नेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका टाळण्यासाठी स्वत:च नियंत्रण राखण्याची योजना आखली आहे. या कंपन्या चित्रपट, वेबसीरिज आदी कंटेट भारतात ऑनलाइन प्रसारीत करताना स्वत: आखून दिलेल्या मर्यादेत राहतील. नेटफ्लिक्स, हॉटस्टार व अन्य स्थानिक ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनी या संदर्भात एक नियमावली बनवली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार अल्पवयीनांवर लैंगिक दृष्ये चित्रित करणे, भारताच्या ध्वजाचा अवमान करणे व दहशतवादाला प्रोत्साहन करणे या गोष्टींवर बंदीची तरतूद या नियमावलीत आहे.
विद्यमान कायद्यांमध्ये ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी कुठलीही तरतूद नाही. असं असूनही नेटफ्लिक्स या जागतिक स्तरावरील या क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीविरोधात न्यायालयात दावा दाखल आहे. सेक्रेड गेम्समध्ये भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा अपमान केल्याचा आरोप करत हा दावा ठोकण्यात आला आहे. या कायदेशीर लढाईमुळे या क्षेत्रात आता अशी एक भावना बळावत आहे की कदाचित भविष्यात सरकार ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनाही सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत आणेल किंवा नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करेल.