न्यूझीलंड हा देश म्हणजे बेटांचा एक समूह आहे. बेटांवर बरेच डोंगर आहेत. पॅसिफिक महासागरात वसलेला हा देश ऑस्ट्रेलियाचा शेजारी आहे. या दोन देशांमध्ये 1600 किलोमीटरचं अंतर आहे. न्यूझीलंडमध्ये 50 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत. 23 दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच या बेटांची निर्मिती झाली असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे न्यूझीलंड हा अनेक अर्थांनी वेगळा देश आहे. इथलं निसर्गसौंदर्य डोळ्यात भरण्यासारखं आहे असंच म्हणावं लागेल.
दक्षिण बेटावर या देशातील सर्वात मोठं 'माउंट कूक' हे शिखर आहे. वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी आहे तर न्यूझीलंड डॉलर हे इथलं चलन. न्यूझीलंडमधले 86 टक्के लोक शहरांमध्ये राहतात. ऑकलंड, ख्राईस्टचर्च ही इथली महत्त्वाची शहरं आहेत. रग्बी हा इथला लोकप्रिय खेळ आहे. इथे क्रिकेटलाही मोठी लोकप्रियता मिळाली आहे. न्यूझीलंडमध्ये लोकशाही आहे. इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. किवीफ्रूट, वाईन, बटर, लॅम्ब यांची निर्यात केली जाते. एके काळी न्यूझीलंडवर इंग्रजांचं राज्य होतं. 1947 मध्ये हा देश स्वतंत्र झाला.
महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा पहिला देश. 1893 मध्ये इथल्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. या सगळ्याबरोबरच हा दुर्गम भागातला एक देश आहे. त्यामुळे इथे विविध जाती-प्रजातींचे प्राणी पाहायला मिळतात. इतकंच नाही तर काही प्रजाती फक्त न्यूझीलंडमध्येच आढळतात. पण गेल्या एक हजार वर्षांमध्ये इथल्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रजाती नामशेष झाल्या आहेत. किवी हा इथला प्रमुख पक्षी आहे. मात्र आता इथल्या जंगलांमध्ये अवघे 75 हजार किवी पक्षी उरले आहेत. त्यांच्या जतनासाठी प्रयत्न होत आहेत.