सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज रविवार,19 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या सर्वात मोठ्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी संजय गढवी यांना मृत घोषित केले.
'धूम' या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गडवी यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांचे या जगातून जाणे बॉलीवूडचे मोठे नुकसान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय गढवी यांना त्यांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान हृदयविकाराचा झटका आला, ते ज्या ठिकाणी फिरायला गेले होते तेथून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे अंतर फक्त एक ते दीड किलोमीटर होते. दिग्दर्शक संजय गढवी यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे.
19 नोव्हेंबरच्या रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नामवंत व्यक्ती सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ते लोखंडवाला अंधेरी पश्चिम येथील ग्रीन एकर सोसायटीत राहत होते. नुकतेच संजय गढवी यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.
संजय गढवी यांनी 'धूम' आणि 'धूम 2' दिग्दर्शित केले होते. त्यांनी 'तेरे लिए', 'किडनॅप', 'मेरे यार की शादी है', 'ऑपरेशन परिंदे' आणि 'अजब गजब लव्ह' यांसारख्या शानदार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.