Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओम राऊत : वडील मराठी संपादक, आई निर्माती, असा आहे ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाचा प्रवास

om raut
, मंगळवार, 20 जून 2023 (17:40 IST)
रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रभासनं रामाची, अभिनेत्री क्रिती सेनननं सीतेची, देवदत्ता नागेनं हनुमानाची, तर सैफ अली खाननं रावणाची भूमिका साकारली आहे.
 
एकीकडे हा सिनेमा कमाईचे उच्चांक गाठत आहे, तर दुसरीकडे वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. या सिनेमातील संवाद, ग्राफिक्स आणि पात्रांच्या वेशभूषा ही वादची कारणं बनलीत.
 
‘आदिपुरुष’ सिनेमातील संवादावरून गीतकार-पटकथाकार मनोज मुंतशीर निशाण्यावर आहेच. मात्र, सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतही ट्रोल्सच्या निशाण्यावर असल्याचं सोशल मीडियावर नजर टाकल्यास दिसून येतंय.
 
ओम राऊत त्याच्या आधीच्या सिनेमांमुळे म्हणजेच ‘तानाजी’ आणि ‘लोकमान्य एक योगपुरुष’ सिनेमांमुळे मराठी सिनेरसिकांना परिचित आहेच. मात्र, आम्ही तुम्हाला ओम राऊतबद्दल आणखी काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
सिनेमा शिकण्यासाठी अमेरिका गाठली!
ओम राऊत मूळचा मुंबईकर आहे. मुंबईत जन्म आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईतच झालंय.
 
मुंबईतील नामांकित डी. जी. रुपारेल महाविद्यालायातून पदवीचं, तर शाह अँड अँकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यानं घेतलं.
 
सिनेमा क्षेत्रातल्या आवडीनं त्याला अमेरिकेपर्यंत नेलं. सिनेमा त्याच्या घरातूनच मिळालेला वारसा. त्याबद्दल पुढे जाणून घेऊच.
 
हल्ली ओम राऊतच्या सिनेसृष्टीतील करिअरची चर्चा गेल्या काही वर्षातील त्याच्या कामांवरून केली जाते. पण फार कमी जणांना माहिती आहे की, ओम राऊतनं बालकलाकार म्हणून ‘करामती कोट’ या 1993 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सुरुवात केली होती.
 
इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओम राऊतनं सिनेक्षेत्रातल्या आवडीला करिअर बनवण्यासाठी अमेरिका गाठली.
 
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित सिरायक्यूज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्समधून सिनेमाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर न्यूयॉर्कमध्येच MTV नेटवर्कमध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून तो काम करू लागला.
 
त्यानंतर ओम राऊत भारतात परतला. भारतात परतल्यानंतर त्यानं केलेल्या सिनेमांबद्दल आपण जाऊन घेऊच. तत्पूर्वी, ओम राऊतच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेऊ.
 
वडील मराठीतले ज्येष्ठ संपादक, आई सिनेनिर्माती
ओम राऊत हा तसा सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या कुटुंबातला आहे.
 
प्रसिद्ध चित्रपट संकलक आणि माहितीपटकार जयचंद्र बांदेकर हे ओम राऊतचे आजोबा म्हणजे आईचे वडील. बाबू बांदेकर नावानं ते सिनेक्षेत्रात परिचित होते.
फिल्म्स डिव्हिजनसाठी बांदेकरांनी अनेक माहितीपटांचं संकलन आणि दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांच्या माहितीपटांना मिळाले आहेत.
 
बाबू बांदेकरांचे मुलगी म्हणजे सिनेनिर्मात्या नीना राऊत. म्हणजेच, ओम राऊतची आई.
 
नीना राऊत या नीना राऊत फिल्म्स (NRF) च्या सर्वेसर्वा. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या सिनेमाची निर्मती एनआरएफनेच केली होती.
 
भारतकुमार राऊत हे नीना राऊत यांचे पती आणि ओम राऊतचे वडील.
 
महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक, द पायोनियरचे माजी निवासी संपादक, टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सल्लागार, लोकमत मीडिया ग्रुपचे संपादकीय संचालक अशा विविध पदांमुळे भारतकुमार राऊत हे मराठीजनांना परिचित आहेत.
 
ते शिवसेनेचे राज्यसभेतील खासदारही होते.
 
तर अशाप्रकारे ओम राऊतची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे.
 
आता पुन्हा येऊ ओम राऊतच्या सिनेक्षेत्रातील कामगिरीकडे.
 
सिनेमा बनवण्यासाठी पुन्हा भारतात
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर ओम राऊत DAR मोशन पिक्चर्समध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करू लागला. याच माध्यमातून 2010 साली ‘सिटी ऑफ गोल्ड’, तर 2011 साली ‘हाँटेड 3D’ या दोन सिनेमांची निर्मिती केली.
 
मात्र, ओम राऊतच्या नावाची सिनेक्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली ती 2015 सालापासून.
 
2015 साली ओम राऊतनं लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवरील सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता सुबोध भावे यानं लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती.
 
त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2020 साली ओम राऊतनं हिंदीत बिग बजेट सिनेमा काढला. त्या सिनेमाचं नाव – ‘तानाजी’.
 
‘तानाजी’ या इतिहासपटात तानाजीच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगन होता. या सिनेमाच्याही दिग्दर्शन आणि लेखकाची जबाबदारी ओम राऊतनं घेतली होती.
 
‘लोकमान्य : एक युगपुरुष’ आणि ‘तानाजी’ सिनेमामुळे ओम राऊतचं नाव मराठी-हिंदीसह सर्व भाषांमधील सिनेसृष्टीत पोहोचलं होतं. त्यामुळे त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
 
त्यातच ओम राऊतनं जाहीर केलं की, आगामी सिनेमा म्हणजे रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ असेल. त्यातही रामाची भूमिका ‘बाहुबली’ सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रभास असेल, हे कळल्यानंतर सिनेमाची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली होती.
 
‘आदिपुरुष’ हा बिगबजेट आणि तंत्रज्ञाच्या अंगानंही वैशिष्ट्यपूर्ण सिनेमा असेल, असाच गाजावाजा झाला होता. खरंतर आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाच्या इफेक्ट्सवर सर्वाधिक टीका होतेय.
 
‘आदिपुरुष’मुळे चर्चाही आणि वादही
‘आदिपुरुष’ सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच आणि विशेषत: या सिनेमात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्राफिक्स वापरले जातील, असं म्हटल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत होते.
 
वाल्मिकींच्या रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या पटकथेचं लेखन स्वत: दिग्दर्शक असलेल्या ओम राऊत आणि गीतकार मनोज मुंतशीर या दोघांनी केलंय. भूषण कुमार, ओम राऊत हे निर्मात्यांमध्ये आहेत.
 
16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करण्यास सुरुवात केली.
 
यातल्या संवादांवर सिनेरसिकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला. त्यानंतर संवाद बदलण्याची भूमिकाही सिनेमाशी संबंधित व्यक्तींनी घेतली. मात्र, तरीही सिनेमावरील नाराजी काही थांबताना दिसत नाहीय.
 
‘आदिपुरुष’ सिनेमामुळे ओम राऊत सिनेसृष्टीत चर्चेचा केंद्र बनलाच, मात्र सिनेमामुळे वादाशीही त्याचं नाव जोडलं गेलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इमली फेम अभिनेत्रींच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं