Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातलं असं शहर जिथे कुणीच कधी उपाशी राहात नाही

भारतातलं असं शहर जिथे कुणीच कधी उपाशी राहात नाही
भारतातल्या शीख समाजाचं परमपूज्य तीर्थस्थळ म्हणजे पंजाबमधलं अमृतसर. या शहरात ‘गोल्डन टेम्पल’ आहे हे आपल्याला माहीत आहे.
 
पण हे शहर जगभरात दातृत्वासाठी तेही अन्नदानासाठी प्रसिद्ध आहे याची कल्पना आहे का? या सुवर्णमंदिरातच दररोज किमान लाखभर लोकांना जेवण दिलं जातं... अगदी विनामूल्य!
 
लाल रेष 
उत्तर भारतातलं मोठं शहर म्हणजे अमृतसर. शहराची लोकसंख्या आहे 20 लाखांच्या आसपास. हे शहर भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे दोन कारणांसाठी. एक- अर्थातच डोळ्यांचं पारणं फेडणारं शीख समाजाचं श्रद्धास्थान - गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्णमंदिर.
 
दुसरं म्हणजे या जुन्या ऐतिहासिक शहरातलं रुचकर भरपेट जेवण. तरीही या शहराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लोकांचं दातृत्व दिलदारपणा. फक्त गुरुव्दारामधलीच नाही तर रस्त्या-रस्त्यावरच्या माणसांचं मोठं मन, देणाऱ्यांचे हात दिसत राहतात. या शहराच्या स्थापनेपासूनच हे देणं जोडलेलं आहे.
 
पंजाबी प्रांतातच शीख धर्माचा उदय झाला. या पंजाबमध्येच १६व्या शतकात शीख गुरूंनी हे अमृतसर शहर वसवलं. शीख समाजात सेवाधर्माचं मोठं महत्त्व आहे.
 
कुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा व्यवहारी विचार न करता दुसऱ्यांकरता सेवा करत राहणं या धर्मात अभिप्रेत आहे.
 
जगभरात विखुरलेले शीख ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये सेवाकार्य करत असतात. अगदी साधी कामंही या सेवाभावात अभिप्रेत आहेत. म्हणजे स्वयंपाक करून जेवायला वाढणं, फरशी पुसणं, साफसफाई करणं, मंदिर व्यवस्था बघणं ही कामं शीख भाविक स्वयंप्रेरणेने सेवा म्हणून करताना दिसतात.
 
इतर ठिकाणी आपापल्या परीने गुरुद्वारांच्या बाहेरही दानधर्म आणि दुसऱ्यांना काही देण्यामधून शीखधर्मीय आपल्या गुरूंनी सांगितलेला सेवाधर्म पाळत असतात.
 
एप्रिल 2021 मध्ये देशभरात कोरोनाव्हायरसचं थैमान सुरू होतं त्या वेळी शीख समाजाने गरजवंतांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम अंगावर घेतलं होतं.
webdunia
'सेवाधर्म उपदेशातून येत नाही, रोजच्या कामाचा भाग'
सेवा म्हणजे स्वार्थभाव विरहित काम. शीख धर्मात सेवाभाव फक्त उपदेशांतून येत नाही तर तो दैनंदिन जीवनाचा भाग असणं आवश्यक असतं, असं जसरीन मायाल खन्ना यांनी त्यांच्या Seva: Sikh Wisdom for Living Well by Doing Good या पुस्तकात लिहिलं आहे.
 
दयाळू असणं हे जगभरात औचित्याचा गुण ठरण्याअगोदरपासून शीख समाज दयाळू म्हणून ओळखला जातो आहे. अजूनही हा गुण या समाजात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, असं खन्ना म्हणतात.
 
"सेवा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रेम", 23 वर्षांचा अभिनंदन चौधरी सांगतो. तो त्याच्या परिवारासह वयाच्या आठव्या वर्षापासून सेवाकार्य करत आहे.
 
"सेवा करताना आम्हाला एक शिकवण नेहमी मिळते. तुम्ही करताय त्या कामाचा गवगवा नको, अगदी शांतपणे आणि निःस्वार्थी वृत्तीने सेवा करायला हवी. इतकी बेमालूमपणे की, तुमचा डावा हात सेवेत असेल तर उजव्या हाताला त्याची कल्पना नसावी."
 
आत्मकेंद्री आणि भांडवलवादी जगात एवढ्या निस्वार्थीपणे जगणं हा एक वेगळा ताजंतवानं करणारा मार्ग असू शकतो.
 
जगभरात सगळीकडेच शीख समाजाच्या निःस्वार्थी सेवेची, दानशूरपणाची प्रेरणा दिसू शकते. कोव्हिडच्या लॉकडाउनदरम्यान इंग्लंडच्या गुरुद्वारामधून NHS च्या कर्मचाऱ्यांना (ब्रिटनमधल्या आरोग्यसेवेला NHS म्हणतात) दररोज हजारोंच्या संख्येने जेवण दिलं जात होतं. शीख स्वयंसेवक हे काम करत होते.
 
अमेरिकेतही अनेक शहरांमधून शीख धर्मीय हजारो जणांना जेवायला घालतात आणि कुठलंही शुल्क आकारत नाहीत.
 
कुठल्याही आपत्तीच्या वेळी किंवा संकटकाळात शीख समाजाने पूर्ण शक्तिनिशी गरजूंना हवी ती मदत पुरवण्यात पुढाकार घेतला आहे. न्यूझीलंडमधलं चक्रीवादळ असो वा कॅनडातला पूर शीख समाजाची ही मदतकार्यातली तत्परता सगळीकडे दिसली.
 
इथे कोणतीही व्यक्ती उपाशीपोटी झोपत नाही
अमृतसर तर शीखधर्माची जान आहे. सेवाभाव आणि अन्नदान एका वेगळ्याच अत्युच्च पातळीवर इथे दिसतो. भारतात सगळीकडेच अमृतसरचं गोल्डन टेम्पल माहीत आहे. प्रसिद्ध आहे.
 
इथे कुठल्याही दिवशी गेलात तरी याचकाला पोटभर जेवण हमखास मिळतं. तयार असतं. सुवर्णमंदिर हे शीखधर्मीयांसाठी महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या गुरुद्वारात आलेला याचक कधीच अन्नाशिवाय परत जात नाही. अमृतसरमध्ये कुठलीही व्यक्ती कधीच उपाशीपोटी झोपी जात नाही, असं म्हणतात.
 
सुवर्णमंदिरातलं लंगर म्हणजे विनामूल्य अन्नदान सेवा हे जगातलं सर्वांत मोठं कम्युनल किचन आहे. इथे आठवड्यातले सगळे दिवस अगदी दररोज एक लाख लोकांना जेवायला वाढलं जातं. पुन्हा इथे येणाऱ्यांमध्ये भेदभाव केला जात नाही. कुणीही याचक आला तरी त्याच्यासाठी दिवसभर अगदी 24 तास भोजनाची सोय असते शिवाय गरजवंतांना आसराही दिला जातो.
 
न्यूयॉर्कमध्ये असणारे मिशलिन स्टार शेफ विकास खन्ना यांनी कोव्हिड काळात भारतात लाखो लोकांसाठी जेवण पुरवलं होतं.
 
खन्ना सांगतात, "माझा जन्म अमृतसरचा. मी तिथेच लहानाचा मोठा झालो. आमच्याकडे प्रचंड भव्य सार्वजनिक स्वयंपाकघर आहे. सगळ्यांना जेऊ घातलं जातं तिथे. अख्खं शहर जेवेल एवढं अन्न तिथे तयार होऊ शकतं. भुकेची जाणीव माझ्या आयुष्यात आली न्यूयॉर्कला आल्यावरच. मी संघर्षाच्या दिवसांत इथे अगदी शून्यातून सुरुवात केली होती. "
 
इतर अनेक गुरुद्वारांमध्ये असतं तसं सुवर्णमंदिराच्या लंगरमध्येही साधं जेवण वाढलं जातं. स्वयंसेवकांच्या अक्षरशः फौजा इथे शिस्तबद्ध काम करत असतात. त्यामुळे दररोजचा एवढा रामरगाडा अगदी सुरळीत चालतो.
 
इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना डाळ- चपाती- छोल्याची उसळ आणि दही असं साधं जेवण दररोज दिलं जातं. किमान 200 जण बसू शकतील अशा मोठ्या हॉलमध्ये रांगेत स्टीलच्या ताटामध्ये पानं वाढली जातात.
 
जमिनीवर मांडी घालून बसून लोक जेवतात. त्यात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा भेद कधीच केला जात नाही. एका लयीत सगळं काम सरसर सुरू असतं. प्रत्येकाला आपलं काम जणू ठरवून दिलं आहे आणि एखाद्या रचनाकारासारखं झरझर आपापली कामं करणाऱ्यांच्या लयबद्ध हालचाली सुरू असतात.
 
जेवणाऱ्यांपैकी काही जण पानात एकदा वाढलेलं अन्न संपताच उठून जातात तर काही जण आणखी मागून जेवतात. दर 15 मिनिटांनी सेवेकरी किंवा स्वयंसेवक खरकटी ताटं उचलून जमीन स्वच्छ करतात आणि पुढच्या पंगतीसाठी हॉल साफ करतात. हे चक्र अविरत सुरू असतं. वाढणारे आणि जेवणारे यांची कार्य अखंड चालू असतात.
 
‘अमृतसरमध्ये राहणं एखाद्या मोठ्या कुटुंबात राहिल्यासारखंच वाटायचं’
या शहरात आल्यावरच जाणवतं की, मंदिरापासून ते रस्त्यापर्यंत सगळीकडे मदत करण्याची वृत्ती आणि औदार्य ठायी ठायी भरलेलं आहे. आम्ही इथे आल्यावर हसऱ्या चेहऱ्यांनीच आमचं स्वागत झालं.
 
थोडं कुठे गोंधळल्यासारखं किंवा हरवल्यासारखं चेहऱ्यावरून वाटलं तरी कुणीतरी काही मदत हवीये का म्हणत विचारायला येतं. वर्दळीच्या भागात रात्री चालत असताना कुणी जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी अनोळखी व्यक्तीदेखील जरा जपून, पर्स, पिशव्या सांभाळण्याचा सल्ला देतो.
 
आम्ही ‘केसर दा ढाबा’ नावाच्या इथल्या प्रसिद्ध खानावळीत आमचा नंबर यायची वाट बघत होतो तेव्हा टेबलावर बसलेल्या लोकांनी जरा सरकून आमच्यासाठी जागा करून दिली. त्यासाठी त्यांना जेवताना एकमेकांची कोपरं लागतील एवढं खेटून बसावं लागलं. स्वागताला कायम तत्पर असल्याचे भाव आणि सगळं काही वाटून घ्यायची तयारी हे सगळीकडेच दिसलं.
 
एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपलंसं करायला सौहार्दपूर्ण नजर आणि चेहऱ्यावर स्मितहास्य एवढं पुरेसं होतं. याच्या जोरावर कुणी चहासाठीसुद्धा बोलावू शकतं आणि आपल्या आयुष्याबद्दल गप्पागोष्टीही सुरू होऊ शकतात.
 
"अमृतसरमध्ये राहणं, वाढणं म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबात राहिल्यासारखंच वाटायचं," याच शहरात जन्मलेले आणि मोठे झालेले राहत शर्मा सांगतात.
 
"आम्ही सगळेच सुवर्णमंदिरात सेवा करायचो. तिथे लपाछपी खेळत मोठं झाल्याच्या आठवणी आहेत. राजकीय मतभेद आणि विरोधी वातावरण असलं तरी हिंदू आणि शीख धर्माचे नागरिक या शहरात अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. एकमेकांची काळजी घेतात."
 
अमृतसर हे शहर पवित्र आहे, श्रद्धाळू लोकांचं आहे हे जितकं खरं आहे तितकंच हे शहर चैतन्याने सळसळणारं आहे हेही खरं. रस्त्याकडेला मिळणारं स्थानिक पदार्थ म्हणजे छोले-कुल्चे आणि मातीच्या पारंपरिक कुल्हडमध्ये मिळणारी फिरनी म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गसुख. वर मस्त मलईदार लस्सीचा ग्लास मिळाला की कुठल्याही अस्सल खवय्या भारतीयाच्या जिभेला पाणी सुटणारच.
 
अमृतसरच्या जुन्या शहराचा भाग तसा दुर्लक्षित तरी उत्साहाने रसरसलेला असा. अरुंद गल्ल्या, गजबजलेले छोटे चौक आणि चैतन्याने बहरलेला बाजार यात तुमचा वेळ कसा जाईल कळणारही नाही.
 
हसऱ्या शहरामागचा वेदनादायी इतिहास
अमृतसरच्या या भव्य आणि मुक्त चित्रामागे या शहराला घडवणारा काळा समकालीन इतिहास दडलेला आहे. यातून शीख समाजाचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातले बदलही घडले आहेत.
 
पंजाबमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असल्याने ब्रिटीश काळापासूनच या शहराने अनेक मोठमोठे मेळावे आणि आंदोलनं पाहिली. 1919 साली झालेल्या एका घटनेनं अमृतसरच नाही तर सारा देशच हादरून गेला होता. एका शांततेत चाललेल्या आंदोलनावर ब्रिटीश अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि 1500 निष्पाप लोकांचा बळी घेणारं जालियनवाला बाग हत्याकांड घडलं.
 
1947 मध्ये ब्रिटीश हा देश सोडून गेले त्या वेळीसुद्धा फाळणीच्या आणि त्यानंतरच्या हिंसाचाराच्या सर्वाधिक झळा बसलेलं शहर होतं अमृतसर. कारण भारत-पाक सीमेच्या जवळच हे शहर वसलेलं आहे. याच इतिहासामुळे असेल पण भारतातलं पहिलं आणि एकमेव पार्टिशन म्युझियम 2017साली अमृतसरमध्येच उभारलं गेलं.
 
पुढे सन 1984 मध्ये पुन्हा एकदा अमृतसर शहरात घडलेल्या घटनेनं देशाला हादरवलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात दडून बसलेल्या फुटीरवाद्यांना शह देण्यासाठी थेट या मंदिरातच भारतीय लष्कर घुसवलं. या घटनेचे पडसाद देशभर उग्रपणे उमटले आणि आजही त्याचे परिणाम दिसतात. या घटनेनंतर काही महिन्यांतच इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी केली. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत संतापलेल्या त्यांच्या समर्थकांकडून देशभरात हजारो शिखांचं शिरकाण झालं.
 
शीखधर्मीयांनी त्यांच्या या प्रसंगाच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. शीख हुतात्म्यांचं स्मरण हे त्यांच्या संस्कृतीचा भाग झालेलं आहे. अगदी त्यांच्या काही प्रार्थनांमध्येही याचा उल्लेख असतो. "पण या जुन्या कथा पुन्हा सांगून द्वेष निर्माण करणं किंवा बदला घेण्याचा हेतू नसतो. उलट आमच्या समाजाचं संरक्षक म्हणून असलेलं स्थान, तो वारसा जपण्यावरच भर असतो", खन्ना लिहितात.
 
आणि म्हणूनच कदाचित या शहराचं आणि त्याच्या संस्कृतीचं मोठेपण अधोरेखित होतं. ज्या शहराने आणि समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर धक्के पचवले आहेत तेच किती दिलदारपणे सगळ्यांचं स्वागत करत मदत करतात हे निश्चित वाखाणण्यासारखं आहे.
 
खन्ना यांच्या मते, हे शिखांच्या रक्तात आहे. ""शिखांचे गुरू गुरुनानक यांनी सेवा हेच शिखांच्या आयुष्याचं मर्म असल्याचं सांगितलं आहे. नानकांच्याच शब्दांना आणि कार्याला अनुसरून सगळे शीख बांधव निःस्वार्थी सेवा हा आपल्या जीवनाचा मोठा भाग म्हणून निवडतात," खन्ना सांगतात.
 
सेवाभावाची ही परंपरा आणि शिखांची कुठल्याही जाती-धर्माच्या लोकांना - सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती हीच वैशिष्ट्य या शहरात उतरली आहेत.
 
अमृतसरचा इतिहास, वर्तमान, भविष्य कितीही काळा किंवा उज्ज्वल दिसत असो, इथल्या मातीतलं औदार्य, प्रेम आणि दिलदारपणा मात्र कधीच कमी झालेला नाही आणि होणारही नाही. कायम राहील या शहराचं वैशिष्ट्य.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तब्बूने नाकारला कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'!