मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये स्टार प्लस शो 'इमली'च्या शूटिंगदरम्यान विजेचा धक्का लागून एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला.महेंद्र यादव असे या कामगारांचे नाव असून ते गोरखपूरचे होते.
स्टार प्लस वरील मालिका इमलीच्या सेट वर मजुराला शॉक लागण्याची दुर्देवी घटना घडली या मध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. महेंद्र यांना या पूर्वी देखील सेटवर शॉक लागला होता. आता त्यांना पुन्हा 19 सप्टेंबर रोजी शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. या अपघाता नंतर मालिकेची शूटिंग थांबविण्यात आली.
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये अनेक अपघात होत आहेत. कधी आगीचा भडका उडतो, तर कधी बिबट्याचा हल्ला होतो, विजेचा धक्का लागून कामगारांना जीव गमवावा लागतो. अलीकडेच 'गम हैं किसी के प्यार के' या मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली होती.
मालिकांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेबाबत बोलले जात आहे, पण ना फिल्मसिटी प्रशासन या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत आहे ना शो आणि चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही आहेत.
महेंद्र यादव शूटिंगमध्ये लाईटमन म्हणून काम करायचे आणि त्याचे वय 28 वर्षे असल्याचे सांगितले जाते. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव गोरखपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे.