Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जवान, पठाण आणि गदर : 2023 मध्ये शाहरुख, सनीच्या चित्रपटांनी थिएटरचं ग्लॅमर परत आणलं

जवान, पठाण आणि गदर : 2023 मध्ये शाहरुख, सनीच्या चित्रपटांनी थिएटरचं ग्लॅमर परत आणलं
, मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (17:16 IST)
2023 वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास होतं. 90 च्या दशकातील हिरो शाहरुख आणि सनी यांची बॉक्स ऑफिसवर धूम होती.बॉलिवूडसाठी या वर्षाची चांगली सुरुवात 'पठाण' चित्रपटाने झाली.
 
"जो पत्ते मिलते हैं उन्हीं से बाज़ी खेलनी पड़ती है, और इस बाज़ी में सारे इक्के मेरे हाथ में हैं".
 
जॉन अब्राहम आणि शाहरुख खान यांच्या पठाण चित्रपटातील या डायलॉगवर सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू आल्या, आणि यासोबतच जुना 'बाजीगर' शाहरुख खान याने धमाकेदार पुनरागमन केलं.
 
'पठाण' हा चित्रपट 2023 च्या सुरुवातीला 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. 2023 मध्ये मोठ्या बजेटच्या मेगा चित्रपटांनी सिनेमागृहांचे ग्लॅमर परत आणलं असताना, अनेक छोट्या चित्रपटांनी मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. बॉलिवूड 2023 वर एक नजर.
 
90 च्या दशकातील हिरो... शाहरुख, सनी, सलमान
हे वर्ष बॉलिवूडमध्ये शाहरुखचे वर्ष म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. ज्याप्रमाणे शाहरुखने 1993 मध्ये बाजीगरमध्ये अँटी-हिरो बनून लोकांना आश्चर्यचकित केलं, त्याचप्रमाणे 2023 मध्ये शाहरुखला अॅक्शन-सुपरस्टार म्हणून पाहून लोक थक्क झाले.
 
जवान आणि पठाण अशा वेळी आला जेव्हा शाहरुखचे 'झिरो'सारखा चित्रपट अयशस्वी झाला होता आणि त्याचा मुलगा आर्यन खान तुरुंगातून परतला होता.
 
पठाण आणि जवान या चित्रपटांबद्दल समीक्षकांची संमिश्र मते होती, पण कमाईच्या बाबतीत शाहरुखने स्वतःचेच रेकॉर्ड तोडले.
 
एक तमिळ दिग्दर्शक आणि हिंदी चित्रपटांचा सुपरस्टार या दोघांनी मिळून 'जवान'च्या रूपात एक संपूर्ण भारतीय चित्रपट दिला.
 
काही दर्शकांनी 'जवान'चं वर्णन 'मसाला' मनोरंजन करणारा म्हणून केलं तर काहींनी या चित्रपटातून सामाजिक आणि राजकीय अर्थ काढले.
 
उदाहरणार्थ, शाहरुख खान 'जवान'मध्ये म्हणतो की, " बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.." तेव्हा लोकांना त्यात राजकीय बारकावे दिसले.
 
2023 हे वर्ष केवळ शाहरुखसाठी खूप यशस्वी ठरलं नाही तर तो त्याच्या 'किंग ऑफ रोमान्स'च्या पलीकडे स्वतःला अॅक्शन हिरोच्या नव्या भूमिकेमध्ये सादर करु शकला. आणि बॉलीवूडला अॅटलीच्या सिनेमाची ओळख झाली
 
शाहरुख खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'डंकी'ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.
 
'डंकी'बद्दल म्हणायचं झालं तर भावना, प्रणय आणि संघर्ष यांचं परिपूर्ण मिश्रण आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे.
 
2023 मध्ये आणखी एक खास गोष्ट म्हणजे 90 च्या दशकातील अनेक बड्या नायकांनी दाखवून दिलं की अजूनही त्यांचं नाणं खणखणीत आहे, मग ते सलमान खानचा 'टायगर जिंदा है'... असो किंवा सनी देओलच्या 'गदर' चित्रपटाचं यश.
 
मेनस्ट्रीम सिनेमा, टॅबू टॉपिक
कमर्शियल सिनेमात टॅबू टॉपिक (वर्जित मानले जाणारे मुद्दे) मांडणं हे नेहमीच जोखमीचं असतं. 2023 मध्ये पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार यांनी हा धोका पत्करला.
 
जेव्हा त्यांनी ओएमजी-2 चित्रपटात मुलांमधील लैंगिक शिक्षणाचा विषय मांडला. मुलांना शाळांमध्ये लैंगिकतेबद्दल का शिकवले पाहिजे. प्रेक्षकांना अस्वस्थ न करता 'मास्टरबेशन' सारखे शब्द सादर करणं हे एक अवघड काम होतं. पण अमित राय आणि अभिनेता पंकज त्रिपाठी या दिग्दर्शकांनी साध्यासरळ अभिनयानं हे अवघड काम पूर्ण केलं.
 
अनेक दिवसांपासून फ्लॉप चित्रपटांना सामोर जाणाऱ्या अक्षयनं या मध्ये साईड रोल साकारला आहे तर छोट्या भूमिका करणाऱ्या पंकजनं सातत्यानं मोठ्या स्टार्सच्या बरोबरीने स्वत:ला स्थान मिळवून दिलं आहे. 2023 मध्ये 'मिमी' या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
 
इंडियन एक्स्प्रेसमध्ये चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी लिहिलं की, "खूप दिवसांनी असं घडलं आहे की, अक्षय कुमारच्या अॅक्टिंगला मी खूप एन्जॉय केलं . आणि ओएमजी -2 ने मला आश्चर्यचकित केलं."
 
अॅनिमल- सुपरहिट फिल्म की टॉक्सिक हीरो
ज्या चित्रपटाची बहुधा सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे अॅनिमल. दिग्दर्शक संदीप वेंगा रेड्डी यांचा चार वर्षांपूर्वी आलेल्या 'कबीर सिंह'मुळे जी चर्चा सुरु झाली, अॅनिमल चित्रपटा हा प्रेक्षकांना पुन्हा त्याच वळणावर आणून ठेवतो.
 
अ‍ॅनिमल हा एक मोठा नायक असलेला यशस्वी व्यावसायिक चित्रपट, काहींनी पूर्ण पैसा वसूल म्हणून तर काहींनी 'टॉक्सिक' विचारसरणी असलेल्या 'अल्फा मेल'ला (अरेरावी करणारा पुरुष ) प्रोत्साहन देणारा चित्रपट मानला.
 
ज्येष्ठ समीक्षक नसिरुद्दीन म्हणतात, " हा चित्रपट वैचारीक पातळीवर धोकादायक वाटतो. हे निव्वळ मनोरंजन वाटत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो हिंसक,निडर, अरेरावी करणाऱ्या पुरुषत्वाला प्रोत्साहन देतो."
 
पण हे नाकारता येणार नाही की अॅनिमल हा अतिशय यशस्वी चित्रपट आहे जो स्त्री आणि पुरुष दोघांनाही आवडला होता.
 
फर्स्टपोस्टच्या मथळ्यावरून या चित्रपटाबाबत समीक्षकाची झालेली अडचण समजून येते - यात म्हटलंय
 
" Animal' is a disturbing film that is also one of the best to come out of Bombay cinema in over two decades" (अ‍ॅनिमल’ हा एक अस्वस्थ करणारा चित्रपट आहे, पण तो दोन दशकांहून अधिक काळ बॉम्बे सिनेमातून बाहेर आलेला सर्वोत्तम चित्रपटापैकी एक आहे.)
 
रॉकी, रानी.... आणि करण जोहरची कथा
 
करण जोहर यांच्या चित्रपटांचे जितके चाहते आहेत तितके टीकाकार ही आहेत. बरेच लोक त्यांच्या चित्रपटांचं वर्णन प्रणय, सुंदर विदेशी लोकेशन्स आणि डिझायनर कपड्यांपुरते मर्यादित करतात.
 
'रॉकी और रानी'च्या प्रेमकथेमध्ये करण जोहरचे जुने ट्रेडमार्क आणि रूढीवादी घटक आहेत. पण गदर आणि पठाणमधील अ‍ॅक्शन सिन पाहता या चित्रपटाने रोमँटिक मनोरंजन मोठ्या पडद्यावर पुन्हा आणलं.
 
त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा हा थोडा गहन आणि निडर आहे. यात गुची परिधान केलेला मॅचो हिरो रणवीर सिंह याला स्त्रीपण साकारताना दाखवलंय, कारण तो 'डोला रे डोला' गाण्यावर त्याच्या होणार्‍या सासऱ्यांसोबत कथक करतो आणि महिलांसारखे कपडे परिधान करुन नाचताना त्याला लाज वाटत नाही.
 
पुरुष नर्तकांना 'नाचे' म्हणणाऱ्या त्याच्या वडिलांच्या हे विरुद्ध. कमालीचा पुरुषीपणा असलेल्या नायकाच्या प्रतिमेच्या पलीकडे करण जोहर हा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो.
 
आलिया शिफॉनच्या साडीत आणि बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये धावताना दिसतेय पण अस असलं तरी या नायिकेला स्वत:साठी कसं लढायचं हे माहीत आहे.
 
चित्रपट समीक्षक नम्रता जोशीने 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'मधील तिच्या फिल्म रिव्ह्यूमध्ये लिहिलं आहे की, करण जोहरने जुन्या बाटलीत नवीन वाईन सर्व्ह केली आहे. ( Rocky Aur Rani Ki Prem Kahani: New wine in an old bottle)
 
छोटा चित्रपट, मोठं काम
एका छोट्या शहरातील आमदार साहेबांच्या बागेतून एक फणस (कटहल) चोरीला जातो आणि मग संपूर्ण पोलीस दल त्या फणसाचा शोध घेण्यास सुरुवात करतं. पण 'कटहल' हा विनोदी चित्रपट अतिशय चतुराईने जात आणि लिंग यावर भाष्य करतो.
 
तपास पथकातील हेड कॉन्स्टेबल (सान्या मल्होत्रा) एक महिला आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून ती देखील खालच्या जातीची आहे.
 
चतुरस्त्र व्यंग म्हणून यशोवर्धन मिश्रा, गुनीत मोंगा आणि एकता कपूर यांच्या छोट्या पण प्रभावी चित्रपटांचे एक उदाहरण आहे.
 
असाच एक चित्रपट होता विधू विनोद चोप्रा '12th फेल' ज्यामध्ये विक्रांत मेसी याने खऱ्या आयुष्यातील आयपीएसची भूमिका जवळून साकारली आहे.
 
'ओटीटी'वर गुलमोहर
सिनेमागृहा व्यतिरिक्त ओटीटी हे मनोरंजनाचे प्रमुख साधन बनलं आहे. 2023 मध्ये ओटीटीवरील अनेक चित्रपट आणि मालिकांनी त्यांच्या अनोख्या आणि बोल्ड विषयांनी आश्चर्यचकित केलं, जसं 'गुलमोहर' चित्रपट.
 
मोठ्या सुंदर गुलमोहराच्या झाडासारखं मोठं सुखी कुटुंब. पण पानगळीच्या काळातील झाडाच्या पानागळतीप्रमाणे त्या कुटुंबातील नातीही तुटत आहेत.
 
शर्मिला टागोर, मनोज वाजपेयी, अमोल पालेकर यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेला हा ओटीटी चित्रपट पाहणं ही अनेकांसाठी एक सुंदर भावना होती, विशेषत: शर्मिला टागोर यांना दीर्घ काळानंतर एका सशक्त आणि मुख्य भूमिकेत पाहणं. केवळ गुलमोहरच नाही तर मनोज वाजपेयी याच्या 'एक ही बंदा काफी है' या चित्रपटाचंही ओटीटीवर खूप कौतुक झालं.
मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करीना कपूरला लोकांनी प्रथमच ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'जानेजान' या चित्रपटात पाहिलं.
 
जयदीप अहलावत, करीना आणि विजय वर्मा यांच्यात अभिनयात एकमेकांना मागे टाकण्याची जणू स्पर्धाच लागली होती. रहस्यकथा प्रकारावर सुजॉय घोष यांची पकड नेहमीसारखीच मजबूत होती.
 
लैंगिकतेचा शोध घेणारी लस्ट स्टोरीज-2 ही वेब सिरीज, त्याबद्दलही खूप चर्चा झाली. विशेषत: कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथा, जिथे ती घरात काम करणाऱ्या बाईच्या दृष्टीकोनातून सांगितली जाते.महिला दिग्दर्शकांचे चित्रपट तुलनेने क्वचितच पाहायला मिळतात.
 
झोया अख्तर निर्मित नेटफ्लिक्सवरील 'द आर्चीज'ने वर्षाचा शेवट झाला. आणि ज्यामध्ये नव्या पिढीच्या खुशी कपूर, अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, डॉट आणि सुहाना खान यांच्या भूमिका आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टसारख्या 'स्टार किड्स'चं यश आणि 'नेपोटिझ्म'च्या (घराणेशाही) वादात आता नव्या वर्षात नव्या कलाकारांची कसोटी असेल.
 
2023 च्या गुगल ट्रेंड्सबद्दल बोलायचे तर, सर्वात जास्त गुगल सर्च करण्यात आलेली भारतीय सेलिब्रिटी कियारा अडवाणी ठरली.
 
यु-ट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव पाचव्या स्थानावर राहिला. रेव्ह पार्टीत सापाचे विष दिल्याबद्दल त्याच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला.
 
'अलविदा'
2023 मध्ये प्रसिद्ध टीव्ही मालिका फ्रेंड्स मधील अभिनेता मॅथ्यू पेरी यांच्या आकस्मिक मृत्यूनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांनीही जगाचा निरोप घेतला.
 
कॅलेंडर, पप्पू पेजर, मुत्तुस्वामी, चंदा मामा किंवा कुंजबिहारी अशी मनोरंजक पात्रं साकारणारे सतीश कौशिक आणि त्यांचे अनोखे संवाद आजही चेहऱ्यावर हास्य आणतात. उदाहरणार्थ, दीवाना मस्तानाचा 'ए टमाटर के आखरी दाने' आणि दूध के फटेले हिस्से, किंवा 'साजन चले ससुराल'चा डायलॉग - 'हमारा फादर नॉर्थ इंडियन, हमारा मदर साउथ इंडियन इसलिए हम कम्पलीट इंडियन.'
 
भारतातील टॉप 5 गुगल सर्च केलेले चित्रपट
जवान
गदर-2
ओपनहायमर
आदिपुरुष
पठान
भारतातील टॉप 5 सर्च केलेले शो
फर्जी
वेनस्डे
असुर
राणा नायडू
'द लास्ट ऑफ अस'
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिपाशाची 1 वर्षाची मुलगी कशी दिसते बघा