Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे
, बुधवार, 19 मे 2021 (22:11 IST)
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबामध्ये 8 नोव्हेंबर 1919 ला झाला.यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे असे.
हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. पु.ल.भाई म्हणून त्यांचे टोपण नाव होते.
त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट,नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.ते हुरहुन्नरी प्रतिभाचे धनी होते.यांचे मराठी भाषेवर प्रभुत्त्व होते.ते फार हाज़िरजबाबी होते.त्यांचे शेकडो विनोदी किस्से आहे.
 
त्यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण घेतले नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले.साहित्याच्या क्षेत्रात येण्यापूर्वी काही काळ ते शाळेमध्ये शिक्षक होते.त्यांचा विवाह सुनीताबाई यांच्याशी झाला.
 
पु.ल. यांचे मराठी साहित्य आणि संगीतातील योगदानाव्यतिरिक्त आकाशवाणी,दूरदर्शन,नाट्य,आणि चित्रपट या क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. त्यांनी काही चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून देखील कार्य केले आहे. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे .त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा त्या कवितेला चाल लावली.तसेच प.भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इंद्रायणी काठी याला देखील पु.ल.यांनी चाल लावली आणि ते गाणे ही अजरामर झाले.
 
पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
 
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.
पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली.पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असे.
 
पु.लं.यांनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या. त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकते?मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवास वर्णना वरूनच कळते.त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देशाचे प्रवास केले. 
त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , व्यंग्यचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
 
याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अँड  द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद फारच  अप्रतिम आहे.
बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले.
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहो चे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
त्यांना पद्मश्री सन्मान,महाराष्ट्र भूषण पुरस्कार ,साहित्य अकादमी पुरस्कार ,महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार,मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
 
त्यांची साहित्य सम्पदा विनोदी साहित्य / लेखनसंग्रह
खोगीर भरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, अघळपघळ, पुरचुंडी, मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास, उरलं सुरलं अशी आहे.
 
नाटके व एकांकिका-
तुका म्हणे आता, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, राजा ओयदिपौस, एक झुंज वार्‍याशी (अनुवाद), ती फुलराणी (रुपांतर), मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला आला, आम्ही लटिके ना बोलू, वयं मोठं खोटं (बालनाट्य), नवे गोकुळ (बालनाट्य) असे काही नाटके आणि एकांकिका आहे.
*निवडक पु. ल.
पुढारी पाहिजे, एक शून्य, चित्रमय स्वगत, रेडियोवरील भाषणे व श्रुतिका (भाग एक व दोन) चार शब्द टेलिफोनचा जन्म दाद, रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, कोट्याधीश पु. ल., व्यक्ति आणि वल्ली
एकपात्री अभिनय -असा मी असा मी,बटाट्याची चाळ.
मुक्काम शांतिलेखन म्हणून पात्र लेखन केले.
रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.
गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी ही त्यांची व्यक्तिचित्रे आहेत. 
एका कोळियाने, काय वाट्टेल ते होईल, कान्होजी आंग्रे, स्वगत (जयप्रकाश नारायण), पोरवय हे त्यांनी अनुवाद केलेले संग्रह आहे. 
याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही पुलंच्या नावावर आहेत. 
पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट देखील आहे.
12 जून 2000 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी पुण्याच्या प्रयाग रुग्णालयात त्यांची प्राण ज्योती मालवली. 
महाराष्ट्राचा हुरहुन्नरी कलावन्त हरपला.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल, पटोले यांचा इशारा