Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदिपुरुष चित्रपटातील संवादामुळे नेपाळमध्ये वाद

aadipurush
, शुक्रवार, 16 जून 2023 (19:52 IST)
गनी अन्सारी
हिंदी चित्रपट आदिपुरुष आज (16 जून) सर्वत्र प्रदर्शित झाला. रामायणाचं चित्रीकरण आणि काही दृश्यांवरून यापूर्वीच चित्रपट वादात सापडला होता. या वादात आता आणखी एका वादाची भर पडली आहे.
 
आदिपुरुष चित्रपटात सीतेला भारत की बेटी संबोधण्यावरून शेजारी देश नेपाळमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
 
या संवादांवर काठमांडूच्या महापौरांनी आक्षेप घेतला असून तत्काळ तो हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
आदिपुरुषच्या निर्मात्यांनी हा संवाद चित्रपटातून हटवावा, अशी मागणी महापौर बालेंद्र शाह यांनी केली आहे.
 
यासाठी त्यांनी चित्रपट निर्मात्यांना तीन दिवसांची मुदत दिली असून इतर हिंदी चित्रपटांनाही त्यांनी इशारा दिला.
 
चित्रपट क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार नेपाळमध्ये या चित्रपटातून आक्षेप असलेला संवाद म्यूट करण्यात आलेला आहे.
 
महापौरांचा आक्षेप काय?
रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला सुरुवातीपासूनच राम, रावण यांच्यासह इतर पात्रांचं चित्रिकरण ज्या पद्धतीने करण्यात आलं, त्याला विरोध दर्शवण्यात येत होता.
 
पण, नेपाळमध्ये मात्र एका वेगळ्या वादाचा सामना या चित्रपटाला करावा लागत आहे.
 
चित्रपटातील एका संवादामध्ये सीतेला भारत की बेटी असं संबोधण्यात आलेलं आहे.
 
पण सीतेचा जन्म नेपाळच्या जनकपूरमध्ये झाल्याचा दावा नेपाळकडून केला जातो. यामुळेच नेपाळमध्ये या डायलॉगवरून वाद सुरू झाला.
 
बालेंद्र शाह म्हणाले, “आदिपुरुष चित्रपटात सीतेला भारत की बेटी संबोधल्याचा डायलॉग हटवला जात नाही, तोपर्यंत कोणताही हिंदी चित्रपट काठमांडूमध्ये चालवू दिला जाणार नाही.”
 
ही चूक सुधारण्यासाठी बालेंद्र शाह यांनी निर्मात्यांना 3 दिवसांची मुदत दिली आहे.
 
नेपाळच्या सेन्सॉर बोर्डने काय म्हटलं?
नेपाळच्या सेन्सॉर बोर्डाकडूनही या प्रकरणी आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
 
जगातील इतर कोणत्याही देशांप्रमाणेच नेपाळमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड ते पाहतो. त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास ते हटवण्याची सूचना निर्मात्यांकडे केली जाते.
 
नेपाळच्या सेन्सॉर बोर्डचे सदस्य ऋषिराज आचार्य म्हणाले, “आम्ही बुधवारी चित्रपट पाहिला. त्यावेळी आम्ही वितरकांना सांगितलं की डायलॉग हटवल्यानंतरच आम्ही त्याच्या स्क्रिनिंगसाठी परवानगी देऊ शकतो.”
 
नेपाळमध्ये चित्रपटातून हा डायलॉग कापण्यात आल्याचं आचार्य यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, “आम्ही नेपाळमध्ये दाखवण्यात येत असलेल्या शोमधून तो भाग वगळला आहे. पण सर्वच आवृत्तींमधून हा भाग वगळण्यात आला पाहिजे.
 
नेपाळ चित्रपट विकास बोर्डाचाही आक्षेप
नेपाळच्या चित्रपट विकास बोर्डानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचं दिसून येतं.
 
हा चित्रपट नेपाळसह इतर अनेक देशांमध्ये तथ्यात्मक त्रुटींसोबत दाखवण्यात आला, असं त्यांनी म्हटलं.
 
बोर्डाचे अध्यक्ष भुवन केसी यांनी शुक्रवारी याबाबत म्हटलं, “नेपाळमधील एका ऐतिहासिक पात्रासोबत छेडछाड करण्यात आली. आम्ही या संवादांवरून कठोर आक्षेप घेत आहोत.”
 
चित्रपटातील दृश्य दुरुस्त केल्यानंतरच त्याला हिरवा सिग्नल देण्यात आल्याचं बोर्डाने सांगितलं.
 
नेपाळच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही या चित्रपटातील वादग्रस्त संवाद हटवण्याची मागणी केली आहे.
 
नेपाळ फिल्म असोसिएशनचं म्हणणं काय?
नेपाळच्या फिल्म असोसिएशनचे उपाध्यक्ष भास्कर धुनगना यांनी म्हटलं, “महापौर बालेंद्र शाह यांच्या इशाऱ्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून अनेक धमक्या मिळाल्या.
 
सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही थिएटर मालकांना सकाळी हा चित्रपट चालवू नका, असं सांगितलं आहे.
 
काठमांडूशिवाय नेपाळमध्ये इतरत्र हा चित्रपट योग्य पद्धतीने सुरू आहे. वादग्रस्त संवाद हटवल्यानंतर मी आणि इतरांनीही वाद करण्याची गरज नाही. सेन्सॉर बोर्डने आधीपासूनच त्याला परवानगी दिलेली आहे.
 
त्यांनी याचं उदारण देताना दुसऱ्या एका चित्रपटाचाही उल्लेख केला.
 
अक्षय कुमारच्या चांदनी चौक टू चायना चित्रपटात भगवान बुद्धांबाबत वादग्रस्त माहिती चित्रपटात सांगण्यात आली होती.
 
त्याला नेपाळमध्ये विरोध झाल्यानंतर तो संवाद कापून त्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी पांडवांनी येथे मां कालीकडे मागितला आशीर्वाद! आजही तिथे भव्य मंदिर आहे