लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांची बारा कोटींच्या फ्लॅटसाठी स्वत:च्या मुलानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला. अभिनेत्री नीतू कोहलीयांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या 12 कोटींच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी सचिन कपूर या 43 वर्षीय मुलाने वीणा कपूर यांच्या डोक्यात बेसबॉल बॅटने मारा करुन त्यांना संपवले. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका रेफ्रिजरेटर बॉक्समध्ये लपवून मुंबईपासून 90 किमी अंतरावर असलेल्या माथेरानच्या जंगलात फेकून दिला. सचिन आणि वीणा कपूर यांच्यात मालमत्तेवरुन वाद होता. हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. दरम्यान, पोलिसांनी वीणा कपूर यांच्या मुलासह नोकर लालू कुमार मंडल यालाही अटक केली आहे.
नीतू कोहली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, वीणाजी तुम्ही यापेक्षा चांगलं डिजर्व्ह करत होतात. माझे हृदय तुटले आहे, तुमच्यासाठी ही पोस्ट करत आहे, काय सांगू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. मला आशा आहे की इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्ही शेवटी शांततेत आहात. जुहू येथील हा तो बंगला आहे जिथे ही दु:खद घटना घडली. या पॉश जुहू परिसरात एका व्यक्तीने आपल्या 74 वर्षीय आईची बेसबॉल बॅटने हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह माथेरानमध्ये फेकून दिला. पण त्यांच्या अमेरिकेतील दुसऱ्या मुलाला संशय आला आणि त्याने जुहू पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलीस चौकशीत सचिन यांनी आईची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. या घटनेने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor