Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार मिळण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार मिळण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?
, गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (10:02 IST)
रेहान फजल
आनियास गोनिया बोयाचे यांना तुम्ही ओळखता का? हे नाव कधी ऐकलं नाही असं तुम्ही म्हणाल. पण हे नाव जरी तुमच्या ओळखीचं नसलं तरी ती व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला ठाऊक आहे.
 
आनियास गोनिया बोयाचे हे मदर तेरेसांचं मूळ नाव आहे. अल्बेनियन-भारतीय वंशाच्या आनियास यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये उत्तर मॅसेडोनियातल्या स्कॉपिया या ठिकाणी झाला.
 
स्कॉपियात 18 वर्षं राहिल्यानंतर त्या आयर्लंडला गेल्या आणि तिथून भारतात आल्या. भारतालाच त्यांनी आपली कर्मभूमी मानलं आणि कोलकात्यातमधल्या गरीब, अनाथ आणि रुग्णांची सेवा करण्यात त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, असं बीबीसी मॅगजिनने केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हटलं आहे.
 
1950 मध्ये त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. कोलकात्यामधल्या अरुंद आणि अस्वच्छ गल्ल्यांनाच त्यांनी आपलं कार्यक्षेत्र मानून एचआयव्ही बाधित, कुष्ठरोगाने ग्रस्त झालेल्या आणि क्षयाने त्रस्त झालेल्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी ख्रिश्चन नन्सची फळी उभारली.
 
रस्त्यावर पडलेल्या रुग्णाला त्या आपल्या आश्रमात घेऊन जात, त्याला न्हाऊ घालत आणि जेऊ घालत. त्यांना त्यांच्या कार्यासाठी 1979 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या.
 
"मला तो क्षण लख्ख आठवतो जेव्हा कलकत्याच्या रस्त्यावर पडलेला पहिला रुग्ण आम्ही आश्रमात आणला. त्याच्या सर्वांगावर कृमी आणि कीटकं होती. त्याचा चेहरा वगळता पूर्ण अंग अस्वच्छ होतं. त्याची आम्ही काही दिवस देखभाल केली. मृत्यूपूर्वी त्याने एक वाक्य म्हटलं ते अजूनही माझ्या लक्षात आहे. तो म्हणाला, मी एखाद्या पशूसारखं जगलो पण आता मी एखाद्या देवदूताप्रमाणे मरत आहे.
 
"एवढं बोलून त्या माणसाने शेवटचा श्वास घेतला. त्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी हे जाणवलं की आपलीही कुणी देखभाल करू शकतं आपल्यावरही कुणी प्रेम करू शकतं. या भावनेनेच त्याचं आयुष्य सार्थक झालं. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवते आणि इतरांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करते," असं मदर तेरेसा यांनी सांगितलं होतं.
 
बीबीसी डॉक्युमेंटरीमध्ये त्या सांगतात "गेली 40 वर्षांत माझ्या मनात एकदाही संशयाची पाल चुकचुकली नाही. मला माहीत आहे मी जे काही केलं ते अगदी योग्य आहे कारण मी जे काही केलं ते ईश्वराच्याच मर्जीने केलं."
 
त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. व्हेटिकन सिटीमध्येही त्यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांच्यावर टीकादेखील होत असे.
 
बीबीसीने बनवलेल्या व्हू वॉज मदर तेरेसा या डॉक्युमेंट्रीत सांगितलं आहे की मदर तेरेसा यांनी गर्भनिरोधक साधनांबद्दल तसंच गर्भपातासंदर्भात घेतलेल्या भूमिकामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता.
 
5 सप्टेंबर 1997 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नावावर दोन चमत्कारांची नोंद असल्यामुळे 2016 मध्ये व्हॅटिकनने त्यांना संतपद बहाल करण्यात निर्णय घेण्यात आला. मदर तेरेसा यांनी जगभरात मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या साडेचार हजार नन्सचं जाळं उभं केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं कार्य सुरू राहिल्याचं म्हटलं जातं.
 
मदर तेरेसा यांचं भारतावर एवढं प्रेम का होतं?
 
नोबेल पुरस्कारासाठी मदर तेरेसांच्या नावाची शिफारस करणाऱ्यांमध्ये सर्वांत आघाडीवर होते जागतिक बँकेचे (वर्ल्ड बँक) अध्यक्ष रॉबर्ट मेक्नामारा.
 
जगभरातल्या देशांच्या सरकारांना गरिबी उच्चाटनासाठी वर्ल्ड बँक अब्जावधी डॉर्लसचं कर्जं देतं पण जगातल्या कोणत्याही विकास योजनेवर शेवटी मानवी संबंध आणि चिंता वरचढ ठरतात हे त्यांना माहीत होतं.
 
मेक्नामारा यांचं म्हणणं होतं, "मदर तेरेसांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा कारण त्या मानवी मर्यादांचं उल्लंघन न करता शांतता वाढवण्यावर विश्वास ठेवतात."
नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर विजेत्यांसाठी देण्यात येणारी मेजवानी रद्द करण्यात यावी अशी विनंती मदर तेरेसांनी केली होती. यामधून वाचवण्यात आलेला पैसा कोलकात्यामधल्या गरीबांच्या भल्यासाठी करण्यात यावा अशी त्यांची इच्छा होती.
 
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या गरिबांची शौचालयं स्वतःच्या हातांनी साफ करत आणि निळ्या काठाची त्यांची साडी स्वतः धुवून टाकत.
 
भारताचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी नवीन चावला यांनी मदर तेरेसांचं चरित्र लिहिलंय. 1975मध्ये ते दिल्लीचे उपराज्यपाल किशन चंद यांचे सचिव असताना मदर तेरेसांना पहिल्यांदा भेटले.
 
आपल्या एका संस्थेच्या उद्घाटनासाठी मदर तेरेसांनी उपराज्यपालांना आमंत्रित केलं होतं.
नवीन चावलांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मदर तेरेसांनी नेसलेली साडी अगदी स्वच्छ असली तरी ती फाटल्याचं दिसू नये म्हणून ठिकठिकाणी रफू करण्यात आली होती."
 
"मदरची साडी इतक्या ठिकाणी रफू का करण्यात आली आहे, असं मी एका सिस्टरला विचारलं. त्यांनी सांगितलं की स्वतःकडे फक्त तीन साड्याच बाळगण्याचा आमचा नियम आहे. एक साडी आम्ही नेसतो. एक धुतलेली असते आणि तिसरी साडी आम्ही खास गोष्टींसाठी ठेवतो. म्हणूनच मदरकडेही तीनच साड्या आहेत. म्हणजे ही गरिबी बंधनातून नाही तर स्वखुशीने स्वीकारण्यात आली होती."
 
'हात मिळवताच काहीतरी व्हायचं'
मदर तेरेसांना अगदी जवळून ओळखणारे सांगतात की त्यांच्या हँडशेकमध्ये अशी काही जादू होती की लोक त्यांच्याशी कायमचे जोडले जात.
 
भारताचे माजी डेव्हिस कप कॅप्टन आणि उद्योगपती नरेश कुमार यांच्या पत्नी सुनीता कुमार कोलकात्यात राहतात.
 
त्या मदर तेरेसांच्या सोबत 35 वर्षं होत्या आणि मदर तेरेसांच्या निधनापर्यंत त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या प्रवक्त्या म्हणून काम केलं.
 
मदर तेरेसांशी पहिल्यांदा ओळख कशी झाली, हे विचारल्यानंतर सुनीता कुमार सांगतात, "लग्नानंतर मला पहिलं बाळ झाल्यावर मला आणखी काहीतरी करावं असं वाटलं. मी एका महिला संघटनेची सदस्य झाले. तिथेच माझी मदर तेरेसांशी पहिल्यांदा भेट झाली. कुष्ठरोग्यांसाठीच्या औषधांचं कागदाने पॅकेजिंग कसं करायचं हे मदर आम्हाला शिकवत होत्या."
"माझी त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली तेव्हा हात मिळवल्यानंतर जे काही जाणवलं त्यामुळे मी कायमची त्यांच्यासोबत झाले. त्यांचं हस्तांदोलन अगदी मजबूत होतं. अनेकांनी मला असं सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मदरसोबत हस्तांदोलन केलं तेव्हा त्यांना काहीतरी वेगळंच जाणवलं."
 
1974 मध्येच मदर तेरेसांनी भारताचं नागरिकत्व घेतलं होतं आणि त्या अस्खलितपणे बंगाली भाषा बोलायच्या.
 
सुनीता कुमार सांगतात, "मदर यांना चार-पाच तासांपेक्षा जास्त झोप लागायची नाही. त्यांच्यात इतकी ऊर्जा कुठून यायची माहीत नाही. मी अगदी रात्री 12 वाजता फोन केला तरी त्या स्वतःच फोन उचलायच्या. घरीदेखील त्यांची राहणी अगदी साधी होती. त्यांच्याकडे ना सेक्रेटरी होता ना असिस्टंट."
 
सुनीता म्हणतात, "पहाटे साडेपाचला उठून त्या सकाळी साडेसातपर्यंत प्रार्थना करत. त्यानंतर न्याहारी करून त्या बाहेर पडत."
 
चांगली विनोदबुद्धी
इतकं गंभीर काम करत असून आणि आजुबाजूला दुःखी, चिंताग्रस्त लोक असूनही त्यांची विनोदबुद्धी अतिशय चांगली होती असं नवीन चावला सांगतात.
 
ते म्हणतात, "कितीही गंभीर परिस्थिती असली तरी त्या सहजपणे ती स्वीकारत. जेव्हा त्या एखाद्या सिस्टरची नेमणूक करत तेव्हा त्या सिस्टरकडे विनोदबुद्धी असावी अशीही एक अट असायची. त्या नेहमीच विनोद करत. जर एखादी गोष्ट खूपच गंमतीशीर असेल तर कमरेवर हात ठेवून हसताहसता त्यांची मुरकुंडी वळे."
नवीन चावला म्हणतात, "मी त्यांना विचारलंही होतं, की तुम्ही इतकं गंभीर स्वरूपाचं काम करता पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर हसू असतं, तुम्ही विनोद करता."
 
"त्या म्हणाल्या मी गरीबांकडे उदास चेहऱ्याने जाऊ शकत नाही. मला त्यांच्याकडे हसऱ्या चेहऱ्याने जायचं असतं."
 
मदर कायम हसऱ्या असायच्या हे खरं आहे. पण त्यांना कधी राग यायचा का?
 
सुनीता कुमार सांगतात, "अजिबात नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे की त्या गंभीर व्हायच्या पण कधी ओरडायच्या नाही. आपण जसे आपल्या मुलांना दटावतो, तसंही त्यांनी कधी केलं नाही."
 
"मी त्यांच्यासोबत 32 वर्षं होते. या काळात त्यांचा आवाज वाढलेलाही आम्हाला कधी ऐकू आला नाही."
 
जेव्हा रघू राय यांच्यावर नाराज झाल्या मदर टेरेसा
पण भारतातले प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांच्यानुसार एक क्षण असा आला होता जेव्हा मदर टेरेसा नाराज झाल्या, पण त्यांनी लगेचच आपल्या रागावर नियंत्रण मिळवलं.
रघू राय यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "मदर प्रेमळ होत्या, दयाळू होत्या. पण इतक्या कठोर होत्या की समोरच्याला घाम फुटायचा. एकदा स्टेट्समन वर्तमानपत्राचे डेस्मंड लॉएग आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. रघू राय तीन दिवस तुमचे फोटो काढतील असं डेस्मंड त्यांना सांगत होते."
 
"इतक्यात मी पाहिलं की दरवाज्यावरचा अर्धवट ओढण्यात आलेला पडदा उडत होता. पहिल्या मजल्यावर दोन सिस्टर्स हातात बायबल घेऊन प्रार्थना करत असल्याचं त्यातून दिसत होतं."
 
रघू राय यांनी मला सांगितलं, "मला वाटलं की मी जर खाली बसलो तर मला चांगला एँगल मिळेल. म्हणून मी मदर यांना न विचारता खाली बसलो आणि फोटो काढायला लागलो. मदर नाराज होऊन म्हणाल्या, "व्हॉट ऑन अर्थ आर यू डुईंग हियर?" (तू काय करत आहेस?) मी त्यांना म्हटलं मदर त्या सिस्टर्सकडे पहा. त्या अगदी एंजलसारख्या दिसत आहेत...मग त्या म्हणाल्या 'ऑल राईट'. म्हणजे जर तुम्ही ईमानदारी आणि बांधिलकीने एखादी गोष्ट केली तर त्या कायम तुम्हाला पाठिंबा द्यायच्या."
 
'पापाचा द्वेष करा, पाप करणाऱ्याचा नाही'
माणसाने पाप करणाऱ्याचा द्वेष न करता पापाचा द्वेष करावा, असं मदर तेरेसांचं म्हणणं होतं.
 
नवीन चावला एक हृदयद्रावक किस्सा सांगतात, "एकदा मी त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्यातल्या सर्वांत दुःखद प्रसंग कोणता? त्या म्हणाल्या, एकदा मी आणि एक सिस्टर कोलकात्यामध्ये रस्त्याने जात होतो. एका उतारावर मला एक क्षीण आवाज आला."
 
"मागे जाऊन पाहिलं तर तिथे एक महिला कचऱ्याच्या ढिगात पडलेली होती. तिच्या आजूबाजूला उंदीर आणि झुरळं फिरत होती. अगदी मरायला टेकली होती ती. मदरनी तिला उचललं आणि होम फॉर डाईंगमध्ये आणलं. त्यांनी तिला स्वच्छ केलं, तिची साडी बदलली आणि निर्जंतुक केलं. मदरनी तिला विचारलं, तुझी अशी अवस्था कोणी केली? त्या महिलेने सांगितलं - माझ्या मुलानेच केली."
नवीन सांगतात, "मदर यांनी त्या महिलेला सांगितलं की तू त्याला माफ कर कारण आता ही काही क्षणांची गोष्ट आहे. तुझा आत्मा देवाशी एकरूप होणार आहे. तू तुझ्या देवाची प्रार्थना कर. मी माझ्या देवाकडे प्रार्थना करीन. मनावर कोणतंही ओझं न ठेवता तू देवाकडे जा. ती महिला म्हणाली, मदर मी त्याला माफ करू शकत नाही. मी त्याच्यासाठी सर्वकाही केलं, त्याचं पालनपोषणं केलं, त्याला शिक्षण दिलं. शेवटी जेव्हा मी माझी संपत्ती त्याच्या नावे केली तेव्हा तो स्वतः मला इथे सोडून गेला."
 
"मदर यांनी पुन्हा सांगितलं. यानंतर काही वेळ ती महिला काहीच बोलली नाही. मग डोळे उघडत, हसत ती म्हणाली, मी त्याला माफ करते. इतकं बोलून तिने प्राण सोडला. ही घटना मला सांगताना मदरच्या चेहऱ्यावर दुःख तर होतंच, पण कोणीही व्यक्ती दुसऱ्यासोबत असं कसं वागू शकते, हे देखील त्यांना सांगायचं होतं."
 
'इट इज अ फर्स्ट क्लास मिरॅकल'
मदर तेरेसांना चमत्कार करताना पाहिल्याचं अनेकजण सांगतात.
 
नवीन चावलांचा चमत्कारांवर विश्वास नाही. पण त्यांनीही एकदा मदर यांना चमत्कार करताना पाहिलं आहे.
 
चावला सांगतात, "एकदा त्या रोमहून एअर इंडियाच्या विमानाने येत होत्या. त्यांनी मला विमानतळावर यायला सांगितलं होतं. त्यांचं विमान वीस-पंचवीस मिनिटं लेट होतं. उतरल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की त्यांना कोलकात्यासाठीची कनेक्टिंग फ्लाईट पकडायची आहे. त्याकाळी कोलकात्यासाठीचं एकच विमान संध्याकाळी असायचं."
ते म्हणतात, "मी म्हटलं की कोलकात्यासाठीच्या विमानाचं तर बोर्डिंग सुरू आहे. तुम्ही आज आश्रमात थांबा. उद्या सकाळी सहा वाजता तुम्हाला कोलकात्याला पाठवतो. मदर म्हणाल्या मी उद्यापर्यंत वाट पाहू शकत नाही. मी एका मुलासाठी एक औषध आणलेलं आहे. जर हे त्याला आज दिलं तर त्याचा जीव वाचेल. मला तर घामच फुटला... तिथे अनेक लोक त्यांची सही घ्यायला येत होते. आणि त्या प्रत्येकाला सांगत होत्या की काहीही करून तुम्ही मला कोलकात्याला पोहोचवा."
 
चावला म्हणतात, "कसं माहीत नाही पण ही गोष्ट कंट्रो टॉवरपर्यंत पोहोचली आणि तिथून पायलटलाही याबद्दल कळलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे कळल्यानंतर पायलटने निघालेलं विमान थांबवलं. मदर तेरेसांना गाडीत बसवून टारमॅकवर नेण्यास मला सांगण्यात आलं. मदरकडे सूटकेस नसायची. त्यांच्याकडे पुठ्ठ्याचे पाच-सहा खोके होते. एकात त्यांचे कपडे होते, बाकीच्यांमध्ये औषधं. मी सगळ्या गोष्टी गाडीत ठेवल्या. कुठून तरी एक जिना आला. मदर टेरेसा विमानात चढल्या आणि कोलकात्यासाठी रवाना झाल्या."
 
ते म्हणतात, "दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन करून त्या मुलाच्या तब्ब्येतीविषयी विचारलं. मदर तेरेसांचं उत्तर होतं, ते मूल बरं होतंय. इट इज अ फर्स्ट क्लास मिरॅकल."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित शाहांचा नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी फोन