Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाल सिंह चढ्ढा : केवळ 'बॉयकॉट'च्या ट्रेंडमुळे बॉलिवुडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत?

लाल सिंह चढ्ढा : केवळ 'बॉयकॉट'च्या ट्रेंडमुळे बॉलिवुडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत?
, शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (11:20 IST)
अलीकडेच आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा, तर अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे बिग बजेट सिनेमे रिलीज झाले. मध्यंतरी बॉलिवुडचे सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटत होते.त्यामुळे संबंध बॉलीवुडची नजर या दोन्ही चित्रपटांच्या कमाईकडे लागली होती. पण यावेळेसही बॉलिवुडच्या पदरी निराशाच पडली.
 
लाल सिंह चढ्ढाने पहिल्याच दिवशी 11.50 कोटींचं ओपनिंग मिळवलं, तर अक्षयच्या रक्षाबंधनने 8 कोटींची कमाई केली. पुढे सलग चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे चित्रपट चालतील अशी अपेक्षा होती, पण काही बिझनेस झालाच नाही. चित्रपटांची ही अशी अवस्था पाहून निर्मात्यांना टेन्शन आलंय. चित्रपट हिट झाले तर नवीन चित्रपट बनवायला बळ मिळतं. मात्र चित्रपटांची अशी अवस्था बघून निराशाच पदरी पडते. या दोन चित्रपटांची अवस्था बघून इंडस्ट्रीच्या आशाच मावळल्यात.
 
दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा संदर्भ देताना प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि समीक्षक गिरीश वानखेडे सांगतात की, "लाल सिंह चढ्ढा चित्रपटाची 6 दिवसांची कमाई 44.50 कोटी, तर रक्षाबंधनची कमाई 33.75 कोटी इतकी झालीय. अक्षयकुमार वर्षभरात साधारण 2 ते 3 चित्रपट करतो. बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे त्याचे मागील दोन चित्रपट होते जे सपाटून आपटले.
 
आमिर आता तब्बल चार वर्षांनी त्याचा चित्रपट घेऊन आलाय तरीही त्याची जादू काही दिसली नाही.
 
आमिर खानचा सुपर फ्लॉप चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नेही पहिल्या दिवशी 52 कोटींचा व्यवसाय केला होता. यावेळी सहा दिवस उलटून गेलेत पण हा आकडाही लाल सिंह चढ्ढाला पार करता आला नाही.
 
या सगळ्यात फिल्ममेकर्स मात्र दुःखी झालेत. या दोन चित्रपटांची अवस्था बघून इंडस्ट्रीच्या आशाच मावळल्यात. येत्या काही दिवसांत ब्रह्मास्त्र, विक्रमवेधा, पठाण सारखे चित्रपट रिलीज होणार आहेत. या चित्रपटांकडून आता आशा वाढल्यात."
 
आमिर खानचा 'लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला होता. सोशल मीडियावर एका वर्गाकडून #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग चालवण्यात आला होता.
 
या दरम्यान काही लोकांनी आमिरची जुनी विधानं व्हायरल केली होती. यातल्या एका व्हीडिओत आमिर म्हणाला होता की, भारतातल्या असहिष्णुतेमुळे माझ्या पत्नीला आपल्याच देशात राहायची भीती वाटते. याच मुद्द्यावर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. या व्यतिरिक्त आमिर खान देशद्रोही आहे, हिंदूविरोधी आहे असेही आरोप झाले. याच लोकांनी आमिरच्या 'पीके' चित्रपटाचे काही सीन्स हिंदूविरोधी आहेत, असं म्हणत व्हायरल केले होते.
 
केवळ लाल सिंह चढ्ढाच नाही, तर अक्षय कुमारच्या रक्षाबंधन बाबतही हा ट्रेंड सुरू झाला.
 
इतकंच नाही तर लाल सिंह चढ्ढाचं कौतुक करणाऱ्या हृतिक रोशनविरोधातही #Boycott सुरू झालं. हृतिक विक्रमवेधा या तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची केवळ घोषणा झालीये. पण 'बॉयकॉट विक्रमवेधा' हा ट्रेंडही सुरू झाला.
 
'बॉयकॉट'मुळे लोकांच्या मनात भीती तयार होते?
बॉयकॉट ट्रेंडचा चित्रपटावर काय परिणाम होतो हे सांगताना चित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात, "या बॉयकॉटच्या ट्रेंडला लोक पूर्वी गांभीर्याने घेत नव्हते. कारण बऱ्याचदा हे ट्रेंड पॉलिटिकल पार्टीकडून चालवले गेलेत. यापूर्वीही असे ट्रेंड चालवले गेलेत. यात 'पद्मावत' असो 'छपाक' असो, सर्वांच्या मागे राजकीय अजेंडा होता. आता 'छपाक'बद्दल बोलायचं झालं तर त्यावेळी जो बॉयकॉटचा ट्रेंड आला होता त्यामुळे 'छपाक'ही हिट होऊ शकला नाही. त्याच धर्तीवर 'लाल सिंह चढ्ढा' बॉयकॉट करण्याचा ट्रेंड आला तेव्हा लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्यामते, कोण्या रिकामटेकड्या लोकांकडून हा ट्रेंड चालवला जातोय.
 
पण चित्रपट पण सो..सो असेल आणि असा ट्रेंडपण सुरू झाला तर मग मात्र यामुळे नक्कीच परिणाम होतो. लोकांना वाटायला लागतं की, आपण थिएटरमध्ये गेलो आणि गडबड सुरू झाली तर....आम्ही काय करणार? आणि अशाच कारणामुळे बरेच लोक चित्रपट बघायला गेले नाहीत. पण यात अजून एक कारण होतं ते म्हणजे बऱ्याच लोकांना चित्रपटही आवडला नाही. लाल सिंह चढ्ढा मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांसाठी बनवला गेलाय आणि मोठ्या मल्टिप्लेक्स आणि नॅशनल चेन्समध्ये या चित्रपटाने सुमारे 60% बिझनेस केलाय."
 
लोकांमध्ये आमिर खानची जी काही क्रेझ होती ती कमी झालीय का या प्रश्नावर उत्तर देताना रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात, 'हो क्रेझ कमी झालीय असं आपण म्हणू शकतो. कारण आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट खूपच खराब होता आणि खासगीत आमिरने तसं बोलूनही दाखवलं होतं. पण त्याला आताच्या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. हा चित्रपट हिट झाला नाही तर मला वाईट वाटेल असं ही तो म्हणाला होता."
 
"हे सगळं असलं तरी तुम्ही चित्रपट बनवताना सर्व गोष्टी लक्षात घेऊन चित्रपट बनवता. म्हणजे चित्रपट हा वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या शहरांतील लोकांसाठी बनवला जातो. मी नेहमी सांगतो की, चित्रपटाचा ऑडियन्स जो असतो तो 'कल्टीवेटेड मॉन्स्टर' असतो. तो 20 तोंडाचा राक्षस आहे. प्रत्येक दिवशी त्याला काहीतरी नवं हवं असतं. आणि राहता राहिली गोष्ट आमिरची, तर आमिरच नाही तर शाहरुख खान, सैफ अली खान यांच्या चित्रपटांविरोधातही निदर्शने होत आहेत. ते करत असलेल्या चित्रपटांच्या किंवा वेब सीरिजच्या विरोधात निदर्शने होत आहेत. आणि हाच ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे," असं ते श्रीनिवासन सांगतात.
 
'थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीयेत'
रामचंद्रन श्रीनिवासन पुढे म्हणतात की, 'फक्त लाल सिंह चढ्ढाच नव्हे तर रक्षाबंधनसाठी सुद्धा बॉयकॉटचा ट्रेंड आला होता. लोकांनी जुनं पुराणं सर्व उकरून काढलं. यात अक्षयचे काही जुने ट्विट्स, चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लनच्या जुन्या कमेंट्स यासोबतच आमिर खानच्या जुन्या कमेंट्स, करीना कपूरच्या जुन्या कमेंट्स सगळंच सोशल मीडियावर आणून हे ट्रेंड सुरू करण्यात आले.
 
"आधी तर कमेंट्सवर बहिष्कार टाकला जात होता. पण आता तर चित्रपटावरही बहिष्कार टाकण्यात आला. आधी असं होत नव्हतं मात्र आता लोकांच्या मनात राग आहे. कोव्हिडनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळेच लोक असे सिनेमे बघायला जात नाहीयेत. त्यांना वाटतंय की, चित्रपटाशी संबंधित लोक देशाच्या हिताच काम करत नाहीयेत. इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे, बॉयकॉट सोबतच लोकांकडे पैसे नाहीयेत. लोक पूर्वी सिनेमा, हॉटेलवर जो खर्च करायचे तो आता करत नाहीत. हॉटेल्सचा धंदा कमी झालाय, रेस्टॉरंटचा धंदा कमी झालाय. बॉक्स ऑफिससोबत देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतोय."
 
मल्टिप्लेक्समुळे सिंगल स्क्रीन्सला रामराम
सोशल मीडियावर काही लोक बॉलिवूड चित्रपटांना धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढंच काय तर या चित्रपटांना जातीयवादाशी सुद्धा जोडलं जातंय.
 
लोकांना वाटतंय की, साऊथचे जे चित्रपट आहेत त्यात धर्माशी संबंधित गोष्टीचं चित्रण योग्यप्रकारे केलं जातं. दुसरीकडे बॉलिवूड मात्र या गोष्टींपासून लांबच आहे, असंही वाटतं.
 
हिंदी इंडस्ट्रीला असं वाटतं की जर त्यांनी दलित हिरो किंवा दलित या विषयाशी संबंधित कोणतेही चित्रपट बनवले तर हे चित्रपट चालणार नाहीत. पण साउथच्या इंडस्ट्रीमध्ये याच्या उलट दिसतं.
 
तिथं या विषयावर तयार झालेले धनुषचे कर्णन किंवा असुरन, सरपट्टा परमबारे, मादातय : अँन अफेअरी टेल, परियेरुम पेरुमल, जय भीम, एरण्डम उलाहपोरी कदेसी गुंडु , सानी काईधाम अशा कित्येक चित्रपटांची उदाहरण देता येतील.
 
ज्या दिवसापासून आपल्याकडे मल्टिप्लेक्स सुरू झाले त्या दिवसापासून सर्व सिनेमे मल्टिप्लेक्सला समोर ठेऊन बनवले गेले.
 
त्यामुळे सिंगल स्क्रीनसाठी जे विषय चालायचे ते विषय बॉलिवूडने सोडले अन सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांनी बॉलिवुडला सोडलं असंच म्हणावं लागेल.
 
अगदी काही वर्षांपूर्वीच बॉलीवुडमध्ये छोट्या छोट्या शहरांवर सिनेमे बनवले जायचे. मात्र आता व्हीएफएक्सचा जमाना आहे. त्यामुळे चित्रपट पण बिग बजेट असतात. तिथं सामान्य माणसाचं काही कनेक्शनच दिसत नाही.
 
मग लोक तरी असे चित्रपट का बघतील?
 
ओटीटीमुळे नवीन आव्हान
एकीकडे मल्टिप्लेक्समुळे सिंगल स्क्रीनचा विचार होताना दिसत नाहीये, तर दुसरीकडे थिएटर्सना ओटीटीच्या रुपाने नवीन पर्याय निर्माण झाला आहे.
 
कोव्हिड काळात जेव्हा थिएटर्स बंद होती, तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाचं एक नवीन साधन खुलं करून दिलं.
 
ट्रेड ॲनालिस्ट अमोद मेहरा सांगतात की, 'ओटीटी जेव्हापासून आलंय तेव्हापासून परिस्थिती बदललीय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी पैशात चित्रपट बघता येतात. फक्त चित्रपटच नाही तर तुमच्या आवडीचा जो वेब शो बघायचाय तो सुद्धा बघायला मिळतो. सुरुवातीच्या टप्प्यात लोकांकडे टीव्ही आणि थिएटर सोडून काही ऑप्शन्स नव्हते. मात्र आता लोकांकडे चित्रपट बघण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे जे चित्रपट रिलीज होतात ते लगेचच ओटीटीवर येतात, त्यामुळे लोकांना असं वाटतं थिएटरमध्ये जाण्यापेक्षा ते ओटीटीवरचं बघता येतील."
 
आता फक्त ही परिस्थिती हिंदी चित्रपटांचीच आहे का? तर, नाही. तेलुगू आणि तामिळ इंडस्ट्रीची पण हीच व्यथा आहे. सर्वांना वाटतंय की, साऊथचे चित्रपट खूप गल्ला जमवतात, पण असं काही नाहीये. मागच्या सहा महिन्यात दाक्षिणात्य भाषेतले 40 चित्रपट रिलीज होत असतील आणि थिएटरमध्ये चर्चा फक्त तीन चित्रपटांचीच होत असेल. तर मग ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
 
पुष्पा, आरआरआर, केजीएफ सोडून आपल्याला साउथमध्ये रिलीज झालेल्या इतर चित्रपटांविषयी काहीच माहिती नाहीये, असं अमोद मेहराही म्हणतात.
 
'ज्यांना धड हिंदी बोलता येत नाही तेही हिंदीत काम करतात'
अलीकडेच बॉलीवुडचा निर्माता आणि आघाडीचा दिग्दर्शक असलेल्या अनुराग कश्यपने एका मीडिया इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. त्याला बॉलीवूडच्या अपयशाबद्दल विचारलं गेलं.
 
त्यावेळी त्यानं म्हटलं, "बऱ्याचदा बॉलीवूड चित्रपटांना इथल्या मातीशी नाळ जोडता येत नाही. जेव्हा तुम्ही तमीळ सिनेमा पाहता किंवा तेलुगु, मल्याळम चित्रपट बघता तेव्हा तुम्हाला त्यातून त्यांचं कल्चर दिसतं. म्हणजे तो तिथला मेन्स्ट्रीम सिनेमा असो वा नसो तुम्हाला त्यांची संस्कृती दिसतेच. पण बॉलीवूडमध्ये मात्र तसं दिसत नाही. इथं ज्या लोकांना धड हिंदी बोलता येत नाही ते लोकही हिंदी सिनेमे करतात. आपला जॉनर सोडून काम केलं तर चित्रपट नाहीच चालणार."
 
एकूणच सोशल मीडियावरील बॉयकॉटचा ट्रेंड हा चित्रपटाबद्दल पूर्वग्रह निर्माण करणारा ठरूही शकतो. पण व्यावसायिकदृष्टिकोनातून पाहिलं तर एखादा चित्रपट यशस्वी ठरण्यासाठी इतरही अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
 
याच गोष्टींमुळे कदाचित लाल सिंह चढ्ढा किंवा रक्षाबंधनही बॉलिवूडचा बॅड पॅच संपविण्यात यशस्वी ठरले नसावेत. आता येणारे चित्रपट तरी सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे चर्चेचा विषय न ठरता, प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणू शकतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ekta Kapoor Trolled: आमिरला लिजेंड म्हणणे एकताला भोवले, युजर्सचा बालाजी टेलिफिल्म्सला बॉयकॉट