ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या.
8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
या अगोदर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते.
दरम्यान, जानेवारी महिन्यात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांना ऊत आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. तसंच कुटुंबीयांनीही अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.
'मीच स्वत:ला घडवलं'
मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव हेमा होतं. मात्र,वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचं पात्र साकारलं. तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे आणि अशाप्रकारे 'लता' हे नाव त्यांना मिळालं.
त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
एकदा लतादीदी म्हणाल्या होत्या, "मीच स्वतःला घडवलं आहे. लढायचं कसं हे मी शिकले. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मात्र, मला जे मिळालं ते मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं."