ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 8 जानेवारीपासून लता मंगेशकर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्येच असून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याचं सांगितलं. त्यांच्या तब्येतीचे सतत निरीक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले.
यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते.
कोणतीही अफवा पसरू नये यासाठी त्यांच्या तब्येतीची माहिती उपचार करणारे डॉक्टर माध्यमांना सतत देत आहेत. लता मंगेशकर यांचे वय सध्या 92 वर्षे आहे.
जानेवारी महिन्यात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांना ऊत आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. तसंच कुटुंबीयांनीही अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.