Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं होतं?

Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं होतं?
, मंगळवार, 15 जून 2021 (17:06 IST)
मधू पाल
2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक समजला जातो. आमिर खानने साकारलेलं 'भुवन' हे पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 20 वर्षं होऊन गेलेत.पण फार कमी लोकांना माहिती असेल की, आशुतोष गोवारीकर यांनी हा चित्रपट लिहिला नसता तर आमिर खान कधीच चित्रपट निर्माते झाले नसते.
 
आशुतोष यांनी आमिर खान यांना पहिल्यांदा या चित्रपटाची कथा ऐकवली होती, तेव्हा त्यांना ती अजिबात आवडली नव्हती.आशुतोषने यावर पुढे काम करू नये, असंच आमिरचं म्हणणं होतं. पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरलाच. पण त्याला ऑस्कर नॉमिनेशनही मिळालं. पण या चित्रपटाला ऑस्कर मिळाला नाही.
 
'या स्क्रिप्टसाठी तू तीन महिने वाया घालवलेस'
'लगान' चित्रपट रिलीज होऊन 20 वर्षं झाल्याच्या निमित्ताने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खाननी त्यावेळेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 
त्यांनी म्हटलं की, "जेव्हा लगानची कथा आशुतोषने पहिल्यांदा ऐकवली तेव्हा मोजून दोन मिनिटात सांगितलं की - एक गाव आहे, तिथे पाऊस पडत नाही. त्यामुळे तिथले लोक शेतसारा भरू शकत नाहीत. त्यामुळे आपला शेतसारा माफ करण्यासाठी ते लोक पैज लावतात आणि क्रिकेट खेळतात. मला ही आयडिया भंगार वाटली. मी आशुतोषला म्हटलं काहीही काय सांगतोस? लोक 1893 मध्ये क्रिकेट काय खेळतात आणि शेतसारा काय माफ करवून घेतात. मी म्हटलं मला हे पचनी पडलेलं नाही."
पुढे आमिर म्हणतात, "मी आशुतोषला समजावलं आणि म्हटलं की तुझे याआधीचे दोन चित्रपट चाललेले नाहीत. तू आधी धड काम काम कर. माझं बोलण ऐकून तो थोडा निराश झाला आणि म्हणाला ठीक आहे. त्यानंतर तीन महिने तो गायब झाला."
आमिर म्हणतात, "तीन महिन्यांनी त्याने मला फोन केला आणि मला म्हणाला की मी एक स्क्रिप्ट ऐकवू इच्छितो. मला संशय होता की तो हीच क्रिकेटची कथा सांगेल. मी म्हटलं ऐकव तर म्हणाला भेटून ऐकवेन. मी म्हटलं मला नाही ऐकायची. मी तुला सांगितलं होतं की भंगार कथा आहे तरीही त्यामागे तू 3 महिने घालवलेस."
 
'गुरुदत्त, के आसिफ, व्ही शांतारामच्या आठवणीने दूर झाली भीती'
आशुतोष आमिर यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या हट्टापायी मी स्क्रिप्ट ऐकली असं आमिर म्हणतात.
"यावेळी त्याने पूर्ण तपशीलांसह स्क्रीप्ट ऐकवली आणि मी दंग झालो. मी ती कथा ऐकताना रडत होतो, हसत होतो. मी त्याला म्हटलं हा खूप महागडा चित्रपट ठरेल, पण याला बनवणार कोण? मी तर अभिनेता आहे निर्माता नाही. तुझा बाजी चित्रपटही चालला नाही. मग या चित्रपटासाठी कोण पैसे लावेल? तू आधी असा निर्माता शोध जो यावर पैसे लावेल मगच मी या चित्रपटात काम करेन. पण निर्मात्याला सांगू नको की मी या चित्रपटात आहे. माझी इच्छा आहे की निर्मात्याने या चित्रपटाची कथा ऐकून हो म्हणावं, फक्त मी या चित्रपटात आहे म्हणून नाही."
 
आमिर म्हणतात की त्यांनी आशुतोष गोवारीकरांना स्पष्ट सांगितलं होतं की माझी वाट पाहू नका. दुसरा कोणी तयार असेल तर त्याला घेऊन चित्रपट बनव.ते म्हणतात, "यानंतर आशुतोषने सगळ्या इंडस्ट्रीमधल्या निर्माते-अभिनेत्यांना ही कथा ऐकवली. पण कोणालाही समजली नाही. मला कथा तर आवडली होती त्यामुळे मी अधूनमधून याबद्दलचे अपडेट घ्यायचो.
 
दर सहा महिन्यांनी ही कथा ऐकायचो. मी तीनदा या चित्रपटाची पूर्ण कथा ऐकली, प्रत्येक वेळेस कथेचं कौतुक केलं पण या चित्रपट बनवण्याची हिंमत झाली नाही. मग एक दिवस मी विचार केला की मी का हा चित्रपट बनवायला घाबरतोय? माझ्या जागी जर गुरुदत्त, व्ही शांताराम, के आसिफ किंवा विमल रॉय असते तर ते हा चित्रपट बनवायला कचरले असते का?"
 
आमिर म्हणतात, "मी स्वतःला म्हटलं की मला त्यांच्यासारखं बनायचं असेल, ते माझे हिरो असतील तर मला त्यांच्यासारखी हिंमत दाखवावी लागले. त्यांच्या आयुष्यात पण अडचणी आल्या असतील पण त्यांनी करून दाखवलं. तिथून मलाही प्रेरणा मिळाली. मी विचार केला की जर मला या चित्रपटात अभिनय करायचा असेल तर मलाच याची निर्मिती करावी लागेल."
 
'कधीच निर्माता बनू इच्छित नव्हतो'
आमिर खान यांचे वडील ताहिर हुसेन लेखक आणि चित्रपट निर्माते होते. आमिर यांनी आपल्या वडिलांचा संघर्ष जवळून पाहिला होता.ते म्हणतात, "माझी निर्माता बनण्याची इच्छा नव्हती कारण मी माझ्या वडिलांचे हाल पाहिले होते.""पण मला हे माहिती होतं की जर मला चित्रपटात अभिनय करायचा असेल तर मला स्वतःला त्याची निर्मिती करावी लागेल. तेव्हा मी अम्मी-अब्बा, आणि पत्नी रीनाला याची स्क्रिप्ट ऐकवली. मी आधी असं कधी केलं नव्हतं. जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा त्यांना फार आवडली. पण अब्बांच्या लक्षात आलं की हा फारच महागडा चित्रपट ठरणार आहे. पण ते म्हणाले की कथा आवडली असेल तर जरूर चित्रपट करायला हवा."
 
या चित्रपटासाठी होकार द्यायला आमिरला दोन वर्षांचा वेळ लागला.
आमिर म्हणतात, "माझ्यासाठी लगान एक प्रवास आहे. या चित्रपटाशी माझं फारच खास नातं आहे. आम्ही शुटिंगसाठी 6 महिने कच्छमध्ये राहिलो. आम्ही साधारण 300 लोक होतो आणि एकाच इमारतीत राहायचो. शुटिंगला जाताना एकाच बसने जायचो. एका दिवशी गाडीत कोणीतरी गायत्री मंत्र लावला. त्यादिवसापासून शुटिंग संपेपर्यंत आम्ही रोज 45 मिनिटं गायत्री मंत्र ऐकायचो. आम्हीच नाही, बसमध्ये जे इंग्रज होते तेही गायत्री मंत्र ऐकायचे."
 
'कोणत्याही पुरस्काराला गांभिर्यानं घेत नाही'
आमीर खान गेली अनेक वर्षे कोणत्याही पुरस्कार समारंभात भाग घेत नाहीत. त्याबद्दल बोलताना ते म्हणतात, "तुम्हाला तर माहितेय की कोणत्याच पुरस्कार सोहळ्याला गांभिर्यानं घेत नाही. अगदी ऑस्कर्सही नाही. कारण जर मी तुम्हाला आताच्या घडीला विचारलं की 'दंगल', 'लगान', 'थ्री एडियट्स' आणि 'तारे जमीन पर' यांच्यापैकी सर्वोत्तम चित्रपट कोणता तर याचं उत्तर देणं कठीण आहे. कारण यांची तुलना होऊ शकत नाही. हे चित्रपट एकाच वर्षी एकाच वेळी रिलीज झाले असते तर अवॉर्ड शोमध्ये 10 लोकांना लगान आवडला असता तर काहींना दंगल."
 
आमिर म्हणतात की पुरस्कार समारंभ गांभीर्यानं घ्यायला नको कारण ते म्हणजे खेळ नाहीत की बुवा ज्याने 100 मीटरची रेस सगळ्यांत आधी पूर्ण केली तो जिंकला. खेळ स्पष्ट असतात, चित्रपटांचं तसं नाही. प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. "अवॉर्ड शोला महत्त्व देण्यापेक्षा आपण एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे."
 
मी कोणत्याच पुरस्कार समारंभात जात नाही हे खरं नाही असंही आमिर म्हणतात.
"भारतात मी दोन पुरस्कार समारंभांना जातो. एक म्हणजे लता दीदींचा दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड आणि दुसरं म्हणजे दक्षिणेतलं गोल्लापुडी अवॉर्ड. जे पुरस्कार सोहळे योग्य आहेत असं मला वाटतं तिथे मी जातो. ऑस्करला तर मी फक्त माझ्या चित्रपटाचं मार्केटिंग करायला गेलो होतो. भारतात हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला पण परेदशातही सगळ्यांनी पाहावा अशी माझी इच्छा होती. माझ्या चित्रपटाला ऑस्करचं नामांकन मिळालं ही गोष्टही पुरस्कारापेक्षा कमी नाही."
 
'लगान' चित्रपटात ब्रिटिश कालखंड दाखवलेला आहे. यात आमिर खान यांनी एक तरूण शेतकरी भुवनची भुमिका केली आहे.
 
या चित्रपटात आमिर खान यांच्यासमवेत अभिनेत्री ग्रेसी सिंह, रघुवीर यादव, रेचल शेली, कुलभूषण खरबंदा, यशपाल सिंह, राजेंद्र गुप्ता आणि सुहासिनी मुळे यांच्या मुख्य भूमिका होत्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका