Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 March 2025
webdunia

पंकज उधास यांना फरमाइश पूर्ण करण्यासाठी जेव्हा कार्यक्रमातच चाहत्याने दाखवली होती बंदूक

Pankaj Udhas
, मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:12 IST)
प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज उधास यांची मुलगी नायाब उधास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंकज उधास हे अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते.
 
नायाब हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली की, "पद्मश्री पंकज उधास यांचं 26 फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते."
 
पंकज हे गेल्या 10 दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. पंकज यांचं 16 फेब्रुवारीला 12 वाजता निधन झालं आहे.
 
संजय दत्तच्या 'नाम' या सिनेमातील 'चिट्ठी आई है' या प्रसिद्ध गझलच्या निमित्ताने पंकज उधास पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रीनवर झळकले.
 
चाहत्याची बंदूक दाखवून फरमाइश
पंकज उधास यांची कारकीर्द अत्यंत दीर्घ अशी राहिलेली आहे. गझल गायक म्हणून त्यांनी मिळवलेलं यश हे प्रचंड मोठं होतं. गझल गायनाचे हजारो कार्यक्रम त्यांनी सादर केले.
 
चाहत्यांसमोर गझल सादर करताना इतर कलाकारांप्रमाणेच पंकज उधास यांनाही अनेक प्रकारचे अनुभव आले. अशाच एका कार्यक्रमातील रंजक किस्सा पंकज उधास यांनी एका टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रमात सांगितला होता.
 
अनेक वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पंकज उधास गझल सादर करत होते. खुल्या मैदानात हा कार्यक्रम होत होता. कार्यक्रमाला चाहत्यांची चांगली गर्दीही जमलेली होती.
 
कार्यक्रम सुरू होऊन त्यांनी तीन-चार गझलच सादर केल्या होत्या. तेवढ्यात आयोजकांपैकी एक जण त्यांच्याकडं येऊन एक विशिष्ट गझल आता लगेचच ऐकवा असं त्यांच्या कानात सांगून गेले
पंकज उधास यांना मात्र ते आवडलं नाही. मी ती गझल ऐकवेन पण आता लगेच का, मला हवी तेव्हा मी ती ऐकवेन असं त्यांचं मत होतं. त्यामुळं पंकज यांनी इतर गझल गायला सुरुवात केली.
 
त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा पंकज यांच्याकडं आली आणि ती गझल गाण्यास सांगितलं. तसंच समोरच्या एका व्यक्तीकडं इशारा करत ही त्यांची फ़रमाइश असल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं.
 
पंकज उधास यांनी समोर पाहिलं तर एक व्यक्ती समोर बसलेली होती. त्याला पाहून पंकज उधास यांना पुन्हा राग आला. त्यांनी त्यांच्या इतर गझल गाणं सुरू ठेवलं.
 
काही वेळानं पंकज उधास यांनी त्या व्यक्तीकडं पाहिलं तर त्या व्यक्तीनं खिशातली बंदूक काढली होती. तो व्यक्ती बंदूक पंकज उधास यांना दाखवून काहीतरी खुणा करत होता.
 
बंदूक पाहिल्यानंतर मात्र आपण चांगलेच घाबरलो, असं त्यांनी सांगितलं.
 
चिठ्ठी आयी है...गाण्यासाठी स्टुडिओत मागवल्या गाद्या
पंकज उधास यांचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम एका गाण्याशिवाय पूर्ण होणं शक्य नव्हतं. ते गाणं म्हणजे ‘नाम’ चित्रपटातील अत्यंत गाजलेलं ‘चिठ्ठी आयी है... हे गाणं.
 
या गाण्याचाही खास किस्सा पंकज उधास यांनी ‘कपिल शर्मा शो’ मध्ये कार्यक्रमात सांगितला होता.
 
‘नाम’ चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. ते गाण्यासाठी पंकज उधास यांना स्टुडिओमध्ये बोलावलं होतं.
 
गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू झालं आणि पंकज उधास यांनी एक दोन वेळा हे गाणं गायलं. पण लक्ष्मीकांत यांच्या मनात गाण्याबाबत काहीतरी वेगळंच चाललेलं होतं.
 
"तुम्ही जेव्हा लाईव्ह कार्यक्रम किंवा कॉन्सर्ट करता त्यावेळी कशाप्रकारे गाणी गाता," असा प्रश्न लक्ष्मीकांत यांनी पंकज उधास यांना विचारला.
 
त्यावर पंकज यांनी, "कार्यक्रमांमध्ये गाद्यांवर बसून हार्मोनियम वाजवत गाणी गात असतो," असं सांगितलं. ते ऐकल्यानंतर लक्ष्मीकांत यांनी पंकज उधास यांना 10 मिनिटं थांबायला सांगितलं.
 
त्यानंतर लक्ष्मीकांत यांनी मेहबूब स्टुडिओमध्येच गाद्या मागवल्या आणि तयारी केली. स्टुडिओचा हॉल मोठा असल्यानं त्यांनी तिथंच टेबलवर स्टेज तयार केलं आणि त्यावर गाद्या टाकून मैफल जमवली.
 
त्यावेळी लाईव्ह संगीतकारांबरोबर पंकज उधास यांनी हे गाणं गायलं होतं. अशाप्रकारे हे गाणं लाईव्ह रेकॉर्ड करण्यात आलं होतं. गाण्याचं डबिंग झालं नव्हतं.
 
एका टेकमध्ये हे सात मिनिटांचं गाणं पूर्ण झालं होतं, असं पंकज उधास यांनी सांगितलं होतं.
 
गाणं गायल्यानंतर जेव्हा पंकज उधास आत आले तेव्हा त्याठिकाणी महेश भट, कथा लिहिलणारे सलीमजी, राजेंद्र कुमार या सगळ्यांचे डोळे पाणावले होते, असं त्यांनी सांगितलं.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे