टीव्हीचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' चे निर्माते अडचणीत सापडले आहेत. या शोच्या विरोधात मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात FIR दाखल करण्यात आली आहे. या शोच्या एका एपिसोडविरोधात तक्रार करण्यात आली आहे ज्यात कलाकारांना कोर्टरूमचे दृश्य करताना स्टेजवर मद्यपान करताना दाखवले आहे. शोमध्ये अभिनेत्यांनी न्यायालयाचा अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शिवपुरी येथील एका वकिलाने सीजेएम कोर्टात ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आपल्या तक्रारीत वकील म्हणाले, "सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा द कपिल शर्मा शो अत्यंत बेकार असून त्यात महिलांवर अपमानास्पद शेरे मारले जातात. एका एपिसोडमध्ये, स्टेजवर एक कोर्टरूम उभारण्यात आले होते आणि असे दिसून आले होते की कलाकार सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करत होते. हा न्यायालयाचा अवमान आहे. म्हणून, मी न्यायालयात कलम 365/3 अंतर्गत दोषींवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करतो.
ज्या एपिसोडविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, 'द कपिल शर्मा शो' मध्ये तो एपिसोड 19 जानेवारी 2020 रोजी प्रसारित झाला. नंतर त्याचे पुनरावृत्ती प्रसारण 24 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले. वकिलांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की शोमधील कलाकारांना मद्यधुंद कोर्टरूममध्ये काम करताना दाखवण्यात आले होते ज्यात न्यायालयाचा अवमान झाला आहे.
कॉमेडियन कपिल शर्माच्या या शोमध्ये त्याच्याशिवाय सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी, किकू शारदा आणि अर्चना सिंग सारखे कलाकार दिसतात. शोचा नवीन सीझन 21 ऑगस्टपासून प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे.