आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले, म्हणाला - "त्यामुळेच मला बँड तयार करून लाईव्ह परफॉर्म करायची प्रेरणा मिळाली!"
बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना याने नुकताच अमेरिकेतील पाच शहरांमध्ये - शिकागो, न्यूयॉर्क, सॅन जोस, न्यू जर्सी आणि डलास येथे आपला म्युझिक टूर पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी त्याच्या परफॉर्मन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनयासोबत संगीत ही त्यांची दुसरी आवड आहे, असे अनेकदा सांगणाऱ्या आयुष्मानने सांगितले की, त्यांच्या लाईव्ह सिंगिंग प्रवासाची सुरुवात कशी झाली.
आयुष्मानने खुलासा केला की त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्समागे अरिजीत सिंगचा मोठा वाटा आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या अभिनय कौशल्याबद्दल आत्मविश्वास बाळगला आणि गाणे फक्त चित्रपटांसाठीच योग्य आहे असे वाटले. हजारो लोकांसमोर स्टेजवर गाण्याचा विचारही कधी केला नव्हता. परंतु २०१३ साली डलासच्या दिवाळी मेळ्याच्या निमित्ताने अरिजीत सिंगमुळे माझ्या पहिल्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली. त्यावेळी अरिजीतने मला फोन करून परफॉर्म करण्याची विनंती केली. त्याला तातडीच्या कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, पण त्याचा बँड डलासला पोहोचला होता. आधी मी संकोच केला, पण अरिजीतची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा चाहता असल्यामुळे, मी शेवटी होकार दिला.”
पहिल्या अनुभवाबद्दल आयुष्मान म्हणाला , “जेव्हा मी कॉन्सर्टला पोहोचलो तेव्हा स्टेडियम लोकांनी खचाखच भरलेले होते, सुमारे पन्नास हजार लोक तिथे होते. माझ्यासाठी ही ड्राइंग रूम च्या गाण्यापासून थेट स्टेडियमपर्यंतची मोठी उडी होती. मी अरिजीतच्या टीमसोबत सुमारे १० गाणी सादर केली आणि प्रतिसाद खूपच चांगला होता. या अनुभवामुळे मला स्वतःचा बँड तयार करून लाईव्ह परफॉर्मन्स सुरू करायचा आहे हे समजले. याचे सर्व श्रेय अरिजीत सिंगला जाते.”
आयुष्मानच्या आगामी चित्रपटांमध्ये थामा (मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील) आणि धर्मा व सिख्या प्रोडक्शन्ससोबतचा एक अन टायटल प्रोजेक्ट समाविष्ट आहे.