवालानुसार कॉर्टिसॉल नियंत्रित ठेवण्यासाठी पर्यटन एखाद्या इंजेक्शनसारखं काम करतं.
 
सुदैवाने तणावमुक्तीसाठी मोठीच सुट्टी घेणं गरजेचं नाही.
webdunia
2012 साली 500 जणांवर करण्यात आलेल्या एक्सपेडिया सर्व्हेनुसार एक किंवा दोन दिवसांच्या सुट्टीनेही तुमचा ताण दूर व्हायला मदत होते.
 
इतकंच नाही तर 2002 साली ब्रिटेनच्या सरे विद्यापीठातल्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सहलीची तयारी करणं आणि तिचा केवळ विचार करण्यानेच सकारात्मक भावना निर्माण होते आणि सहलीवर जाणाऱ्यांचं "एकूणच आयुष्य अधिक आनंदी होतं."
 
3. बुद्धी कुशाग्र होते
प्रवास म्हणजे नवनवीन पदार्थ चाखणं, नवीन वातावरण अनुभवणं आणि कदाचित नवीन भाषेचा परिचय होणंसुद्धा... या सर्वांमुळे मेंदू उत्तेजित होतो. त्यामुळेच प्रवास म्हणजे मेंदूला चालना देण्याची उत्तम संधी.
 
ग्लोबल कोअलिएशन ऑन एजिंग रिपोर्टनुसार स्थानिक संस्कृतीची ओळख आणि वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती करून घेण्याने आपण स्मार्ट तर बनतोच. शिवाय यामुळे स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमरसारखे आजार दूर राहतात.
 
पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातले डॉ. पॉल डी. नसबम म्हणतात, "प्रवास एक उत्तम औषध आहे."
 
ते सांगतात, "प्रवासामुळे मेंदूचा नवीन आणि भिन्न अनुभव आणि वातावरणाशी सामना होतो, मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीचं हे महत्त्वाचं वर्तन आहे आणि यामुळे आयुष्यभर मेंदू लवचिक राहतो."
 
4. सर्जनशीलता वाढवते
"तुम्हाला नवीन कल्पना सुचवायची असेल तर त्याबद्दल विचार करणं थांबवा." हे वाक्य आहे अमेरिकेतले जाहिरात गुरू जेम्स वेब याँग यांच्या "A Technique for Producing Ideas" या पुस्तकातलं.
 
याचा अर्थ त्यांच्या जाहिरातींसाठीच्या कल्पना आकाशातून पडतात, असं त्यांना म्हणायचं नाही.
 
त्यांच्यासमोर येणाऱ्या विषयाचा ते अभ्यास करतात आणि त्यावर काही जुजबी विचारही करून ठेवतात. मात्र काहीतरी भन्नाट कल्पना सुचण्याचा जो क्षण आहे तो नंतर कधीतरी येतो. अशावेळी जेव्हा ते काहीतरी वेगळं करत असतात, उदाहरणार्थ सिनेमाला जातात.
 
नवीन वातावरण आणि अनुभवामुळे मेंदूत नवीन बंध तयार होतात आणि मनाला नवचैत्यन्य मिळतं, हे आज मज्जासंस्थेशी संबंधित शास्त्रज्ञांना कळलं आहे.
 
याचा थेट संबंध "cognitive flexibility" म्हणजेच आकलन क्षमतेच्या लवचिकतेशी आहे. आकलन क्षमतेची लवचिकता म्हणजे मेंदूला नवनवीन कल्पना सुचणं आणि हाच सर्चनशीलतेचा महत्त्वाचा घटक आहे.
 
म्हणूनच तर जगप्रसिद्ध चित्रकार पॉल ग्वागिन, लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे आणि संगीतकार इगोर स्टारविन्स्की यांच्या गाजलेल्या कलाकृती या त्यांनी प्रवास केल्यानंतर रचलेल्या आहेत, हा निव्वळ योगायोग नाही.
webdunia
5. उत्पादन क्षमता वाढते
आजच्या काळात कामाच्या ठिकाणी होणारी चिडचिड गंभीर विषय बनला आहे.
 
ताणामुळे केवळ कर्मचाऱ्यांवरचं ओझ वाढलं आहे, असं नाही. तर ताणाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि उत्पादनक्षमता कमी झाल्याने, कर्मचारी आजारी पडण्याचं प्रमाण वाढल्याने, अपघात आणि नुकसान भरपाई या सर्वांमुळे कंपन्यांवरचं ओझंही वाढलं आहे. जगभर हीच परिस्थिती आहे.
 
वाढत्या ताणामुळे एकट्या अमेरिकेतल्या उद्योग जगताला दरवर्षी 300 अब्ज डॉलर्सचं नुकसान होतं, असं द अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेसचं म्हणणं आहे.
 
आनंद आणि उत्तम आरोग्य विज्ञानावर लिखाण करणारे ख्यातनाम लेखक डॉ. शिमी कांग म्हणतात, मेंदूला थोडी विश्रांती दिल्याने तो रिसेट होतो. त्याची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते आणि नवीन कल्पना सुचतात.
 
6. वैयक्तिक विकास साधता येतो
तुम्ही तरुण असाल आणि काही काळ परदेशात राहण्याची संधी तुम्हाला मिळाली तर हा अनुभव तुमच्या वैयक्तिक विकासासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.
 
जर्मनीतल्या फ्रिडरक-चिलर विद्यापीठातले डॉ. ज्युलिआ झिमेर्मन आणि डॉ. फ्रान्झ नेयेर यांनी किमान एका सेमिस्टरसाठी परदेशात राहून आलेल्या जर्मन विद्यापीठातल्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची परदेशात न गेलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना केली.
 
यात परदेशात राहून शिकलेले विद्यार्थी हे शिक्षणासाठी परदेशात न गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मनमोकळे आणि खुलेपणाने संवाद साधणारे असल्याचं दिसून आलं.
 
त्याचप्रमाणे सहलीवरून आल्यावर पर्यटकांमध्येसुद्धा नवीन अनुभवाप्रती अधिक खुलेपणा येतो आणि ते भावनिक पातळीवर अधिक स्थिर होतात.
 
संशोधक लिहितात, "पर्यटनामुळे किशोरावस्थेपासून पौढावस्थेपर्यंतच्या काळात अधिकाधिक लोकं अधिक प्रामाणिक, मनमिळाऊ आणि भावनिकदृष्ट्या स्थिर होतात."
 
त्यामुळे तुमचं वय कितीही असो आणि फिरण्याची आवड कशीही असो, थोडा वेळ काढून एका मस्त आरामदायी सहलीला जाणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगेशने बॉसला सुटटी मागण्याचे कारण काय सांगितले जाणून घ्या