Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय कुमारनं 'या' कारणामुळे सोडलं होतं भारतीय नागरिकत्व

akshay kumar
, बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (07:40 IST)
ANI
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा एकदा भारतीय नागरिकत्व घेतलं आहे. त्याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत माहिती दिली.
 
स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत अक्षय कुमारनं ही माहिती दिली.
 
कॅनडाचा नागरिक असण्यावरून अक्षय कुमारला बऱ्याचदा टीकेचा भडीमार सहन करावा लागलाय. मात्र, आता त्याने त्याचं नागरिकत्व प्रमाणपत्रच ट्विटरवर पोस्ट केलंय.
 
या ट्वीटसोबत अक्षय कुमारने एक संदेशदेखील लिहिलाय की, "दिल और सिटिझनशिप, दोनो हिंदुस्तानी."
 
यासोबत त्यानं चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात आणि 'जय हिंद' असं म्हटलंय.
 
कॅनडाचं नागरिकत्व नेमकं का घेतलं होतं?
अक्षय कुमारने मागे म्हटलं होतं की, नव्वदच्या दशकात एक काळ असा होता, जेव्हा त्याचं करिअर वाईट टप्प्यातून जात होतं.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्याकाळात त्याचे सलग 15 चित्रपट फ्लॉप झाले होते.
 
अक्षय कुमारने सांगितलं होतं की, त्यावेळी परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की त्याने कॅनडाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने मतदान केलं नाही आणि त्यानंतर त्याच्या नागरिकत्वावरून सोशल मीडियावर एकच गदारोळ निर्माण झाला होता.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारला एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत 24 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित झाली होती. ही 67 मिनिटांची मुलाखत देशातील बहुतांश वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली होती.
 
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदींना त्यांची दैनंदिन दिनचर्या, खाण्याच्या सवयी, आवडी-निवडी आणि लहानपणापासूनचे किस्से यावर प्रश्न विचारले होते.
 
अक्षय कुमारने ही मुलाखत अराजकीय असल्याचं सांगितलं होतं. यावर पंतप्रधानांनीही मुलाखतीदरम्यान आनंद व्यक्त करत निवडणुकीच्या काळात अराजकीय मुलाखत देत असल्याचा आनंद असल्याचं सांगितलं होतं.
 
ही मुलाखत सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये होती.
 
पण त्यावेळीही अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि असं म्हटलं जात होतं की, पंतप्रधान मोदींनी ही मुलाखत बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकाला दिली होती.
 
भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज
2019 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारने सार्वजनिकरित्या सांगितलं की त्याने भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
 
हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता की, त्याला आपले भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासेल असं कधीच वाटलं नव्हतं.
 
त्यानंतर अक्षय म्हणाला होता की, "14 चित्रपटांच्या अपयशानंतर, मला वाटलं की मला काहीतरी वेगळं करून पहावं लागेल. कॅनडामध्ये राहणाऱ्या माझ्या एका जवळच्या मित्राने मला तिथे यायला सांगितलं होतं. माझा मित्र म्हणाला होता की आपण काहीतरी एकत्र काम करू."
 
तोही एक भारतीय आहे आणि तो तिथेच राहत होता. मी कॅनडाचा पासपोर्ट घेतला होता कारण मला असं वाटलं होतं की माझं इथलं करिअर संपलं आहे. पण नंतर माझा 15 वा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. मी पुढे जात होतो पण मला कधीच वाटलं नाही की मी माझा पासपोर्ट बदलला पाहिजे."
 
नागरिकत्वावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्याने भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला.
 
अक्षयने त्याच कार्यक्रमात सांगितलं होतं की, "मी यासाठी अर्ज केला आहे, कारण मला वाटतं की लोकांनी याला एक मुद्दा बनवला आहे. त्यांना असं वाटतं की माझं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी मला माझा पासपोर्ट दाखवावा लागेल. या गोष्टीचा मला त्रास होतो. म्हणूनच मी कोणालाही संधी देऊ इच्छित नाही. त्यामुळेच मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.
 
माझी बायको भारतीय नागरिक आहे आणि माझा मुलगा देखील भारतीय आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण भारतीय आहे. मी येथे माझा कर भरतो. माझे जीवन इथेच आहे परंतु काही लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे असं दिसतंय."
 
अक्षय कुमारचं पूर्वायुष्य
9 सप्टेंबर 1967 रोजी एका काश्मिरी आई आणि पंजाबी वडिलांच्या पोटी जन्मलेल्या राजीव भाटियाला एकदा त्याच्या वडिलांनी खडसावलं होतं. त्यानंतर वडिलांना उत्तर देताना तो म्हणाला होता की मी शिकलो नाही तर चित्रपटात हिरो बनेन.
 
येणाऱ्या काळात राजीव भाटियाने अक्षय कुमार बनून ही गोष्ट खरी करून दाखवली होती. राजीवच्या वडील हरिओम भाटिया आधी सैन्यात होते त्यानंतर ते अकाउंटंटची नोकरी करत होते.
 
काही काळानंतर भाटिया कुटुंब दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झालं आणि राजीवला माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत दाखल करण्यात आलं.
 
राजीवला खेळाची आवड होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलाला कराटे खेळताना बघून त्यालाही कराटे शिकण्याची इच्छा झाली. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच राजीवने मार्शल आर्ट्स शिकण्यासाठी बँकॉकला पाठवण्याचा हट्ट त्याच्या वडिलांकडे केला आणि तो बँकॉकला गेलाही.
 
बँकॉकमध्येच त्याने मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. पाच वर्षांनी कोलकाता आणि ढाक्यात ट्रॅव्हल एजंट आणि हॉटेलमध्ये काम केल्यानंतर तरुण राजीव दिल्लीला पोहोचला. दरम्यान दिल्लीतल्या लाजपत राय मार्केटमधून दागिने खरेदी करून मुंबईत आणून विकण्याचं कामही त्याने केलं.
 
आणि असा झाला राजीव भाटियाचा अक्षय कुमार
ही सगळी कामं करत असताना राजीवचं मन मात्र नेहमी मार्शल आर्ट्सकडे आकर्षित व्हायचं. त्यामुळे मग मुंबईत लहान मुलांना मार्शल आर्ट्स शिकवण त्याने सुरु केलं आणि त्याकाळी या कामाचा मोबदला म्हणून त्याला दर महिन्याला फक्त चार हजार रुपये मिळायचे.
 
अक्षय कुमारने राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीनुसार, कोणाच्या तरी सल्ल्याने तरुण राजीव भाटियाने मॉडेलिंग सुरु केलं. त्यानंतर त्याच्या पहिल्या शूट साठी कुणीतरी तब्बल एकवीस हजारांचा चेक देऊ केला. या कामाच्या मोबदल्यात मिळालेला चेक त्याला आवडला, मात्र त्या चेकवर लिहिलेलं नाव मात्र त्याला आवडलं नाही. त्यानंतर राजीवने स्वतःच नाव बदलून अक्षय कुमार असं ठेवलं.
 
योगायोग असा की नाव बदलल्याचा दुसऱ्याच दिवशी अक्षय कुमारला एका चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका मिळाली. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव होतं 'सौगंध.'
 
याआधी 'आज' नावाच्या चित्रपटातही अक्षयने एक छोटी भूमिका साकारलेली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Independence Day 2023: भारतातील या मंदिरात दरवर्षी 15 ऑगस्टला तिरंगा फडकवतात