Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 10 March 2025
webdunia

संत नामदेव महाराज

संत नामदेव महाराज
, बुधवार, 3 जुलै 2024 (10:30 IST)
Sant Namdev Maharaj भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात झाले होते. हे नामदेव संप्रदायचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचें आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असून महाराष्ट्रातील एक थोर संत असे. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. 
 
ह्यांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके 1192 (इ.स.1270)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला, रोहिणी नक्षत्रास, रविवारी हिंगोली जिल्ह्यातील नरसी- बामणी (नरसी नामदेव) गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गोणाई असे. ह्यांचे आडनाव रेळेकर होते. त्यांचे वडील शिंपी होते, ते कापडं शिवण्याचा व्यवसाय करीत होते. 
 
यांचा आधीच्या पिढ्यातील सर्व पुरुष यदुशेठ सात्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची भक्ती केली. ते मराठीभाषेतील सर्वात जुन्याकाळातील कवींपैकी एक होते. 
 
संत नामदेव हे विठ्ठलाचे सखा होते.त्यांचा कुटुंबात त्यांचा पत्नी राजाई, थोरली बहीण आऊबाई ,नारा, विठा,गोदा, महादा असे चार मुलं आणि एक मुलगी लिंबाई होती. त्यांचा कुटुंबात एकूण 15 माणसे होती. स्वतःला नाम्याची दासी म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांचा परिवारातील एक सदस्य होत्या.

संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर या संतांचा मेळा जमला असतांना संत ज्ञानेश्वरांच्या विनवणीला मान देऊन गोरोबाकाकांनी सर्वां बद्दल आध्यात्मिक तयारी विषयीचे आपले मत मांडले. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे गुरु म्हणून लाभले. 
 
त्यांच्यासंबंधी काही आख्यायिका अश्या आहेत की ते लहान असतांना त्यांचा वडिलांनी त्यांना सांगितले की 'आज देवाला आपण नैवेद्य दाखवावे. त्या दिवशी नामदेवाने नुसतं नैवेद्यच दाखविले नाही तर तिथेच वाट बघत राहिले की देव हे नैवेद्य कधी खाणार. त्यांचा निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांचा समोर प्रकट होऊन नामदेवांनी दिलेल्या प्रसादाचे(खीरीचे) भक्षण केले. 
 
एकदा कुत्र्याने त्याच्याकडून पोळी पळविली, त्याला ती पोळी कोरडी लागू नये त्यासाठी ते त्याचा मागे तुपाची वाटी घेउन पळाले. 
 
महाशिवरात्री निमित्ते संत नामदेव औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना भजन कीर्तन न करण्यास पुजाऱ्याने विनवणी केली. त्यांचा विनंतीला मान देऊन नामदेव देऊळाच्या बाजूस बसून नागनाथाला आळवू लागले, त्यांचा भक्तीला बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख केलेले देऊळ फिरवून पश्चिमाभिमुख केले. ते आजतागायत तसेच आहे. 
 
संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके 1272 मध्ये शनिवारी दिनांक 3 जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. त्यांच्या पुण्यतिथी विषयी एक वाक्यता दिसत नाही काही दिनदर्शिकेत पुण्यतिथी 24 जुलै अशी आढळते.
 
भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून त्यांनी 50 वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. संत नामदेवांची अभंगगाथा (सुमारे 2500) अभंग प्रसिद्ध आहे. त्यांनी काही हिंदी भाषेत देखील काही अभंग रचना सुमारे 125 पदे) केल्या. त्यामधील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजी की मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रन्थ साहिब मध्ये गुरुलीपी मध्ये लिहिले आहे. पंजाबमधील शीख बांधवाना ते आपले वाटतात. त्यांचे नामदेव बाबा म्हणून गुणगान करतात. घुमान मध्ये शीख बांधवानी त्यांचे देऊळ उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. 
 
यांच्या नावाने काही स्मारके देखील उभारण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात. पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे. पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे. पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद