Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलेशियामध्ये चीननं बांधलं आहे 'भुतांचं शहर'; तुम्हाला तिथे जायला आवडेल का?

Malaysia 1
, गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (17:17 IST)
निक मार्श
"मी या ठिकाणाहून बाहेर पडण्यात यशस्वी ठरलो," असं नाझ्मी हनाफिया यांनी हसत आणि काहीसं घाबरत सांगितलं.
 
आयटी इंजिनीअर असलेले नाझ्मी वर्षभरापूर्वी फॉरेस्ट सिटीमध्ये राहायला आले होते. हे दक्षिण मलेशिया भागातील जोहोरमध्ये चीननं बांधलेलं एक विशाल रहिवासी कॉम्पलेक्स आहे. त्यांनी राहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर वन बेडरूमचा एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता.
 
पण सहा महिन्यांतच त्यांची तिथं राहण्याची इच्छा संपली होती. त्या ठिकाणाला ते घोस्ट टाऊन "भूताचं गाव" म्हणत होते.
 
"मला जमा केलल्या डिपॉझिटची किंवा पैशाचीही काही काळजी नव्हती. मला फक्त इथून बाहेर पडायचं होतं," असं ते म्हणाले. आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्याच टॉवरमधील त्याच अपार्टमेंटची निवड केली होती, ज्यात ते राहत होते.
 
"मला फक्त इथं परत येऊन अंगावर शहारा येऊ लागला आहे. इथं खूप एकटेपणा आहे. फक्त तुम्ही आणि तुमचे विचार असता," असं त्यांनी म्हटलं.
 
चीनमधील मोठ्या विकासकांपैकी एक असलेल्या कंट्री गार्डननं 100 अब्ज डॉलरच्या फॉरेस्ट सिटी या भव्य प्रकल्पाची सुरुवात केली होती. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पांतर्गत 2016 मध्ये याचं अनावरण केलं होतं. 
 
त्यावेळी चीनमधील मालमत्ता व्यवसाय तेजीत होता. त्यावेळी विकासक मध्यम वर्गातील ग्राहकांसाठी देश आणि विदेशात घरांची निर्मिती करण्यासाठी मोठी कर्ज घेत होते.
 
मलेशियामध्ये पर्यावरण पूरक शहराची स्थापन करण्याची कंट्री गार्डनची योजना होती. त्याठिकाणी गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, ऑफिसेस, बार आणि रेस्तरॉ असतील असं त्यांनी ठरवलं होतं. फॉरेस्ट सिटी हे जवळपास दहा लाख लोकांचं घर असेल, असा दावा कंपनीनं केला होता.
 
आता आठ वर्षांनंतर हे शहर एखाद्या जुन्या वास्तुच्या अवशेषांसारखं उभं आहे. या ठिकाणच्या मालमत्तांसंबंधी जे संकट निर्माण झालं आहे, त्याची जाणीव होण्यासाठी चीनमध्येच असायला हवं हे गरजेचं नाही. या संपूर्ण प्रकल्पापैकी फक्त 15 टक्के भागाचं बांधकाम पूर्ण झालं आहे. काही ताज्या अंदाजांनुसार संपूर्ण प्रकल्पापैकी फक्त 1 टक्के भागाचाच ताबा ग्राहकांना देण्यात आलाय किंवा तिथं लोक राहत आहेत.
 
जवळपास 200 अब्ज डॉलरच्या कर्जाचा सामना करत असतानाही कंट्री गार्डननं अजूनही ते प्रकल्प पूर्ण होईल याबाबत आशावादी असल्याचं बीबीसीशी बोलताना म्हटलं.
 
'भयावह वातावरण'
फॉरेस्ट सिटीचं वर्णन "अ ड्रीम पॅराडाइज फॉर ऑल मॅनकाइंड" (संपूर्ण मानवजातीसाठी स्वप्नवत स्वर्ग) असं करण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात याचा उद्देश चिनी बाजारपेठेला समोर ठेवून लोकांना विदेशात दुसरं घर घेण्याची संधी देणं असा होता. त्या घरांची विक्री किंमत बहुतांश सर्वसाधारण मलेशियन नागरिकांच्या आवाक्याबाहेर होत्या.
 
चिनी ग्राहकांसाठी ही मालमत्ता मलेशियातील एखाद्या गुंतवणुकीसारखी ठरणार होती, जी नाझ्मी सारख्या लोकांना भाड्यानं देता येईल. तसंच त्याचा वापर त्यांना सुटी घालवण्यासाठी हॉलिडे होमसारखाही करता आला असता.
 
प्रत्यक्षात फॉरेस्ट सिटी हे निर्जन किंवा एकांताच्या ठिकाणी होतं. ते जोहोर बहरू शहरापासून लांब असलेल्या बेटांवर वसवण्यात येत आहे. पण इथून आता भाडेकरूही निघून गेले असून त्याला "घोस्ट सिटी" असं नाव पडलं आहे.
 
"प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे ठिकाण भयावह आहे. मला या ठिकाणाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षातला अनुभव खूपच वाईट होता. इथं काहीही करणं शक्य नाही," असं नाझ्मी म्हणाले.
 
फॉरेस्ट सिटीमध्ये नक्कीच विचित्र असं वातावरण आहे. अत्यंत निर्जन स्थळी असलेल्या हॉलिडे रिसॉर्टसारखा अनुभव इथं येतो.
 
सामसूम अशा समुद्र किनाऱ्यावर एक मुलांचं खेळण्याचं मैदान, गंजलेली विंटेज कार आणि कुठेही न जाणाऱ्या सिमेंटच्या पांढऱ्या पायऱ्या आहेत. पाण्याजवळ पोहण्यासाठी आत न जाण्याच्या सूचना आहेत, कारण त्यात मगरींचा धोका आहे.
 
नियोजित शॉपिंग मॉलमध्ये बहुतांश दुकानं आणि रेस्तरॉ बंदच आहेत. काही ठिकाणी तर फक्त बांधलेले रिकामे सांगाडे उभे आहेत. त्यात अतिवास्तव दाखवणारी एक लहान मुलांची ट्रेन आहे. ती ट्रेन जणू खेळतच सतत मॉलच्या बाजुंन चकरा मारत आहे.
 
पुढे, कंट्री गार्डनच्या शोरूममध्ये या शहराची भव्यता दाखवणारं एक संपूर्ण फॉरेस्ट सिटी कशी दिसेल याचं मॉडेल ठेवलेलं आहे. तिथं सेल्सच्या स्टॉलवर काही बोअरिंग दिसणारे कर्मचारी बसलेले आहेत. त्यांच्यावर फॉरेस्ट सिटीचं चिन्हं लावलेलं आहे. त्यावर "व्हेअर हॅपिनेस नेव्हर एंड्स" असं लिहिलेलं होतं.
 
यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा भाग ड्युटी फ्री आहे. बीचवर सगळीकडं स्थानिकांनी फेकलेल्या दारुच्या बाटल्यांचा ढीग दिसेल. त्यांचीच याठिकाणी जास्त वर्दळ असते.
 
रात्र की झाली फॉरेस्ट सिटी प्रचंड अंध:कारमय होते. याठिकाणी असलेल्या कॉम्पलेक्सच्या टॉवरमध्ये शेकडो अपार्टमेंट आहेत. पण पाच-सहापेक्षा जास्त अपार्टमेंटमध्ये लाइट सुरू नसतो. त्यामुळं इथं खरंच कोणी राहत असेल, यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे.
 
याठिकाणी राहणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक जोआना कौर मला भेटल्या, त्यावेळी "हे ठिकाण भयावह आहे," असं त्या म्हणाल्या. "अगदी दिवसाही तुम्ही दाराबाहेर पडता तेव्हा कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा असतो," असंही त्या म्हणाल्या.
 
त्या आणि त्यांचे पती 28 मजल्याच्या टॉवरमध्ये राहतात. ते याठिकाणचं सर्वात लहान टॉवर असून त्यांच्या फ्लोअरवर त्या एकट्याच राहतात. नाझ्मी यांच्या प्रमाणेच त्याही भाड्यानं राहतात, तसंच त्यांनीही लवकरच इथून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
"ज्या लोकांनी गुंतवणूक करून इथं घरं विकत घेतली त्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटतं. तुम्ही गुगलवर फॉरेस्ट सिटी पाहिल्यानंतर जे दिसतं ते आज प्रत्यक्षात इथं नाही," असं त्या म्हणाल्या.
 
विक्री होणं कठीण
संपूर्ण चीनमध्ये अशा प्रकारची निराशा पाहायला मिळत आहे. कारण इथं मालमत्ता व्यवसायात सध्या प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे.
 
विकासकांनी घेतलेल्या प्रचंड कर्जानंतर मोठा बुडबडा तयार होण्याची भीती वाटली त्यामुळं सरकारनं 2021 मध्ये कठोर निर्बंध लागू केले. "घरे राहण्यासाठी आहे, तो काही जुगार नाही," असा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा मंत्र होता.
 
सरकारच्या उपाययोजनांचा परिणाम म्हणजे, मोठ्या कंपन्यांकडं आता मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचा रोख पैसा उरलेला नाही.
 
ऑक्टोबरमध्ये कंट्री गार्डनला ऑस्ट्रेलियातून दोन प्रकल्प सोडण्यास भाग पाडण्यात आलं. त्यापैकी मेलबर्नमधील एक अपूर्ण प्रकल्प होता आणि दुसरा सिडनीमधील प्रकल्प होता.
 
फॉरेस्ट सिटीच्या सध्याच्या परिस्थितीसाठी काही स्थानिक राजकीय मुद्देही कारणीभूत आहेत. 2018 मध्ये मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान महाथीर मोहमद यांनी "विदेशींसाठी बनवलेलं शहर" यावर आक्षेप घेत चीनी ग्राहकांसाठी व्हिसावर निर्बंध घातले होते.
 
काही विश्लेषकांनी तर आर्थिक, राजकीय तसंच पर्यावरणासंबंधी अस्थिरता असलेल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू करण्याच्या योजनेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. मलेशियातील सध्याचं सरकार हे फॉरेस्ट सिटी प्रकल्पाला काही प्रमाणात समर्थन देत आहे. पण त्यामागे विक्री व्हावी हा दृष्टीकोन आहे. त्यामुळं ते किती काळ चालेल हे निश्चित नाही.
 
त्याचबरोबर कोव्हिडमुळं प्रवासावर आलेले निर्बंध, तसंच चीनी नागरिक परदेशात किती पैसे खर्च करू शकतात यावर निर्बंध अशा अप्रत्यक्ष मुद्द्यांमुळंही कंट्री गार्डनसारख्या मोठ्या कंपन्यांनी विदेशात सुरू केलेल्या प्रकल्पांना अडचणी निर्माण केल्या आहेत.
 
"मला वाटतं त्यांनी कदाचित खूप घाई आणि मोठं करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे मोठे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल याची खात्री करून घेणं, हा एक मोठा धडा आहे," असं KGV इंटरनॅशनल या प्रॉपर्टी कन्सल्टंटचे टॅन वी तियाम म्हणाले.
 
याच आठवड्यात जगातील सर्वाधिक कर्ज असलेली रियल इस्टेट कंपनी एव्हरग्रँडेला हाँगकाँग येथील कोर्टात सुनावणीचा सामना करावा लागला. शेवटी, चीनच्या या कंपनीला कर्जदारांची परतफेड करण्याच्या योजनेवर सहमतीसाठी सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आणि सुनावणी सातव्या वेळी पुढं ढकलण्यात आली.
 
कंट्री गार्डन मात्र वेगळं मत मांडत आहे. चीनच्या रियल इस्टेट मार्केटची सध्याची परिस्थिती हा केवळ गोंधळ असून, मलेशियातील त्यांचा व्यवसाय नेहमीप्रमाणं सुरळीत सुरू राहील, असं त्यांनी म्हटलं.
 
तसंच फॉरेस्ट सिटीचा मलेशिया आणि शेजारच्या सिंगापूरच्या सीमेवरील नवीन सेझमध्ये (स्पेशल इकॉनॉमिक झोन) मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं हा प्रकल्प सुरक्षित आणि स्थिर असल्याचं दिसून येतं, असंही त्यांनी म्हटलं.
 
पण पैशाशिवाय फॉरेस्ट सिटीसारखे मोठे प्रकल्प पूर्ण करून लोकांना तिथं राहण्यासाठी लवकरात लवकर आकर्षित कसं केलं जाईल, हे समजणं कठिण आहे. सध्या तरी चीननं तयार केलेल्या या मालमत्तांची विक्री करणं कठिण आहे.
 
"विकासकांना नेहमीप्रमाणं बांधकामासाठी पैसा उभा करण्यासाठी आगाऊ बुकींगवर अवलंबून राहावं लागतं. हा कोंबडी आणि अंड्यासारखा प्रकार आहे," असं REDD इंटेलिजन्स एशिया या संस्थेच्या इव्हलिन दुनुब्राता यांनी म्हटलं.
 
"पण घराच्या किल्ल्या हातात मिळणार आहेत की नाही, याची खात्री पटल्याशिवाय खरेदीदार मालमत्तांमध्ये पैसा गुंतवणार नाहीत."
 
महत्त्वाकांक्षा आणि वास्तव
चीनमधील रियल इस्टेट क्षेत्रातील संकटाचा विचार करता फॉरेस्ट सिटी हे महत्त्वाकांक्षा आणि वास्तव याचं एक उत्तम उदाहरण आहे. या परिस्थितीत काही स्थानिक मुद्द्यांनी भर घातली आहे. पण कुठेतरी हजारो अपार्टमेट बांधायचे, आणि त्याठिकाणी राहण्यासाठी लोकांना तयार करता येणं शक्य नाही.
 
त्यामुळं फॉरेस्ट सिटी आणि अशाप्रकारच्या चीनमधील शेकडो प्रकल्पांचं भवितव्य हे शेवटी चीन सरकारवरच अवलंबून आहे. गेल्या महिन्यात चीन सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार असलेल्या प्राथमिक यादीमध्ये कंट्री गार्डनचा समावेश करण्यात आला होता. पण अद्याप या मदतीची नेमकी व्याप्ती किती असेल हे स्पष्ट झालेलं नाही.
 
पण नाझ्मी यांच्यासारखे लोक इथं परत येण्याची शक्यताच नाही. "मी पुढच्यावेळी अधिक काळजीपूर्वक निर्णय घेईल. पण ही जागा सोडली याचा मला आनंद आहे. त्यामुळं मी आता पुन्हा पूर्वीप्रमाणे चांगलं जीवन जगत आहे," असं त्या म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jaya Bachchan Mother: अभिनेत्रीची आई रुग्णालयात दाखल